Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अमोल कांबळेला सातार्‍यात अटक
ऐक्य समूह
Thursday, August 10, 2017 AT 11:08 AM (IST)
Tags: re2
5वडूज, दि. 9 :खटावचे तत्कालीन तहसीलदार व सध्या तळोदा (जि. नंदूरबार) येथे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असलेले अमोल कांबळे (वय 31, रा. उस्मानाबाद) याला शासकीय अनुदान घोटाळ्या प्रकरणी वडूज पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचून अटक केली. घोटाळेबाज अमोल कांबळेला अटक व्हावी यासाठी जनता क्रांती दलाचे सकाळपासूनच धरणे आंदोलन सुरू होते. दरम्यान, सायंकाळी सातारा येथे विशेष पथकाने अमोल कांबळे याला शिताफीने अटक केली. अमोल कांबळे याला पाहण्यास वडूजसह तालुक्यातून अनेक नागरिकांनी धाव घेतली. मात्र त्याचा चेहरा झाकल्याने नागरिकांची निराशा झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, खटाव तालुक्यासाठी 2015 मध्ये आलेल्या दुष्काळ निधीत घोटाळा केल्या प्रकरणी तत्कालीन तहसीलदार डॉ. अमोल कांबळे याच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दि. 5 रोजी फिर्याद दाखल केली होती. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिलेल्या आदेशानुसार डॉ. कांबळे याने दोन कोटी 93 लाख दहा हजार 858 रुपयांचा घोटाळा केल्याचे नमूद केले होते. या प्रकरणात डॉ. कांबळे याच्यासह प्रवीण सारंग शिंदाडे, चैतन्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, कराड मर्चंट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची वडूज शाखा, आयसीआयसीआय बँक वडूज शाखेचे तत्कालीन प्रमुख राकेश मुनास्वामी नायडू, कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक,  वडूज शाखा, विटा मर्चंट को-ऑपरेटिव्ह, वडूज शाखा यांनाही आरोपी म्हणून सहभागी केले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के हे तपास करत होते. घोटाळ्याची व्याप्ती पाहता घोटाळेबाज व्यक्ती व बँकेतील देवाण-घेवाण याची प्राथमिक माहिती घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक शिर्के यांनी दोन विशेष पथके रवाना केली. यातील एका पथकास अमोल कांबळे हा सातारा येथे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. त्या अनुषंगाने सातारा-पुणे महामार्गावर या विशेष पथकातील पोलीस तळ ठोकून होते. सायंकाळी सातारा येथील नटराज मंदिर चौकात (बॉम्बे रेस्टॉरंट) अमोल कांबळे याला अटक केली. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. गोसावी यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, अमोल कांबळेच्या अटकेसाठी तालुक्यातील विविध संघटनांनी निवेदने दिली होती तर जनता क्रांती दलाने वडूज पोलीस ठाण्यासमोर अटकेसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता केंगारे, गणेश इंगळे, मोहन अवघडे, प्रवीण कमाने, महादेव सकट, दाऊद मुल्ला, संजय तोरणे आदींसह संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाचा प्रशासनावर दबाव निर्माण झाल्याने मंगळवार, दि. 8 पासूनच पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घोटाळेबाज अमोल कांबळेला प्राथमिक चौकशीसाठी वडूज येथील उपविभागील पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात आणण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, खटावचे नूतन तहसीलदार बेल्लेकर, सपोनि. यशवंत शिर्के आदी उपस्थित होते. पोलिसांची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला वडूज ग्रामीण रुग्णालय येथे नेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: