Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्यावर पोलीस ठाण्यातच हल्ला
ऐक्य समूह
Saturday, August 12, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: re1
धस यांचा जबडा तुटून चार दात निकामी; माथेफिरू हल्लेखोर ताब्यात
5फलटण, दि.11 : गुन्ह्याच्या चौकशीसाठी  बोलविण्यात आलेल्या संशयिताने शहर पोलीस ठाण्यातच पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्यावर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. संशयिताने चेहर्‍यावर हाताच्या मुठीने ठोसे लगावल्याने धस यांचा जबडा तुटला असून चार दात निकामी होवून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना येथील निकोप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. संशयिताचे नाव रणदिवे असल्याचे समजते. मात्र, त्याचे पूर्ण नाव समजू शकले नाही.
याबाबत शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरातील एक हातगाडीवाला तक्रार घेवून आल्यानंतर त्याची तक्रार असलेल्या संशयित तरुणाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक केबिनमध्ये पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांना फिर्यादी आपले म्हणणे सांगत असतानाच संशयित तरुणाला पोलीस कर्मचार्‍यांनी पोलीस ठाण्यात आणले. पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी त्याला तुझ्याविरुद्ध तक्रार असल्याचे सांगताच, कोणाची तक्रार आहे, अशी विचारणा करत संशयिताने पोलीस निरीक्षक धस यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांच्या चेहर्‍यावर हाताने फाईट लगावली. त्यामुळे धस यांचा जबडा तुटून त्यांचा चेहरा रक्तबंबाळ झाला. गंभीर जखमी झालेल्या धस यांना तातडीने निकोप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. जे. टी. पोळ, डॉ. तेजस भगत, डॉ. निकम आणि निकोप हॉस्पिटलच्या ट्रॉमा टीमने तातडीने उपचार करून रक्तस्राव थांबविण्यात यश मिळविले. त्यानंतर धस यांचा संपूर्ण चेहरा व डोक्याचे स्कॅनिंग करून प्रत्यक्ष मार लागल्याची किंवा फ्रॅक्चरसंबंधी खात्री करून घेवून त्याप्रमाणे पुढील उपचार सुरू केले आहेत.     
पोलीसांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ही बातमी शहरात वार्‍यासारखी पसरली आणि निकोप हॉस्पिटलकडे मोठ्या संख्येने शहरवासीय दाखल झाले. अनेकांनी धस त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मात्र, गर्दी वाढू लागल्यानंतर डॉक्टरांनी प्रकाश धस यांना भेटण्यास सर्वांनाच मज्जाव केला. पोलीस निरीक्षक धस यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांना तूर्त कोणीही भेटू नये, अशी विनंती पोलिसांनी लोकांना केली.
अनेक संस्था, संघटना आणि व्यक्तींनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख किशोर पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे फलटणमध्ये दाखल झाले असून त्यांनी प्रकाश धस आणि डॉक्टरांची भेट घेवून चौकशी केली. डॉक्टरांना तातडीने सर्व उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डॉ. जे. टी. पोळ व त्यांचे सहकारी उपचार करत असून धस यांची प्रकृती सुधारत आहे.
याबाबत शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अधिक तपशील समजू शकला नाही. शहरात शांतता असून कायदा व सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीसांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: