Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपच्या साथीने 30 जागा जिंकून राष्ट्रवादीच ‘किंग’
vasudeo kulkarni
Thursday, August 10, 2017 AT 11:04 AM (IST)
Tags: lo1
अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांचा पराभव; आ. शंभूराज देसाईंनाही धक्का; काँग्रेसचा पाच जागांवर विजय; साविआला एकच जागा
5सातारा, दि. 9 : साताराजिल्हा नियोजन समितीच्या निवड-णुकीत विरोधकांमध्ये फूट पाडत राष्ट्रवादी काँग्रेसने आपणच जिल्ह्यात किंग आहोत हे दाखवून दिले.  भाजपला साथीला घेत राष्ट्रवादीने 30 जागांवर विजय मिळवत सातारा जिल्ह्यावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 23, नगरपालिकेच्या 5 पैकी 5 आणि नगरपंचायतींच्या  2 पैकी 2 जागांवर त्यांनी विजय मिळवला.   जिल्हा परिषदेत अवघ्या सात मताच्या जोरावर आणि अपेक्षित मतांचा कोटा नसतानाही काँग्रेसने अनपेक्षिपतपणे पाच जागा जिंकून सर्वांनाच धक्का दिला. भाजपनेही राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत चार जागांवर विजय मिळवला. सातारा विकास आघाडीला  एका जागेवर समाधान मानावे लागले. कराड विकास आघाडीच्या अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना   मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विरोधकांची महाआघाडी उभी करण्याचा प्रयत्न करणार्‍या आ.शंभूराज देसाई यांच्या उमेदवाराच्या पदरीही पराभवच आला.
जिल्हा नियोजन समितीच्या 40 जागांसाठी निवडणूक झाली. अर्ज छाननी आणि माघारी दरम्यान एकूण 11 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यापैकी 8 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या तरदोन जागा काँग्रेस आणि एक जागा भाजपने जिंकली होती. सोमवारी 29 जागांसाठी मतदान झाले होते. मंगळवारी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी झाल्यानंतर ग्रामीण निर्वाचन क्षेत्र मतदारसंघातील (जिल्हा परिषद) एका जागेचा निकाल वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नगरपंचायत मतदारसंघात 136 मतदान होते. त्यापैकी एका मतदाराने मतदान न केल्यामुळे 135 मतदान झाले होते. या मतदारसंघात 2 जागांसाठी  4 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. विजयासाठी मताचा कोटा 69 होता. बुधवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यात तासातच निकाल बाहेर पडला. ओबीसी महिला प्रवर्गात राष्ट्रवादीच्या शोभा माळी यांना 72 तर काँग्रेसच्या रेश्मा कोकरे यांना 63 मते मिळाली.  
परिणामी माळी यांना विजयी घोषित करण्यात आले. त्याच मतदारसंघात खुल्या प्रवर्गात राष्ट्रवादीचे संजय पिसाळ यांनी काँग्रेसचे मनोहर शिंदे यांचा पराभव केला. पिसाळ यांना 78 तर शिंदे यांना 58 मते मिळाली.
नगरपालिका मतदारसंघातील पाच जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी विजयी मताचा कोटा 91 इतका होता. ओबीसी महिलामधून राष्ट्रवादीच्या लीना गोरे यांनी शिवसेनेच्या शारदा ढाणक यांचा पराभव केला. गोरे यांना 103 तर ढाणक यांना 85 मते मिळाली. ओबीसी पुरुषमध्ये राष्ट्रवादीचे आनंदा कोरे (119 मते) यांनी काँग्रेसचे विजय वाटेगावकर (69 मते) यांचा पराभव केला. सर्वसाधारण महिलामधून राष्ट्रवादीच्या पल्लवी पवार (108 मते) यांनी साविआच्या स्नेहा नलवडे (78 मते, दोन अवैध) यांचा पराभव केला. सर्वसाधारण प्रवर्गात राष्ट्रवादी पुरस्कृत आ. मकरंद पाटील यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे चरण गायकवाड यांना सर्वाधिक 117 मते मिळाल्यामुळे ते विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी धनाजी माने यांना 2 तर अशोक जाधव यांना 67 मते मिळाली. राष्ट्रवादीचे विनोद उर्फ बाळासाहेब खंदारे  यांना 153 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मिलिंद काकडे (भाजप) यांना अवघी 32 मते मिळाली.
जिल्हा परिषदेमध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने बाजी मारली असली काँग्रेसनेही येथे पाच उमेदवार विजयी करत धक्का दिला आहे. त्यापैकी दोन उमेदवार त्यांचे बिनविरोध झाले होते. या मतदारसंघात 33 उमेदवार निवडून द्यावयाचे होते आणि त्यासाठी एकूण उमदेवार 40 होते. मात्र, अर्ज छाननी आणि माघारीच्या दरम्यानच अकरा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये रंजना डंगळे, सुनीता कचरे, नीता आखाडे, सुरेखा जाधव, सुरेंद्र गुदगे, अभय तावरे, प्रकाश चव्हाण, प्रतीक कदम (राष्ट्रवादी) मंगल गलांडे, अरुण गोरे (काँग्रेस), प्रियांका ठावरे (भाजप) या उमेदवारांचा समावेश होता.
अनुसूचित जातीमध्ये एक जागा निवडून द्यावयाची होती तर त्यासाठीच मताचा कोटा 33 इतका होता. येथे राष्ट्रवादीचे बापू जाधव विजयी झाले असून त्यांना 42 तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे सागर शिवदास यांना 21 मते मिळाली. अनुसूचित जाती महिला प्रवर्गात दोन जागा निवडून द्यावयाच्या असल्या तरी तीन उमेदवार होते. त्यासाठी 22 मतांचा कोटा निश्‍चित करण्यात आला होता. येथे राष्ट्रवादीच्या वनिता पलंगे (22), भाजपच्या रेश्मा शिंदे (37) विजयी झाल्या तर राष्ट्रवादीच्या मधू कांबळे यांना 4 मते मिळाली. राष्ट्रवादी, भाजपचे मनोमीलन झाल्यामुळे कांबळे यांचा कोटा रेश्मा शिंदे यांना देण्यात आल्यामुळे त्यांच्या वाट्याची अठरा मते त्यांना मिळणार नव्हती. शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषदेची मतमोजणी झाली. पहिल्यांदा सर्वसाधारण प्रवर्ग मोजण्यास घेतला. त्यासाठी अकरा उमेदवारांतून नऊ उमेदवार निवडून द्यावयाचे होते आणि विजयासाठीच्या मतांचा कोटा सात इतका होता. त्यामुळे उदय कबुले, मानसिंग जगदाळे, मंगेश धुमाळ (राष्ट्रवादी), मनोज घोरपडे (भाजप) यांना सात मते मिळाल्यामुळे त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.  शिवाजीराव चव्हाण, बाबासाहेब पवार, रमेश पाटील (राष्ट्रवादी), जिजामाला नाईक-निंबाळकर (काँग्रेस) यांना सहा तर निवास थोरात (काँग्रेस) यांना पाच मते मिळाली. त्यामुळे त्यांची दुसर्‍या फेरीची मते मोजण्यास घेण्यात आली. दुसर्‍या फेरीत हे उमेदवार विजयी झाले.  पहिल्या फेरीत विजय पवार (शिवसेना) यांना पाच तर यावेळी उदयसिंह पाटील (कविआ) यांना तीन मते मिळाली. सर्वात कमी मते उदयसिंह पाटील यांना असल्यामुळे तर दुसर्‍या फेरीचा विचार झाल्यावर विजय पवार बाहेर पडले. अ‍ॅड. उदयसिंह पाटील  आणि विजय पवार यांचा पराभव झाला.
सर्वसाधारण महिला प्रवर्गात दहा जागा निवडून द्यावयाच्या होत्या. त्यासाठी अकरा उमेदवार होते. त्यामुळे येथे कोण पराभूत होणार आणि कोण बाजी मारणार याकडेच अनेकांच्या नजरा होत्या. येथे काँग्रेसने मात्र, सार्‍यांनाच धक्का दिला आहे. येथे त्यांची एक जागा निवडून येणे अवघड असताना त्यांनी दोन जागा आपल्या खिशात टाकल्या आहेत. त्याची मतमोजणी दोनदा झाली. पहिल्यांदा मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्याच फेरीत काँग्रेसच्या सुनीता कदम यांना आठ तर भाजपच्या सुवर्णा देसाई आणि राष्ट्रवादीच्या संगीता खबाले-पाटील यांना प्रत्येकी सात तर उषादेवी गावडे, भारती पोळ, जयश्री फाळके, अर्चना रांजणे यांना प्रत्येकी सहा तर दीपाली साळुखे यांना पाच मते पडली. संगीता मसकर यांना पहिल्या फेरीत  चारच मते मिळाली होती. सातारा विकास आघाडीच्या अनिता चोरगे यांना चार तर अर्चना देशमुख यांना केवळ दोन मते मिळाली. मताचा कोटा सहा असल्यामुळे देशमुख बाहेरच पडल्या होत्या. त्यामुळे दुसर्‍या फेरीमध्ये मसकर, साळुंखे आणि चोरगे यांची मते मोजण्याचा निर्णय घेण्यात आला. मसकर यांना 34 मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. साळुंखे यांना शून्य तर चोरगे यांना एक मत मिळाले. त्यामुळे दुसर्‍या फेरीचा आधार घेत चोरगे यांना विजयी घोषित करण्यात आले. दरम्यान, देशमुख या नाराज होवूनच निघून गेल्या होत्या. याचवेळी त्यांना काँग्रेसचे भीमराव पाटील यांनी निरोप दिला आणि तुम्ही विजयी झाले असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या तत्काळ येथे आल्या आणि जल्लोषात सहभागी झाल्या.
सातारा विकास आघाडीचा जल्लोष सुरू असतानाच राष्ट्रवादीने त्यावर हरकत घेतली आणि पुन्हा मतमोजणी करण्यास सुरुवात केली. या प्रगर्वातील एका मताचे मूल्य 546 धरण्यात आले तर चार मते बाद ठरली होती. त्यानंतर मतमोजणी सुरू झाली असता सर्व उमेदवारांची मते मोजली. त्यानंतर नियमांचा आधार घेत दीपाली साळुंखे या विजयी घोषित करण्यात आल्या तर दुसर्‍या फेरीत सर्वाधिक मते अर्चना देशमुख यांना असल्यामुळे त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आणि अनिता चोरगे या पराभूत झाल्या. या सर्व प्रक्रियेनंतर   अधिकार्‍यांनी चुकीची मते मोजल्याचा आरोप करत अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी सौ. चोरगे यांनी केली.  निवडणूक निकाल जस जसे जाहीर होत होते तस तसे उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. काही विजयी उमेदवारांनी विजयी मिरवणूकही काढली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: