Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यात बदल्यांचा बाजार; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
ऐक्य समूह
Friday, August 11, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: mn2
बदली रोखण्यासाठी माजी मुख्य सचिवांनी 7 कोटी मागितले
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या नुकत्याच निवृत्त झालेल्या मुख्याधिकार्‍याने त्याची बदली थांबविण्यासाठी एका माजी मुख्य सचिवाने 7 कोटी रुपयांची लाच मागितल्याची माहिती एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. राज्यात बदल्यांचा बाजारच मांडला गेल्याचे यावरून दिसून येते. या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.
‘एसआरए’चे एक मुख्याधिकारी नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांनी त्यांची बदली थांबविण्यासाठी माजी मुख्य सचिवांनी 7 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा गौप्यस्फोट एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. बदली थांबविण्यासाठी 7 कोटी मागण्यात येत असतील तर बदली करण्यासाठी किती मागण्यात येत असतील? या अधिकार्‍याने त्या माजी मुख्य सचिवाचे नावही घेतले होते. यावरून राज्यात बदल्यांचा बाजारच मांडला गेला आहे काय, असे वाटते. मागे सहारा स्टार या हॉटेलमध्ये धाड टाकण्यात आली, तेव्हा कोट्यवधींची रक्कम व धनादेश सापडले होते. बदल्यांचे रॅकेट तेथे चालविण्यात येत होते, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. संबंधित अधिकार्‍याला अटक करून त्याची चौकशी करण्यात यावी. हे संपूर्ण प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: