Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

अब्जाधीश झाला निष्कांचन
vasudeo kulkarni
Friday, August 11, 2017 AT 11:42 AM (IST)
Tags: lolak1
वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेल्या ‘नटसम्र्राट’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर नवा इतिहास घडवला. एक काळ मराठी रंगभूमीवर आणि प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणार्‍या अप्पासाहेब बेलवलकर या नटसम्राटाच्या जीवनाच्या उत्तरार्धात झालेली शोकांतिका, हे या नाटकाचे कथासूत्र. रंगभूमीवरून निवृत्त झाल्यावर नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर आपला राहता बंगला, पैसा अडका हे सारे काही आपल्या लाडक्या (!) मुला- मुलीला बक्षीसपत्राद्वारे देऊन टाकतात. पण,  या लाडक्या मुलाकडून होणार्‍या अपमानास्पद वागणुकीने स्वाभिमानी अप्पासाहेब बेलवलकर पत्नी कावेरीसह आपलेच घर सोडतात. त्यांची विवाहित मुलगी त्यांना आश्रय देते. पण, आपल्या बंगल्यातल्या नोकरांच्या खोल्यात ठेवते. मुलीनेच पैसे चोरल्याच्या केलेल्या आरोपाने व्यथित झालेले बेलवलकर मुलीचेही घर सोडून आपल्या गावी जायचे ठरवतात. पण, त्या घरात पोहोचायच्या आधीच त्यांच्या पत्नीचेही निधन होते. कफल्लक अप्पासाहेब बेलवलकर पूर्णपणे निराधार-निराश्रित होतात. त्यांच्या जीवनाची वृद्धावस्थेत फरपट होते. मुंबईतल्या फूटपाथवर बूटपॉलिश करून पोटाची खळगी भरणारा मुलगा त्यांना आश्रय देतो. सांभाळतो. मुलाने आणि मुलीने त्यांचा अपमान केल्याच्या घटनांनी व्यथित झालेल्या त्यांच्या कावेरीचे मनोगत हे स्वार्थी मुला मुलींकडून आई, वडिलांच्या होणार्‍या छळ आणि उपेक्षेवर झगझगीत प्रकाशझोत टाकणारे आहे. कावेरी त्यांना म्हणते, ‘समोरचे जेवणाचे ताट द्यावे, पण बसलेला पाट देऊ नये’ एवढे साधे तुुम्हाला कसे समजले नाही. मायेच्या मोहात तुम्ही सारेच गमावून बसलात.
या नाटकाने आपल्याच रक्ताची, जीवाभावाची माणसे, मुले-मुलीही वृद्ध आई वडिलांना निर्लज्ज आणि बेशरमपणे वार्‍यावर कशी सोडतात, हेच शिरवाडकरांनी अत्यंत भेदक शब्दात समाजासमोर आणले आहे. अशा घटना समाजात सातत्याने घडत असल्या तरी मुला-मुलींच्या मायेच्या पाशात अडकलेले आई, वडील अद्यापही आपल्या वृद्धापकाळातल्या उरलेल्या जीवनाचा सारासार विचार न करता, सारी संपत्ती, मालमत्ता मुलांना देऊन टाकतात आणि रस्त्यावर येतात, याची प्रचिती एक काळचे अब्जाधीश आणि देशातल्या सर्वात मोठ्या कापड उद्योगाच्या ‘रेमंड’ कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया यांच्यावर ओढवलेल्या  संकटाने आली आहे.
एक काळ स्वत:च्या विमानाने जगभर प्रवास करणार्‍या विजयपत सिंघानिया यांनी विश्‍वासाने वय झाल्यावर आपल्या उद्योगाची सूत्रे हळूहळू मुलगा गौतम याच्याकडे सोपवली. व्यवसायातून ते निवृत्तही झाले. आपल्या मालकीचे एक हजार कोटी रुपयांचे शेअर्सही त्यांनी आपल्या मुलाच्या नावे करून दिले. आता त्यांच्या त्याच लाडक्या मुलाने त्यांना मुंबईतल्या मलबार हिलवरच्या आलिशान सदनिकेतूनही बाहेर काढल्याने, एकेकाळच्या या अब्जाधिशाला आता भाड्याच्या घरात रहावे लागते आहे. सारी संपत्ती आणि मालमत्ता मुलाला दिल्याने आणि त्यानेच त्यांना घरातून बेदखल केल्याने, एकेक पैशाला ते मोताद झाल्याची करुण कहाणी त्यांच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी सांगितले. विजयपत सिंघानिया यांनी बांधलेल्या या चौदा मजली इमारतीतल्या काही सदनिका कुटुंबासाठी ठेवल्या होत्या. याच इमारतीतल्या आलिशान सदनिकेत ते राहात होते. गौतमने आधी आपले चुलत भाऊ अनंत, अक्षयपत यांना मालमत्तेतला वाटा दिला नाही. त्यांनीही याच सदनिकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. आपण एवढी प्रचंड संपत्ती गौतमला दिली, पण तो आपला सांभाळ तर करीत नाहीच, पण त्याने आपल्याला घर सोडणे भाग पाडल्यावर आपली मोटरही काढून घेतली. आता जगायसाठीही आपल्याकडे पैसे नाहीत, अशी व्यथा 78 वर्षे वयाच्या विजयपत सिंघानिया यांनी वकिलांमार्फत न्यायालयात मांडली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: