Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डोकलाममध्ये भारताकडून सैन्य, शस्त्रसामग्रीत वाढ
ऐक्य समूह
Saturday, August 12, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: mn1
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : भारत, चीन आणि भूतान यांच्यातील तिहेरी सीमेवर डोकलाम येथे चिनी सैन्याकडून सुरू असलेल्या रस्तेबांधणीला भारतीय सैन्याने कडवा विरोध केल्याने चीनकडून सातत्याने युद्धाच्या धमक्या दिल्या जात असतानाच भारतीय लष्कराकडून कोणताही गाजावाजा न करता या भागात सैन्यबळ आणि शस्त्रसामग्री वाढवली जात आहे. जवळपास दोन महिने सुरू असलेल्या या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी मार्गाने प्रयत्न सुरू असतानाच तेथील आपले स्थान भारतीय लष्कराकडून बळकट करण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि चिनी सैन्याच्या मेजर जनरल दर्जाच्या अधिकार्‍यांची डोकलाम प्रश्‍नी नथुला पास येथे शुक्रवारी प्रथमच ध्वजबैठक झाली. ही कोंडी फोडण्यासाठी 8 ऑगस्ट रोजी ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकार्‍यांमधील ध्वजबैठक निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा नव्याने बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मेजर जनरल दर्जाच्या अधिकार्‍यांमध्ये झालेली ध्वजबैठकही निष्फळ ठरली आहे. या भागातून भारताने सैन्य मागे घ्यावे, या भूमिकेवर ठाम राहिलेल्या चीनकडून अडेलतट्टूपणा सुरूच आहे. त्यावर भारतानेही ठाम भूमिका घेतली आहे. चिनी सैन्याने या भागात रस्तेबांधणीसाठी आणलेले बुलडोझर व इतर यंत्रसामग्री काढून  घ्यावी, अशी मागणी भारताने केली आहे. आता दोन्ही बाजूंचे लष्करी अधिकारी आपापल्या मुख्यालयांना या बैठकीतील चर्चेची माहिती देतील. लष्करातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांमध्ये झालेल्या या बैठकीमुळे एकमेकांची बाजू समजून घेण्याचे आणि या वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न अजून संपले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, भारतीय लष्कर गाफील राहिलेले नाही. भारताने डोकलाम व आजूबाजूच्या भागात हळूहळू सैन्याची कुमक आणि अवजड शस्त्रसामग्री जमवण्याचे काम कोणताही गाजावाजा न करता सुरू ठेवले आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमधील सीमा भागात असलेल्या सैन्याला कोणत्याही क्षणी कारवाईसाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लेह-लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत चीनबरोबर असलेल्या 4,057 कि.मी. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील भारतीय लष्कराच्या अन्य ठाण्यांनाही कृतीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ईशान्य भागात सुकमा येथील 33 कॉर्प्सचे मुख्यालय, गंगटोक येथील 17 कॉर्प्सचे मुख्यालय, कलिमपाँग येथील 27 कॉर्प्सचे मुख्यालय, बिन्नागुडी येथील पर्वतीय विभागाचे मुख्यालय यांना आणीबाणीच्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रत्येक डिव्हिजनमध्ये दहा ते पंधरा हजार अधिकारी व सैनिक आहेत. त्यांना अतिउंचीवरील वातावरणाचा सराव आहे, असे सूत्रांनी सांगितले. दिनापूर येथील 3 कॉर्प्स आणि तेजपूर येथील 4 कॉर्प्स यांच्यासह त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या तोफखाना, पर्वतीय डिव्हिजन, हवाई दलाचे ईशान्येकडील सर्व तळ यांना कोणत्याही क्षणी कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आणि या भागात नियमित हवाई गस्त घालण्याण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चीनने तैवानमध्ये आपले सैन्यबळ व शस्त्रसामग्री वाढवण्यास सुरुवात केल्याने भारतानेही आपली ताकद वाढवण्याच्या हाचलाली वेगाने सुरू ठेवल्या आहेत. दरम्यान, संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आजच लोकसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना भारतीय सैन्य कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. चीनकडून भारताला धमकवण्यासाठी सातत्याने सरकारी माध्यमांचा वापर सुरू असला तरी भारताने मात्र याबाबत शांतपणे आपल्या हालचाली सुरू ठेवल्या आहेत.
स्वराज व भूतानच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट
दरम्यान, डोकलाम येथे संघर्ष सुरू असतानाच भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भूतानचे परराष्ट्रमंत्री डामचो दोरजी यांची भेट घेऊन या प्रश्‍नावर चर्चा केली. ‘बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन (बिमस्टेक) परिषद नेपाळची राजधानी काठमांडू येथे होत असून या परिषदेला स्वराज उपस्थित आहेत. या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी दोरजी यांची भेट घेतली. या भेटीत डोकलाम प्रश्‍नी सखोल चर्चा झाल्याचे समजते. जवळचा मित्र आणि सख्खा शेजारी असलेल्या भूतानच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर स्वराज यांची चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: