Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

मूलभूत स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते
vasudeo kulkarni
Friday, August 11, 2017 AT 11:41 AM (IST)
Tags: vi1
सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश जगदीश सिंह खेहर यांच्या निवृत्तीनंतर, त्या पदावर न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार या सर्वोच्च पदावर ते 14 महिने राहतील. 2011 पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती असलेले मिश्रा हे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते आहेत. 3 ऑक्टोबर 1953 रोजी ओरिसा राज्यात जन्मलेल्या मिश्रा यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण त्याच राज्यातल्या शैक्षणिक संस्थांत झाले. उच्च गुणवत्तेसह कायद्याची पदवी घेतल्यावर 1977 मध्ये त्यांनी ओरिसा उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. दिवाणी, फौजदारी कायदे आणि  घटना तज्ञ असा त्यांचा अल्पावधीतच लौकिक झाला. वकिली व्यवसाय करताना त्यांनी अनेक गोरगरिबांचे दावे आणि खटले मोफतही चालवले होते. कायदे पंडित अशी प्रसिद्धी आणि दबदबा निर्माण करणार्‍या मिश्रा यांची 1990 मध्ये ओरिसा उच्च न्यायालयात हंगामी न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. अवघ्या दोन वर्षातच ते या पदावर कायमही झाले. 2009 मध्ये त्यांची पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बदली झाली. अवघ्या वर्षभरातच ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आणि 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले.
त्यांचे काका रंगनाथ मिश्रा हे 1990 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. काका-पुतणे सरन्यायाधीश झाल्याचा हा योगायोग भारतीय न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच घडला आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर असताना, त्यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकारने सरकारी नोकर्‍यात आरक्षणानुसार बढत्या द्यायचा घेतलेला निर्णय रद्दबातल ठरवला होता. दिल्लीच्या पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यावर 24 तासाच्या आत ती फिर्याद वेबसाईटवर दिली पाहिजे, असा आदेश त्यांनीच काढला होता. पोलिसांना कायदेशीर अधिकार असले, तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच त्यांना करता येणार नाही, असाही निर्णय त्यांनी एका प्रकरणात दिला होता. मुंबई बाँब खटल्यातला सूत्रधार याकूब मेमन याने फाशीला स्थगिती द्यायच्या केलेल्या  याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात रात्रभर सुनावणी घेऊन, ही याचिका न्या. मिश्रा यांनीच फेटाळली होती. दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही आरोपींनी फाशीच्या शिक्षेविरुद्ध केलेली याचिकाही त्यांनीच फेटाळली होती. चित्रपटगृहात ‘वंदे मातरम्’चे गान सुरू असताना सर्व प्रेक्षकांनी उभे राहिलेच पाहिजे, असा आदेश त्यांनीच दिला होता. राज्यघटना आणि कायद्याचा प्रचंड अभ्यास, व्यासंग असलेल्या न्या. मिश्रा यांचा इंग्रजी साहित्याचा अभ्यासही खूप मोठा आहे. न्यायालयाच्या स्वातंत्र्याचे समर्थन करणार्‍या न्या. मिश्रा यांच्या या नव्या नियुक्तीने, भारतीय न्याय मंदिराची प्रतिष्ठा वाढली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: