Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वीरपत्नी स्वाती महाडिक आज लेफ्टनंटपदी रुजू होणार
ऐक्य समूह
Saturday, September 09, 2017 AT 11:14 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 8 : गेले 11 महिने चेन्नई येथे अत्यंत खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण करत पोगरवाडीचे जिगरबाज शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी स्वाती महाडिक या दि. 9 सप्टेंबरला लेफ्टनंटपदी रुजू होत आहेत. सैन्य- दलातील हुतात्मा कर्नल यांची पत्नी सैन्यदलातच रुजू होण्याची ही बहुदा पहिलीच घटना असावी. या घटनेने क्रांतिकारकांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मणीगाह भागात अतिरेक्यांशी लढताना कर्नल संतोष महाडिक यांना दि. 17 नोव्हेंबर 2015 रोजी  वीरमरण आले होते. कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरमरणानंतर खचून न जाता आपल्या असामान्य धैर्याने स्वाती महाडिक यांनी भारतीय सैन्यदलात जाण्याचा नुसता मनोदयच केला नाही तर लष्करांकडून दिलेल्या जवानांच्या विधवा पत्नींच्या सवलतीनुसार सर्व परीक्षा दिल्या. त्यात त्या यशस्वी झाल्या. सुरुवातीलाच त्यांनी शासनाकडून किंवा सैन्यदलाकडून मला सहानुभूती नको, माझी अन्य कोणती मागणीही नाही. मला फक्त भरती प्रक्रियेसाठी असणारी वयाची अट शिथिल करावी, अशी विनंती केली होती.
शहीद कर्नल संतोष महाडिक यांना देशसेवेचे दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वत:ला त्यासाठी सिद्ध केले होते. ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी चेन्नई येथील अ‍ॅकॅडमीत  प्रवेश मिळवला. कर्नल संतोष महाडिक हुतात्मा होण्याआधी स्वाती शिक्षकी पेशात कार्यरत होत्या. पतीला वीरमरण आल्यानंतर त्यांचे अवघे आयुष्यच बदलून गेले. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या श्रीमती स्वाती महाडिक यांनी ज्या परिस्थितीत सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला, तो अत्यंत परिश्रमपूर्वक तडीस नेला. शहीद कर्नल संतोष महाडिक यांनी ज्या निडरपणे अतिरेक्यांशी लढा दिला त्या शौर्याला अवघ्या देशाने गौरवले.
कर्नल पदावरील अधिकारी जवानांच्या खांद्याला खांदा लावून लढत होता. कर्नल पदावरील अधिकारी हुतात्मा होण्याची घटना दुर्मीळ असते. त्यामुळे कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरमरणाला विशेष महत्त्व आहे. त्यातच वीरपत्नी स्वाती महाडिक यांनीही देशसेवेचे व्रत हाती घेवून सैन्यातच करिअर घडवण्याची केलेली भीष्म प्रतिज्ञा आणि त्यात मिळवलेले यश अत्यंत महत्त्वाचे आहे. लहानगा स्वराज्य आणि कार्तिकी या मुलांना दूर ठेवून अफाट क्षमता असलेल्या स्वाती महाडिक यांनी महिलावर्गासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची देहू येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: