Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

नेपाळमधील ‘जीवित देवी’
vasudeo kulkarni
Wednesday, October 04, 2017 AT 11:43 AM (IST)
Tags: lolak1
हिंदू धर्मात प्राचीन काळापासून देवदेवतांची पूजा अर्चा, यात्रा-उत्सवांच्या, दर्शनाच्या परंपरा सुरू आहेत. काळ बदलला तरीही देशाच्या विविध राज्यातल्या देवदेवतांच्या मंदिरातल्या पारंपरिक प्रथा मात्र मोडलेल्या नाहीत. काही अनिष्ट प्रथा मात्र बंद झाल्या-मोडल्या गेल्या. भारतातल्या सर्व मंदिरात देवदेवतांच्या मूर्तींची षोडशोपचारे पूजा अर्चा परंपरागत पद्धतीने केली जाते. पण, भारता शेजारच्या नेपाळ राष्ट्रात मात्र गेली अनेक शतके जीवित देवीची पूजा करायची परंपरा अद्यापही अस्तित्वात आहे. जगातले एकमेव हिंदू राष्ट्र असा लौकिक असलेल्या नेपाळमधली राजेशाही संपली. या देशात लोकशाही राजवट प्रस्थापित झाली. पण तरीही जीवित देवीची प्रथा मात्र या लोकशाही राज्यातही कायम राहिली आहे. राजेशाही असताना राजा या कुमारी-जीवित देवीचे दर्शन घेत असे. नेपाळच्या राजघराण्याने ही प्रथा सुरू ठेवली होती. आता जीवित देवीची ही प्रथा नेपाळमधल्या भाविकांच्या श्रद्धेचा भाग असल्याने, लोकनियुक्त सरकारनेही पूर्वीच्या प्रथेप्रमाणे या आधीच्या जीवित देवीला निवृत्त करून, तीन वर्षे वयाच्या तृष्णा शाक्य या नव्या जीवित देवीची, राजधानी काठमांडूतल्या कुमारी देवीच्या मंदिरात विधिवत स्थापना
केली आहे.
जीवित देवीच्या या परंपरेनुसार, देवीचा दर्जा दिल्या गेलेल्या मुलीची देवीप्रमाणेच पूजा अर्चा होते. राजघराणे आणि जनतेकडूनही तिचे दर्शन घेतले जाते. एका राजवाड्यात तिचे वास्तव्य असते. तिच्यासाठी होणारा सारा खर्च सरकारकडून केला जातो. वर्षातून फक्त 13 वेळाच ती राजवाड्याच्या बाहेर येऊन जनतेला दर्शन देते. हा अपवाद वगळता देवीचा दर्जा दिल्या गेलेल्या या बालिकेला राजवाड्यात एकटीनेच, पुजारी आणि सेवकांच्या समवेत रहावे लागते. देवीचा दर्जा मिळाल्यावर या बालिकेचा आई, वडिलांशी काहीही संबंध रहात नाही. तिला आपल्या मर्जीनुसार कुणालाही भेटता येत नाही. परंपरेनुसारच तिचा दिनक्रम ठरलेला आहे. लाल रंगाची वस्त्रे तिला नेसावी लागतात. तिच्या दर्शनासाठी पुरुषांना अनवाणी पायाने, ती राहात असलेल्या राजमंदिरात जावे लागते. राजाही अनवाणी पायानेच तिच्या दर्शनासाठी जातो. मासिक धर्म सुरू होईपर्यंत या बालिकेचा-मुलीचा जीवित देवीचा दर्जा कायम राहतो. पण, मासिक धर्म सुरू होताच तिच्यातले देवत्व संपते, असा समज असल्याने, नव्या कुमारी बालिकेचा शोध जीवित देवीसाठी पुजार्‍यांकडून केला जातो. तिच्यासमोर म्हैस, बकरी, कोंबड्यांचे बळी दिले जातात. बळी दिलेल्या प्राण्यांच्या रक्ताने ती घाबरली, तर तिची निवड होत नाही. म्हैस, रेडा कापताना तिला रडू येवू नये, असाही नियम आहे. तीन वर्षाच्या कोवळ्या बालिकेसमोर जनावरांचे बळी द्यायचे आणि तिच्या धैर्याची परीक्षा घ्यायची, असा हा पायंडा आहे. तिची छाती सिंहासारखी असावी, ती सुंदर असावी, अशीही अट असते. या अटीनुसार पात्र ठरलेल्या बालिकेला जीवित देवीचा दर्जा दिला जातो आणि ती नेपाळची देवी होते. या नव्या देवीची प्रतिष्ठापना राजमंदिरात होण्यापूर्वी, पूर्वी देवीचा दर्जा असलेली मुलगी वाड्याच्या मागच्या दाराने आपल्या आई, वडिलांच्या घरी एकटीच निघून जाते. तिचा देवीपणाचा दर्जा गेल्यावर तिला समाजात कसलाही मान-सन्मान, आदर मिळत नाही. तिच्या विवाहाच्या समस्याही निर्माण होतात. नेपाळमध्ये राजेशाही राजवट असताना या जीवित देवीला कोणतेही शिक्षण दिले जात नसे. लोकांना दर्शन देणे आणि रोजची पूजाअर्चा करून घेणे एवढेच तिचे काम होते. 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या जीवित देवीच्या शिक्षणाची सोय सरकारने तिच्या वास्तव्याच्या ठिकाणी करावी, असे आदेश दिल्याने, आता जीवित देवीला शिक्षकांच्या-कडून औपचारिक शिक्षण दिले जाते. जीवित देवीची प्रथा अस्तित्वात असलेला नेपाळ हा जगातला एक-मेव देश आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: