Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

अमेरिकेतले हत्याकांड
vasudeo kulkarni
Wednesday, October 04, 2017 AT 11:38 AM (IST)
Tags: ag1
अमेरिका म्हणजे जगातला सर्वात सुखी-समृद्ध-श्रीमंत देश अशा समजुतीत या देशाचे गोडवे गाणार्‍यांना, अमेरिकेचे विकृत स्वरूप-अंतरंग लास वेगास शहरात एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार करून 58 निरपराध्यांचे मुडदे क्रूरपणे पाडल्याच्या, चारशे जणांना जखमी केल्याच्या घटनेने पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. जगातली आर्थिक आणि लष्करी महासत्ता अशी बिरुदावली मिरवणार्‍या अमेरिकेच्या सामाजिक स्वास्थ्याचे खरे रूप लास वेगास मधल्या घटनेने, जगाला समाजावे, अशी अपेक्षा आहे. कॅसिनो आणि जुगारासाठी जगप्रसिद्ध असलेल्या लास वेगासमधल्या मंडाले बे कॅसिनोच्या जवळच तीन दिवसांच्या संगीत सोहळ्याचा कार्यक्रम होता. रविवारी शेवटच्या दिवशी तिथल्या स्थानिक वेळेनुसार साडेदहा वाजण्याच्या दरम्यान मंडाले बे च्या 32 व्या मजल्यावरच्या बाल्कनीतून स्टिफन पॅडॉक या विकृत हल्लेखोराने, 13 एकर क्षेत्रातल्या खुल्ल्या मैदानात संगीताचा आनंद लुटणार्‍या हजारो रसिकांवर 15 मिनिटे अंदाधुंद गोळीबार सुरू ठेवल्याने, किड्या मुंग्यांसारखी माणसे मारली गेली. बंदुकीच्या गोळ्या लागल्याने गंभीर जखमी-रक्तबंबाळ झालेले स्त्री-पुरुष आणि मुले जिवाच्या आकांताने, जीव वाचवायसाठी सैरावैरा धावायला लागली. या प्रचंड मैदानावर त्या दिवशी 22 हजाराच्या वर रसिकांची उपस्थिती होती आणि जेसन एल्डीन हा गायक अमेरिकन रसिकांना आवडणार्‍या किंचाळ्या स्वरात-टाहो फोडत गात असतानाच शेजारच्या कॅसिनोच्या 32 व्या मजल्यावरून सुरू झालेल्या अंदाधुुंद गोळीबार सुरू झाला. नेमका गोळीबार कुठून होत आहे, हे ही लोकांना आणि पोलिसांनाही समजले नाही. असे काही घडेल, अशी कल्पनाही संगीताचा आनंद लुटायसाठी आलेल्या आणि बेधुंद झालेल्या रसिकांना नव्हता. मशीनगनने हजारो गोळ्यांचा वर्षावच जमावावर झाला आणि अवघ्या पंधरा मिनिटात या मृत्युकांडात 58 जणांचे बळी गेले. हल्लेखोर स्टिफन पॅडक याने आत्महत्या केली, की पोलिसांच्या गोळीबारात तो मारला गेला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा हल्लेखोर नक्कीच विकृतीने पछाडलेला असावा आणि त्याने अत्यंत नियोजनपूर्वक हा हल्ला चढवला असावा, असा निष्कर्ष पोलिसांनी प्राथमिक तपासात काढला आहे. या गोळीबाराने मैदानाचे रूपांतर बघता बघता स्मशान- भूमीत झाले आणि मानवी रक्ताच्या चिखलाने, किंकाळ्यांनी हा सारा परिसर शोकसागरात बुडाला. कॅसिनोच्या 32 व्या मजल्यावरच्या हल्लेखोर पॅडाकच्या खोलीची पोलिसांनी झडती घेतली तेव्हा त्यांना त्याने आणलेल्या आठ बंदुका आणि गोळ्यांचा प्रचंड साठाही सापडला. त्याने असे हत्याकांड का घडवले असावे, हे पोलिसांना आता समजू शकणार नाही. कारण तो ही ठार झाला आहे. पण, अट्टल झुगारी असलेला पेडाक अकौंटंट पदावरून निवृत्त झाला होता आणि तो आपली ऑस्ट्रेलियन मैत्रिण-मेरलो डेनली हिच्याबरोबर राहात होता, असे समजले आहे. पेडाकचा बाप अट्टल गुन्हेगार होता आणि त्याच्यावर बँक लुटल्याबद्दलच्या गुन्ह्यात रेड कॉर्नर नोटीस काढली गेल्याचे एफबीआय या अमेरिकन गुप्तचर संघटनेचे म्हणणे आहे. या हल्ल्याची जबाबदारी धर्मांध इस्लामी दहशतवादी संघटना-इसिसने घेतली असली, तरी एफबीआयने मात्र हा दावा अद्यापही मान्य केलेला नाही.

गुन्हेगारांचे नंदनवन
अमेरिकेने भौतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात केलेली प्रचंड प्रगती, भक्कम अर्थव्यवस्था, सुख समृद्धीची विपुल साधने, श्रीमंती राहणीमान आणि संस्कृतीची प्रशंसा जगभर नेहमीच होते. अमेरिकेत राहून आलेले भारतीय तर तिथल्या प्रगती-समृद्धीची तोंड फाटेपर्यंत प्रशंसा करतात. जगातले नंदनवन म्हणजे अमेरिकाच असे भारतीयांसह जगातल्या समृद्धीची, सुखी-चैनबाजीच्या जीवनाची ओढ असलेल्या लोकांना वाटते. पण प्रत्यक्षात मात्र जगाला शांततेच्या उपदेशाचे डोस पाजणार्‍या आणि शांततेच्या नावाखाली मागास, गरीब राष्ट्रांना युद्धखोर बनवणार्‍या या अमेरिकेची समाजव्यवस्थाही किडलेली, सडलेली आणि विकृत आहे, हे मात्र पद्धतशीरपणे विसरले जाते. समृद्धीच्या आड विकृतीच्या कर्करोगाने अमेरिकन समाज-व्यवस्था पोखरली गेली. चंगळवादी संस्कृतीने  या विकृतीला खतपाणी घातले गेले. परिणामी सरकारच्या मुक्त शस्त्र धोरणाने ही विकृती अधिकच वाढली आणि पोसली गेली. लास वेगासमध्ये घडलेल्या रक्तरंजित घटनेची निंदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असली, तरी याच ट्रम्प यांनी मुक्त शस्त्रास्त्रांच्या वापरावर बंदी आणायसाठी ओबामा यांनी काँग्रेसमध्ये आणलेल्या विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली होती. भारतातल्या शेतकर्‍यांच्याकडे शेतीच्या मशागतीसाठी खुरपे, कोयता अशी हत्यारे असतात, त्याच पद्धतीने 85 टक्के अमेरिकन नागरिकांच्याकडे बंदुका आहेत. बंदुकांच्या वापरावर सरकारचे कसलेही नियंत्रण नाही. दोन वर्षांपूर्वी ओरेगॉन कॉलेजमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेत 32 जणांचे बळी गेल्याची घटना घडली, तेव्हा ओबामा यांनी मुक्त शस्त्र वापरावर नियंत्रण आणायचा कायदा काँग्रेसमध्ये आणला होता. तेव्हा 70 टक्के सदस्यांनी विरोध करून, हे विधेयक हाणून पाडले. खुद्द ट्रम्प यांनी शस्त्रांच्या-बंदुकांच्या खुल्या वापराचे तेव्हा समर्थन केले होते. अमेरिकेतल्या जनतेकडे 31 कोटींच्यावर म्हणजे जगातल्या एकूण बंदुकांच्या संख्येतील 48 टक्के बंदुका आहेत. 66 टक्के अमेरिकनांच्याकडे एकापेक्षा अधिक बंदुका आहेत. दरवर्षी या देशात 55 लाख बंदुकांची विक्री होते आणि बंदुकांच्या विक्रीचा हा व्यवहार वार्षिक 96 हजार कोटी डॉलर्सवर जातो. बंदुका आणि पिस्तुलांची निर्मिती करणार्‍या कारखान्यांचा बंदुकांच्या वापरावर नियंत्रण आणण्यास कडाडून विरोध आहे. गेल्या 50 वर्षात या देशात बंदुकांच्या गोळीबार आणि चकमकीत 15 लाख लोकांचे बळी गेले आहेत. दरवर्षी बंदुकांच्या हल्ल्यात 12 हजारांचे मृत्यू होतात. हजारो लोक जखमी होतात. ही विकृत बंदूक संस्कृती समाजात खोलवर रुजली तर आहेच, पण शालेय विद्यार्थीही बंदुका, पिस्तुलांचा वापर करतात. अमेरिकेतल्या अनेक शाळात, शाळकरी मुलांनीच आपल्या मित्रावर शाळेच्या खोलीतच गोळीबार केल्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. 2014 मध्ये 32 कोटी लोकसंख्येच्या अमेरिकेत 37 कोटी लोकांच्या-कडे बंदुका होत्या आणि 14 हजार 219 लोकांचे बंदुकांनीच खून झाले होते. त्याच वर्षात झालेल्या 59 लाख गुन्ह्यात 6 लाख म्हणजे 10 टक्के गुन्हे बंदुकांच्या सहाय्याने झालेले होते. ज्या राष्ट्रात सर्वांनाच आपल्या जीविताच्या रक्षणासाठी बंदूक वापरायचा अधिकार आहे, त्या अमेरिकेत शहरी आणि ग्रामीण भागात सामाजिक विकृती, गुन्हेगारीही अशी सातत्याने वाढते आहे आणि या विकृतीच्या ज्वालामुखीच्या तोंडावरच हे समृद्ध राष्ट्र विनाशाच्या दिशेने वाटचाल करते आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: