Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

माजी मंत्र्यावर बलात्काराचा गुन्हा
vasudeo kulkarni
Wednesday, October 04, 2017 AT 11:43 AM (IST)
Tags: vi1
माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या अकाली दलाचे नेते सुच्चा सिंह लंगाह यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने, राज्यभर खळबळ उडाली आहे. पक्षाच्या गुरुदासपूर जिल्ह्याचे अध्यक्ष असलेल्या सुच्चा सिंह यांच्यावर एका महिलेने 2009 पासून सातत्याने धमक्या देत बलात्कार केल्याची फिर्याद गुरुदासपूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याकडे 29 सप्टेंबरला दिली होती. या फिर्यादीसोबत त्या पीडित महिलेने पुराव्यासाठी व्हिडिओ क्लिपही दिली होती. ही क्लिप वृत्तवाहिन्यांवरून प्रक्षेपित झाल्याने, या प्रकरणात सुच्चा सिंह चांगलेच अडकले. पोलीस आपल्याला अटक करतील, या भीतीने त्यांनी दोन दिवसांपूर्वी चंदीगडच्या जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करण्यासाठी वकिलामार्फत याचिका दाखल केली होती. पण, न्यायालयाने त्यांना ताब्यात घेण्याचा अधिकार या न्यायालयाच्या कार्यकक्षेच्या बाहेर असल्याचे सांगून त्यांनी गुरुदासपूरच्या न्यायालयात शरणागती पत्करावी असा, आदेश दिला. 2009 मध्ये या महिलेच्या पोलीस पतीचे निधन झाल्यावर अनुकंपा तत्त्वावर तिला पोलीस खात्यात गुन्हेगारी शाखेत नोकरी देण्यात आली. पीडित महिलेच्या असहाय्यतेची संधी साधत सुच्चा सिंह याने तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. तो धमक्या देऊन आपल्याला चंदीगड, कलानौर आणि अन्य ठिकाणी बोलावून घेत असे आणि बलात्कार करीत असे, असे या पीडित महिलेने प्रतिज्ञापत्राद्वारे नमूद केले आहे. न्यायदंडाधिकार्‍यांसमोर दिलेल्या जबाबातही तिने सुच्चा सिंह याने आपल्यावर केलेल्या बलात्काराची ठिकाणांचा तपशीलही दिला आहे. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच या पीडित महिलेने त्याला, या शारीरिक छळातून सुटका करावी अन्यथा पोलिसात फिर्याद करेन असे सांगून त्याला पुराव्याची ती व्हिडिओ फितही दाखवली होती. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. सुच्चा सिंहने या महिलेवर पुन्हा अत्याचार केले.
मंत्री होण्यापूर्वी सुच्चा सिंह यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. वडिलोपार्जित जमीन आणि घराशिवाय त्याची काही मालमत्ता, संपत्ती नव्हती. पण, मंत्री झाल्यावर मात्र गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती हडप केल्याच्या आरोपावरून त्याला 2015 मध्ये मोहाली न्यायालयाने  तीन वर्षाची शिक्षा आणि 1 कोटी रुपयांचा दंड सुनावला होता. नंतर त्याची सर्वोच्च न्यायालयात सुटका झाली. मंत्री असताना बदल्या आणि बढत्यांसाठी तो लक्षावधी रुपये उकळत असल्याचे जाहीर आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केले होते. पेट्रोल पंप, शेकडो एकर जमिनी, बंगले, सदनिका अशी शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता त्याने भ्रष्टाचाराच्या मार्गाने जमवल्याचे जाहीर आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केले होते. आता त्याच्यावर बलात्कार, फसवणूक, विश्‍वासघात, अत्याचार अशा विविध कलमाखाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गुरुदासपूर लोकसभेची पोट-निवडणूक जाहीर झाली असतानाच अकाली दलाच्या जिल्हाध्यक्षांवर असा गंभीर आरोप झाल्याने, अकाली दलाची कोंडी झाली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: