Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अफवेमुळे सातार्‍यातील पोलीस बंदोबस्तात वाढ
ऐक्य समूह
Saturday, September 02, 2017 AT 11:36 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 1 : सातार्‍यात गेल्या काही दिवसात ‘खा.उदयनराजे भोसले यांना दि. 1 सप्टेंबर रोजी अटक होण्याची शक्यता’, या अफवेमुळे शुक्रवार, दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून राजवाडा परिसर, पोवई नाका व जिल्हा न्यायालयासह ठिकठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरणात शुक्रवारी न्यायालयात आरोप निश्‍चिती करण्यासाठी तारीख  होती. मात्र, ही सुनावणी आता दि. 16 सप्टेंबर रोजी  होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खा. उदयनराजे भोसले यांच्यासह बारा जणांवर मार्च महिन्यामध्ये सातारा शहर पोलीस ठाण्यात शिरवळ   येथील कंपनीच्या उद्योजकाला खंडणी मागून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. शहर पोलिसांनी सुरुवातीला यातील दहा संशयित आरोपींना अटक केली होती. खा. उदयनराजे यांचेही एफआयआरमध्ये नाव होते. तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर खा. उदयनराजे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले. त्याच दिवशी त्यांना जामीन झाला होता. त्याच गुन्ह्यातील सुमारे दहा संशयितांचे आरोपपत्र तयार झाले असून आरोप निश्‍चितीसाठी शुक्रवारी न्यायालयात नियमित सुनावणी होती. मात्र या तारखेवरून सातार्‍यासह राज्यभरात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर ‘खा. उदयनराजे भोसले यांना दि. 1 सप्टेंबर रोजी अटक होण्याची शक्यता...चलो सातारा कोर्ट’, असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या मेसेजमुळे सातारा पोलीस दलामध्ये खळबळ उडाली होती. मेसेज पसरत गेल्याने 1 सप्टेंबर रोजी खा. उदयनराजेंना का व कशासाठी अटक केली जाणार असा पोलिसांसह सर्वांनाच प्रश्‍न पडला होता. अखेर पोलिसांना संबंधित मेसेज खोटा असून तो पसरवू नये, असे आवाहन करण्याची वेळ आली. शहरातील प्रमुख ठिकाणे, चौक व महामार्ग येथे तब्बल 300 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात होता. कराड, फलटण येथील पोलिसांचाही बंदोबस्तामध्ये समावेश होता. अचानक पोलीस बंदोबस्त वाढवला गेल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती.  दुपारी 1 नंतर हळूहळू पोलीस बंदोबस्त कमी करून तो ज्या, त्या ठिकाणी रवाना करण्यात आला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: