Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार
ऐक्य समूह
Saturday, September 02, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: mn1
5नवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुचर्चित फेरबदल रविवार, दि.3 रोजी सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या मंत्र्यांचा शपथविधी समारोह राष्ट्रपती भवनात सकाळी 10 वाजता होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पहिल्यांदाच मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. शपथ-ग्रहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात तयारी सुरू करण्यात आली आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेवून तचेच 2019 ची निवडणूक पाहता मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत आहे. मे 2014 मध्ये केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा हा मंत्रिमंडळातील तिसरा फेरबदल आहे. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारी रात्री राजीवप्रताप रुडी, संजीवकुमार बालियान, फग्गनसिंह कुलस्ते आणि महेंद्रनाथ पांडे यांनी राजीनामा दिला आहे. सूत्रांनुसार  याशिवाय आणखी दोन कॅबिनेट मंत्र्यांनीही राजीनामे सादर केले आहेत. त्याचबरोबर इतर काही मंत्र्यांनीही राजीनामे देण्याची तयारी दर्शवली असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री उमा भारती, राधामोहन सिंह, गिरिराज सिंह, कलराज मिश्रा, निर्मला सीतारमण यांनीही आपले राजीनामे सादर केले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंतप्रधान मोदी हे ब्रिक्स संमेलनात सहभागी होण्यासाठी चीनच्या दौर्‍यावर जाणार आहेत. गुजरात, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला अमित शहा लागले आहेत. त्या दृष्टीने पक्षातील मरगळ दूर करून उत्साह आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. या तिन्ही राज्यात केंद्रीय मंत्री राहिलेल्या भाजप नेत्यांना शहा हे महत्त्वाची भूमिका देण्याची शक्यता आहे.
दिल्लीत चर्चेला उधाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या धक्कातंत्रामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार यावरून दिल्लीत राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा सुरू आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक दिग्गजांच्या खात्यात बदल होणार असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. मात्र कोणाला, कोणते खाते मिळेल, याबद्दलची माहिती सध्याच्या घडीला तरी केवळ मोदी आणि शहा या दोघांच्याकडेच आहे.
तरीही ल्युटन्स झोनमध्ये चर्चांना उधाण आले आहे. रेल्वे मंत्रालय नितीन गडकरी यांच्याकडे देण्याची चर्चा होती. मात्र आता नगर विकास मंत्रालयाची जबाबदारी त्यांना दिली जाईल, अशी चर्चा आहे.
सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापती आणि चीनकडून वारंवार केल्या जाणार्‍या कुरघोड्या या पार्श्‍वभूमीवर देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्र्याची आवश्यकता आहे. ही जबाबदारी सुषमा स्वराज यांच्याकडे दिली जाऊ शकते. पण सुषमा स्वराज यांनी ते मंत्रिपद स्वीकारले पाहिजे. तसे झाल्यास सुरेश प्रभू यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार दिला जाईल. प्रभूंनी परराष्ट्र मंत्रालय स्वीकारल्यास त्यांच्या रेल्वे मंत्रालयाची धुरा नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात येईल, असे बोलले जाते.
व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचे नगरविकास खाते कोणाकडे दिले जाणार याबद्दल उत्सुकता आहे. नायडूंनी उपराष्ट्रपतिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर नगरविकास खात्याला स्वतंत्र मंत्री देण्यात आलेला नाही. स्मार्ट सिटी हा मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प याच खात्याकडे येतो. या खात्याची जबाबदारीदेखील नितीन गडकरींना दिली जाईल, अशी चर्चा आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींसह भाजपवर वारंवार टीका करणार्‍या, राज्यात सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा करणार्‍या शिवसेनेला शांत करण्याचा प्रयत्न मोदींकडून मंत्रिमंडळ विस्ताराद्वारे केला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेला एक खाते दिले जाईल, अशी चर्चा आहे. या जागेवर आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे किंवा अनिल देसाई यापैकी एकाची वर्णी लागू शकते. मोदींनी यापूर्वी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनिल देसाईंना स्थान देण्यात येणार होते. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना दिल्लीला न जाण्याची सूचना केल्याने अनिल देसाईंना मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले होते. कर्नाटकमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर कर्नाटकला मंत्रिमंडळात स्थान देण्याचा मोदींचा प्रयत्न असेल. यासाठी सुरेश अंगडी आणि शिवकुमार उदासी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी शक्यता आहे. बिहारमध्ये भाजपशी हातमिळवणी करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाल्याचा फायदा संयुक्त जनता दलाला मिळू शकतो. संयुक्त जनता दलाच्या आर. सी. पी. सिंह, कहकशा परवीन या दोघांना मंत्रिमंडळ विस्तारात जागा दिली जाऊ शकते तर मध्य प्रदेशातून प्रल्हाद सिंह पटेल यांना संधी मिळू शकते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: