Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यातील 26 अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार
ऐक्य समूह
Saturday, September 09, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: mn1
नदीजोड प्रकल्पांसाठी 55 हजार कोटींचा खर्च
राज्याची सिंचन क्षमता 40 टक्क्यांपर्यंत वाढवणार

5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलात जलसंपदा खात्याचा कार्यभार आलेल्या नितीन गडकरी यांनी आज राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. राज्याला भरीव निधी देऊन अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील 26 सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सिंचनात मागे असलेल्या महाराष्ट्राची क्षमता 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे. राज्यात दोन नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार असून दमणगंगा-पिंजाळ आणि नार-तापी-नर्मदा या नदीजोड प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून 55 हजार कोटी दिले जातील, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली.
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मंत्रिमंडळ फेरबदलात जलसंपदा व गंगा शुद्धीकरण खात्याची धुरा सोपवण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत आपल्याकडील खात्याचा अधिकाधिक फायदा महाराष्ट्राला देऊन गडकरी यांनी भरीव निधी दिला आहे. आता जलसंपदा खात्याच्या माध्यमातून राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याबरोबरच दोन मोठे नद्याजोड प्रकल्प सुरू करण्याची भूमिका गडकरी यांनी घेतली आहे. त्यांनी आज मुंबईत येऊन राज्याच्या सिंचन प्रकल्पाच्या सद्य स्थितीचा आढावा घेतला. राज्यातील सगळे जिल्हाधिकारीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या या बैठकीनंतर नितीन गडकरी व मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत पुढील योजनांची माहिती दिली.
देशभरात पाच नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यातील दोन प्रकल्प महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये राबविण्यात येणार आहेत. नार-तापी-नर्मदा प्रकल्प हा गुजरात-महाराष्ट्र यांच्यातील करारात अडकला होता. त्यावरही तोडगा निघाला आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी महराष्ट्राकडून एक हजार कोटी तर गुजरातकडून एक हजार कोटी देण्यात येणार आहेत. उर्वरित 18 हजार कोटी केंद्र सरकारकडून देण्यात येतील. महाराष्ट्रातील दमगणगंगा-पिंजाळ प्रकल्पासाठीही केंद्राकडून निधी देण्यात येणार असून या प्रकल्पांसाठी एकूण 55 हजार कोटींचा निधी केंद्राकडून देण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे मराठवाडा, पश्‍चिम महराष्ट्र, विदर्भातील सिंचनाचा प्रश्‍न सुटणार आहे. सिंचनासाठी केंद्राकडून नदी, नाले रुंदीकरण, बंधार्‍यांचे बांधकाम, कालव्यांची निर्मिती, कालव्यांऐवजी थेट पाइपलाइनने ड्रिपिंग पद्धतीने शेतकर्‍यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे गडकरी म्हणाले.
26 प्रकल्प पूर्ण करणार
राज्यात अपूर्णावस्थेत असलेले 26 सिंचन प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत.  
या 26 प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आला आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक हजार कोटींचा निधी व आवश्यक तेवढे कर्ज केंद्राकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया 15 ते 20 दिवसांत पूर्ण होऊन हे प्रकल्प मार्गी लावले जातील. या प्रकल्पांमध्ये पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकणातील प्रकल्पांचाही समावेश असेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली.
मुंबईचे रस्ते माझ्याकडे नाहीत
मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून गडकरी यांनी शिवसेनेला टोला लगावण्याची संधी साधली. मुंबईचे रस्ते माझ्या अंतर्गत येत नाहीत, हे दुर्दैव आहे; पण या रस्त्यांच्या कामासाठी केंद्र सरकार वाट्टेल ती मदत करायला तयार असल्याचे आपण उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे गडकरी म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: