Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रवादीसाठी आखलेल्या चक्रव्यूहात विरोधकच अडकले
ऐक्य समूह
Friday, August 11, 2017 AT 11:37 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 10 (विनोद कुलकर्णी) : राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी आखलेल्या चक्रव्यूहातून राष्ट्रवादी सहिसलामत बाहेर पडली. पण त्याच चक्रव्यूहात अडकून विरोधकांचा अभिमन्यू झाला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शंभूराज देसाई, अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या वाट्याला मोठे अपयश आले असून जिल्ह्याचे नियोजन राष्ट्रवादीच्या ताब्यात गेले आहे. राष्ट्रवादीच्या खेळीचा अंदाज न आल्याने काँग्रेस, भाजप वगळता सर्वच विरोधक तोंडावर आपटले आहेत. 
जिल्हा नियोजन समितीच्या 40 पैकी 30 जागा जिंकून सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले. राष्ट्रवादीच्या विरोधात पहिल्यांदा जिल्हास्तरावर आ. शंभूराज देसाई यांनी आघाडी उभी करण्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी खा. उदयनराजे यांच्याशी हातमिळवणी केली. ही हातमिळवणी करताना राजकारण बेरजेचे होतेय का वजाबाकीचे होतेय हेही त्यांनी तपासून बघितले नाही. खरे तर राजकारणाचा तीन पिढ्यांचा वारसा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे राजकारणातील डाव-प्रतिडाव त्यांना चांगलेच माहिती आहेत. राजकारणात कोण कोठे आणि कधी फसवेल हे सांगता येत नाही. अशा अनेक घटना त्यांनी यापूर्वी अनुभवल्या आहेत. मात्र, एवढ्या छोट्या निवडणुकीत ते गाफील कसे राहिले हाच मोठा प्रश्‍न आहे. वास्तविक राष्ट्रवादीने त्यांना बरोबर येण्याची ऑफर दिली होती. त्या ऑफरचा त्यांनी विचारच केला नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आ. देसाई बॅकफूटवर गेले आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत विजय मिळवून पुन्हा कमबॅक करण्याची त्यांना मोठी संधी होती. मात्र, ती त्यांनी गमावली. त्यातच त्यांनी अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनाही मदत केली नाही. त्यामुळे आ. देसाई यांच्या पदरी जसा पराभव आला, तसाच पराभव अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्याही वाट्याला आला. खरेतर तीन मतांच्या जोरावर अ‍ॅड. उदयसिंह पाटील जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत उतरलेच कशाला, हाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे. गेली पन्नास वर्षे सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर विलासकाकांचा प्रभाव आहे. काकांचा वारसा घेवून अ‍ॅड. उदयसिंह राजकारणात काम करत आहेत. जिल्हा नियोजन समितीत जाण्यासाठी त्यांनी गडबड करायला नको होती. एक तर त्यांना आ. शंभूराज देसाई यांची   सोबत नव्हती. राष्ट्रवादीमध्ये त्यांचे बंधू अ‍ॅड. राजाभाऊ पाटील आणि अविनाश मोहिते असताना राष्ट्रवादीही त्यांना मदत करण्याची शक्यता नव्हती. काँग्रेसचे नेतृत्व आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आणि भाजपचे नेतृत्व अतुल भोसले यांच्याकडे आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून त्यांना काहीही मदत मिळण्याची शक्यता नव्हती. एवढी साधी गणिते त्यांना समजली नाहीत, याचेच आश्‍चर्य वाटते. एवढ्या छोट्या निवडणुकीत एवढा मोठा जुगार त्यांनी का खेळला हेच समजत नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या विक्रमी विजयाला जिल्हा नियोजन समितीतील नामुष्कीजनक पराभवामुळे गालबोट लागले आहे. पराभवाचे गालबोट धुवून काढण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात हेही त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. कराड विकास आघाडीच्या जीवावर राजकारणात टिकून राहता येईल. मात्र, नेत्रदीपक विजयी घोडदौड करायची असेल तर कोणत्या तरी पक्षाच्या आडोशाला जावूनच राजकारण करावे लागेल. अपक्ष आणि तटस्थ राहून छोट्या छोट्या निवडणुका भागीदारीमध्ये जिंकता येतील. मात्र, मोठी निवडणूक जिंकण्यासाठी आता फार मोठी ताकद उभी करावी लागणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आपल्याला एकटे पाडले जात आहे. एकटे पाडणारे सगळे काकांचे जुने मित्रच आहेत. जुन्या मैत्रीचा विसर सर्वांना पडला आहे त्यामुळे अ‍ॅड.उदयसिंहांना नवी जुळणी करावी लागणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अ‍ॅड.उदयसिंह आणि आ. शंभूराज देसाई यांच्या मैत्रीमध्येही फूट पडली आहे. हे दोन्ही नेते तसे जवळचे नातेवाईक आहेत. मात्र, पराभवाचा अपमान पचवून पुन्हा दोघे एकत्र येतील याविषयी शंकाच वाटते. अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना राष्ट्रवादीने तर मदत केलीच नाही पण विरोधकांनीही त्यांना बरोबर घेतले नाही, ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायला हवी. जिल्ह्याचे राजकारण बदलत चालले आहे. बदलत्या राजकारणाचा अंदाज घेवूनच यापुढील वाटचाल करायला हवी.
खा. उदयनराजे यांची गोष्टच वेगळी आहे. खा. उदयनराजे जिथे हात घालतील तिथे यश मिळवतील, असे समीकरण असते. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत हे समीकरण कसे चुकले, याचाही विचार त्यांना करावा लागणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपाठोपाठ जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत त्यांच्या हाताला फार काही लागलेले नाही. भाजपसारखा जिल्ह्यात किरकोळ ताकद असलेला पक्षही त्यांना ऐनवेळी सोडून जावून राष्ट्रवादीशी हातमिळवणी करतो, ही गोष्ट बरेच काही सांगून जाणारी आहे. त्यामुळे भविष्यातील निवडणुका लढवताना आपले डावपेच अयशस्वी होणार नाहीत याची काळजी  घेवूनच त्यांना धोरण आखावे लागणार आहे अन्यथा आपल्याजवळ असलेल्या करिष्म्याचा काहीही फायदा होणार नाही, हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. एकूणच निवडणुकीच्या राजकारणात विरोधकही सावध झाले आहेत हे लक्षात घेवून पुढील डावपेच आखले पाहिजेत. आता सर्व महत्त्वाच्या निवडणुका संपल्या आहेत. आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा या दोनच महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी उरला आहे आणि विधानसभेसाठी सव्वादोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी नवे  धोरण घेवून पुढे जायला हवे आणि विधानसभेची गणितेही आतापासूनच मांडायला हवीत. ऐनवेळी सगळी गणिते जमतील, याची शाश्‍वती देता येत नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: