Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘आधारसक्ती’ला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
ऐक्य समूह
Thursday, August 31, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: na1
केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांसाठी आधारकार्ड सक्तीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. त्यानंतर आधारच्या वैधतेच्या प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अमितवा रॉय अणि न्या. ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर बुधवारी आधार प्रकरणी दाखल असलेल्या विविध याचिकांवर सुनावणीझाली. त्यामध्ये केंद्र सरकार आधारसक्तीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देईल, असे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितल्यावर या प्रकरणी तातडीची सुनावणी आवश्यक नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. ही सुनावणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, असे खंडपीठाने सांगितले.
विविध याचिकाकर्त्यांच्यावतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी या प्रकरणी तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली असता केंद्र सरकार आधार क्रमांक सादर करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देईल, असे वेणुगोपाल यांनी सांगितले. त्यावर आता तातडीच्या सुनावणीची गरज नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. 
आधारच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयात 2015 पासून विविध याचिकांवर सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. या प्रकरणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी झाली असता गोपनीयतेच्या मुद्द्याची सुनावणी नऊ सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली होती. गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा निकाल नऊ सदस्यीय घटनापीठाने 24 ऑगस्ट रोजी दिला होता. या निकालाचा आधारशी संबंधित सुनावणीवर परिणाम होईल, असे बोलले जात होते. घटनापीठाच्या या निकालाचा विचार आधारशी संबंधित याचिकांच्या सुनावणीत करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
कल्याणकारी योजनांसाठी केंद्र सरकारने आधार कार्ड बंधनकारक केले असून आधार कार्ड नसलेल्या नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्याची माहिती सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: