Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पॅन-आधार जोडणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
ऐक्य समूह
Friday, September 01, 2017 AT 11:19 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 31 (वृत्तसंस्था) : पॅन आणि आधार क्रमांक जोडणीला आणखी चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारने ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या आधी पॅन व आधार क्रमांक जोडण्यासाठी करदात्यांना आजची (31 ऑगस्ट) शेवटची मुदत होती. ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता होती. मात्र, केंद्र सरकारने या जोडणीला चार महिन्यांची मुदतवाढ दिल्याने करदात्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.
सरकारी लाभाच्या सर्व योजनांसाठी आधारसक्तीच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकांच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत केंद्र सरकारने त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल, असे बुधवारीच सांगितले होते. त्यामुळे पॅन आणि आधार जोडणीलाही मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
प्राप्तिकर कायद्यातील कलम 139 अअ (2) अन्वये 1 जुलै 2017 पर्यंत आधारक्रमांक मिळालेल्या किंवा हा क्रमांक मिळण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक करदात्याने आपला आधारक्रमांक पॅन क्रमांकाशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामध्ये अनिवासी भारतीय नागरिक, 80 वर्षांवरील नागरिक आणि आसाम, मेघालय व जम्मू-काश्मीर येथील रहिवाशांना त्यातून वगळण्यात आले आहे.
ज्यांच्याकडे आधारक्रमांक नाही, त्यांना ऑनलाइन प्राप्तिकर विवरणपत्रे भरता येतील. मात्र, त्यांनी आधारक्रमांक प्राप्तिकर विभागाला कळवेपर्यंत या विवरणपत्रांवर पुढील प्रक्रिया होणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले होते. अर्थात त्यासाठी व्यक्तिगत करदात्यांना 5 ऑगस्टपर्यंतच  प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची मुदत होती.
आता करदात्यांना ई-फायलिंगसाठी आधार-पॅन जोडणी करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर बँक खाते आधारशी जोडण्यासाठीही 31 डिसेंबर हीच अंतिम मुदत आहे.
पॅन-आधार जोडणीचे फायदे
तुमचा पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडला असेल तर नवीन बँक खाते सहज उघडता येईल. गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर बाजाराचा विचार करत असाल तर कुठल्याही म्युच्युअल फंडाच्या युनिट खरेदीसाठी आणि डीमॅट खाते उघडणे यामुळे सोपे जाईल. नवीन डेबिट अथवा क्रेडिट कार्ड घेणेही सोयीचे ठरणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: