Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ऑगस्ट वेस्टलँड घोटाळा
ऐक्य समूह
Saturday, September 02, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: na2
माजी हवाईदल प्रमुख त्यागींसह 9 जणांवर आरोपपत्र दाखल
5नवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) ः गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यासह 9 जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.
त्यागी यांचे चुलत भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांच्या विरोधातही आरोपपत्र दाखल केले आहे. माजी हवाईदल प्रमुख त्यागी यांना 9 डिसेंबर रोजी या प्रकरणी अटक करण्यात आली होती. नंतर 26 डिसेंबरला त्यांना जामीनही मिळाला होता. त्यागी आणि इतर आरोपींनी ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणात लाच घेतल्याचा सीबीआयने आरोप केला आहे. हेलिकॉप्टर उत्पादकाला 53 कोटी डॉलरचे कंत्राट मिळण्यासाठी या सर्वांनी मदत केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
भारताने इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून ‘एडब्ल्यू 101’ जातीची 12 हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार 2010 मध्ये केला होता. हा करार 3,546 कोटी रुपयांचा होता. त्यातील 8 हेलिकॉप्टर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी तर 4 अन्य कारणांसाठी वापरली जाणार होती.
पूर्वीची रशियन एमआय-8 ही हेलिकॉप्टर आता कालबाह्य ठरू लागल्याने ती बदलण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.  1999 मध्ये प्रथम ही मागणी झाली. 2005 मध्ये त्यासाठी निविदा जाहीर करण्यात आल्या. या पहिल्या निविदांमध्ये 6000 मीटर उंचीवर काम करू शकतील अशी हेलिकॉप्टर हवी असल्याची अट घालण्यात आली होती. उंचीची (सर्व्हिस सीलिंग) ही अट संरक्षण मंत्रालयाने 2006 मध्ये शिथिल करून 4500 मीटरवर आणली. त्यामुळे या स्पर्धेतील अमेरिकेच्या सिकोस्क्री कंपनीच्या ‘एस-92 सुपरहॉक’ हेलिकॉप्टरची संधी हुकली असे म्हटले जाते. निवडीसाठीच्या या अटी बदलल्याने इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला फायदा झाला आणि अटी बदलण्यात हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल एस. पी. त्यागी यांचा हात असल्याचा संशय आहे. भारताने 1 जानेवारी 2014 रोजी हा करार रद्द केला. तोपर्यंत करारातील 3 हेलिकॉप्टर भारताला मिळाली होती. करार रद्द होईपर्यंत भारताने कंपनीला 1620 कोटी रुपये दिले होते आणि जानेवारी 2014 मध्ये भारतीय बँकांमध्ये हमी म्हणून ठेवलेले 250 कोटी रुपये परत घेतले होते. इटलीत जून 2014 मध्ये नुकसानभरपाईचा दावा जिंकल्यानंतर भारत सरकारने इटलीतील बँकांमध्ये ठेवलेली 1818 कोटी रुपयांची हमीची रक्कम परत मिळवली. आजपर्यंत भारताने या व्यवहारातील एकूण 2068 कोटी रुपये वसूल केले आहेत. त्यागी यांच्या चुलत भावांना 2004 मध्ये खात्री पटली, की त्यागी त्यापुढचे हवाई दलप्रमुख होतील. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या मध्यस्थांबरोबर संधान बांधण्यास सुरुवात केली. सीबीआयच्या तपासात त्यागी कंपनीच्या अधिकार्‍यांना भेटल्याचे पुरावे सापडले आहेत. सीबीआयच्या आरोपांनुसार त्यागी यांना ट्युनिशियात नोंदणी असलेल्या कंपन्यांकडून भारत आणि मॉरिशसमधील बँक खात्यांमधून पैसे पोहोचवण्यात आले. या कंपन्या स्वित्झर्लंडमधील मध्यस्थ ग्विडो हॅष्के आणि कालरे गेरोसा यांच्याकडून चालवल्या जात होत्या. त्यागी यांना त्यांच्या संजीव, संदीप व राजीव या भावांमार्फत लाच मिळाली असा आरोप होता. गेल्या ऑक्टोबरमध्ये ईडीने भारतात त्यांची मालमत्ता जप्त केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: