Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अखेर पोलीस निरीक्षक विकास धस न्यायालयात हजर
ऐक्य समूह
Friday, August 11, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: re2
रावसाहेब जाधव खून प्रकरण; सीआयडी ताबा घेण्याची शक्यता
5कराड, दि. 10 : करमाळा येथील रावसाहेब जाधव खून प्रकरणातील संशयित व कराड शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास धस तब्बल एक वर्ष व 20 दिवसांनी येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयासमोर गुरुवारी हजर झाला. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. प्रकृतीच्या कारणास्तव त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उद्या (शुक्रवार) गुप्तचर विभाग त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
याबाबत माहिती अशी, एका खासगी बसमधून 77 लाखांचे अडीच किलो सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना मे 2016 मध्ये कराड येथे घडली होती. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास धस हा करत होता. या प्रकरणातील संशयितांची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाल्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत कांकडकी याच्यासह सहा कर्मचारी संशयित रावसाहेब जाधव याला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. 
त्यांनी रावसाहेब जाधव व अनिल दशरथ डिकोळे (वय 36, रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेऊन कराड येथे आणले होते. दि. 18 जून 2016 रोजी तपासकामी त्या दोघांना घेऊन कार्वे नाका पोलीस चौकीत आणले असताना तेथे रावसाहेब जाधव याची प्रकृती खालावल्याने त्याला सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे दुपारी चारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला होता. रावसाहेब जाधवच्या मृत्यूनंतर करमाळा व अन्य ठिकाणांहून आलेल्या समाजबांधवांनी संबंधित पोलिसांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यांनी तहसील कार्यालयावरही मोर्चाही काढला होता.
त्या प्रकरणात रावसाहेब याचा मेव्हणा अनिल डिकोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी विकास धस, हणमंत कांकडकी यांच्यासह बारा पोलिसांना निलंबित केले. या गुन्ह्याचा तपास राज्य गुप्तचर विभाग करत आहे. डिकोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी धस, कांकडकी
यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल केला होता. या खून प्रकरणातील सर्व संशयित काही दिवस फरार होते. या प्रकरणी सर्वप्रथम हवालदार कृष्णा खाडे याला सीआयडीने अटक केली. डिसेंबर 2016 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक काकंडकी याच्यासह दहा पोलीस न्यायालयात हजर झाले. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यातील काही जणांची जामिनावर मुक्तताही झाली आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक विकास धस याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच फेटाळला. त्यानंतर त्याने जामिनासाठी वरिष्ठ न्यायालयात प्रयत्न केले. त्या शिवाय फिर्यादीला आव्हान देणारी याचिकाही दाखल केली होती. अखेर गुरुवारी या प्रकरणात तो स्वत:हून येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश गोगले यांच्यासमोर हजर झाला. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून प्रकृतीच्या कारणास्तव त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गुप्तचर विभाग (सीआयडी) शुक्रवारी धस याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: