Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मध्यरात्रीच्या राड्यानंतर खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रसिंहराजेंसह 300 जणांवर गुन्हा
ऐक्य समूह
Saturday, October 07, 2017 AT 11:19 AM (IST)
Tags: mn1
सुरुची ते जलमंदिर अघोषित संचारबंदी; सातार्‍यात तणावपूर्ण शांतता, दोघांना अटक
5सातारा, दि. 6 : टोलनाक्याच्या व्यवस्थापनावरुन ‘सुरुची’वर झालेल्या हल्ल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यासह अनेक कलमे दोन्ही गटांविरोधात लावण्यात आली आहेत. खा. श्री. छ. उदयनराजेभोसले, आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह तीनशे जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. राड्यानंतर दिवसभर सुरुची ते जलमंदिर आणि मोती तळे हा मार्ग बॅरिकेड लावून बंद करण्यात आला होता. पोलिसांनी या भागात अघोषित संचारबंदी लागू केली होती.
राड्यानंतर  पुन्हा कोणताही प्रकार घडला नसून सातार्‍यात तणावपूर्ण शांतता आहे. एकूणच झालेल्या प्रकारामुळे सातारकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, दोन्ही गटातील प्रत्येकी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांची चेतन सोलंकी आणि पंकज चव्हाण अशी नावे आहेत. 
दोन्ही राजांच्या गटातील राड्यानंतर शुक्रवारी सातार्‍यात दिवसभर तणावाचे वातावरण होते. प्रतापगंज पेठेतील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयापासून सुरुचीकडे जाणार्‍या   मार्गावर, सुरुची ते मोती तळे जाणार्‍या मार्गावर, शाहू कलामंदिरपासून जलमंदिरकडे जाणार्‍या मार्गावर आणि मोती तलावापासून जलमंदिरकडे जाणार्‍या मार्गावर बॅरेकेट लावून पोलिसांनी सर्व मार्ग अडवले होते. मोठ्या संख्येने या मार्गावरुन कोणीही जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व चोख बंदोबस्ताची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्वत: केली. कोणीही संशयास्पद अथवा टगेगिरी करणारा आढळला आणि त्याने या मार्गावरुन जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला तत्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या.
दरम्यान, मध्यरात्री झालेल्या राड्यात जखमी झालेले शाहूपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनीही दोन्ही गटांविरोधात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी (दि. 5) कार्यरत असताना सव्वापाचच्या सुमारास आनेवाडी टोलनाका येथे टोलवसुली प्रशासनाच्या हस्तांतरणावरून खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात वादावादी झाल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस ठाणे हद्दीत बंदोबस्त नेमला व स्वतः कर्मचार्‍यांसह पेट्रोलिंग करत होतो. त्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थकांची सर्किट हाऊस येथे बैठक असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार तेथे हजर होतो. त्या दरम्यान दोन्ही नेत्यांच्या निवासस्थानी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमला होता. रात्री 11.30 च्या सुमारास सर्किट हाऊस येथील बैठक संपल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांचे 100 ते 150 समर्थक हे वाहनांमधून सुरुची बंगल्यात आले. त्यामुळे आम्हीही कर्मचार्‍यांसह सुरुची बंगल्याच्या गेटवर येऊन थांबलो. मध्यरात्रीनंतर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक विक्रम पवार हे त्यांची गाडी वेगाने चालवत सुरुची बंगल्याच्या गेटमधून आत गेले. त्यांच्या पाठोपाठ खा. उदयनराजे हे फोर्ड एंडीव्हर गाडी (एमएच-11-एबी-007), कार्यकर्ते सनी भोसले (एमएच-11-एसी-1), अजिंक्य मोहिते (एमएच-11-बीव्ही-0605) या वाहनांमधून आणि इतर 10 ते 12 वाहनातून 100 ते 150 समर्थकांसह सुरुची बंगल्याच्या गेटसमोर रस्त्यावर येऊन थांबले. खा. उदयनराजे, अजिंक्य मोहिते, किशोर शिंदे, जीवन रामचंद्र निकम, सचिनराज बडेकर, किरण कुर्‍हाडे, सनी भोसले, अमर किर्दत व 100 ते 150 समर्थक त्यांच्या वाहनांमधून खाली उतरले.
खा. उदयनराजे हे आक्रमक होऊन त्वेषाने सुरुची बंगल्यात समर्थकांसह जात असताना मी व पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मला हाताने धक्का देऊन बाजूला केले आणि ते समर्थकांसह आत जाऊ लागल्याने मी कर्मचार्‍यांसह त्यांच्यासोबत जाऊ लागलो. तेवढ्यात खा. उदयनराजे यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना संबोधून, आता तुम्ही या बाहेर, माझी माणसे बाहेर आहेत, कोणात किती दम आहे, ते बघू, असे म्हणून लागले. मी व माझ्यासोबत असलेले हवालदार मेचकर, खरमाटे, फडतरे असे मिळून त्यांना रोखून गेटबाहेर आणले. त्यावेळी दोन्ही गटांचे समर्थक अजिंक्य मोहिते, जीवन रामचंद्र निकम, सचिनराज बडेकर, किरण कुर्‍हाडे, सनी भोसले, पंकज चव्हाण, प्रीतम कळसकर, विवेक जाधव (बंडा पैलवान), राजू भोसले, फिरोज पठाण, विनोद ऊर्फ बाळू खंदारे, विक्रम पवार, हरि साळुंखे, दशरथ कांबळे, चेतन सोळंकी, योगेश चोरगे, अमर किर्दत व इतर 150 ते 200 जणांचा जमाव आपसात झोंबाझोंबी करू लागला. मी त्यांना रोखत असताना अचानक फायर झाल्याचा मोठा आवाज दोनदा आला आणि लोकांची पळापळ सुरू झाली. आम्ही खा. उदयनराजे यांना त्यांच्या गाडीत बसवले. त्यांची गाडी निघून जात असताना पाठीमागून एका कारने मला व हवालदार मेचकर, खरमाटे, फडतरे यांना जोराने धडक दिली. त्यानंतर ती कार कोटेश्‍वर मैदान बाजूकडे निघून गेली. कारने धडक दिल्याने माझ्या अंगास मुकामार लागला. माझ्यासोबत असलेले मेचकर, खरमाटे, फडतरे  हे देखील जखमी झाले आहेत. पोलीस नाईक खरमाटे यांनी ती कार पाहून ती काळ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार (एमएच-11-बीव्ही-605) असल्याचे सांगितले आहे. या फिर्यादीवरुन नमूद सर्वांविरुद्ध भादंवि कलम 307, 333, 332, 143, 147, 148, 149, 160, नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  या प्रकरणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे समर्थक विक्रम पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, खा. उदयनराजे यांचा गट सातत्याने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या गटाशी सातारा नगरपालिका निवडणुकीपासून कुरघोडी व वादविवाद करत आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. शेंद्रे गटातील बेडवाडी, आसनगाव, भरतगाववाडी येथे ग्रामपंचायत निवडणूक असून 5 ऑक्टोबर रोजी उमेदवारांनी भरलेले अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. भरतगाववाडी या गावात विरोधकांनी अर्ज माघारी घेतल्याने आमच्या पक्षाचे शिंदे यांची सरपंचपपदी बिनविरोध निवड झाली आहे. ही गोष्ट आ. शिवेंद्रसिंहराजे यांना सांगण्यासाठी मी फोन केला असता ते कामात व्यस्त असल्याने नंतर फोन करीन, असे ते म्हणाले होते. त्यानंतर मी सर्किट हाऊस येथे गेलो असता तेथे लोकांची गर्दी असल्याने मला त्यांच्याशी बोलता आले नाही. त्यानंतर मी सुरुची बंगल्यावर जात असताना मला रात्री 12 च्या सुमारास आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा फोन आला. त्यांनी मला काय काम आहे, असे विचारले. मी त्यांना सांगेपर्यंत, तू उद्या सकाळी घरी ये, असे त्यांनी सांगितले. म्हणून मी माझ्या घरी जाण्यासाठी कोर्टासमोर असलेल्या रोड डिव्हायडरमधून बॉम्बे रेस्टॉरंटकडे गाडी वळवली तेव्हा बांधकाम भवनसमोर डिव्हायडरजवळ उदयनराजे यांची एमएच-11-एबी-007 या क्रमांची गाडी उभी होती. त्याच्या मागे एमएच-11-एसी-1 ही कार घेऊन सनी भोसले होता व इतर 10 ते 15 कार उभ्या होत्या.
वाद नको म्हणून मी माझी कार पुन्हा पोवई नाक्याकडे वळवली. त्यावेळी त्या सर्व गाड्या माझ्या कारच्या मागे हॉर्न वाजवत येऊ लागल्या. म्हणून मी माझी कार पोवई नाक्यावरुन राजवाडा रोडने पुढे घेतली. त्यावेळी सयाजीराव हायस्कूलजवळ उदयनराजेंची कार माझ्या उजव्या बाजूस बरोबर आली. कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर उदयनराजे बसलेले होते. त्यांच्या हातात पिस्तूल होते. ते पिस्तूल माझ्या दिशेने रोखून अर्वाच्च शिव्या देत, तुला व तुझ्या शिवेंद्रला आज खलास करणार आहे, असे ते म्हणत होते. मी माझी कार तशीच पुढे चालवत होतो. त्यांची कार माझ्या कारसोबत पुढे येत होती. त्यांच्या कारमध्ये बसलेले अजिंक्य मोहिते व बंडा पैलवान मोठमोठ्याने ‘विक्रमला जिवंत सोडू नका, त्याला गोळी घाला’ असे म्हणत होते. तेवढ्यात रयत शिक्षण संस्थेसमोरचा डिव्हायडर सुरु झाल्याने उदयनराजे याचा ड्रायव्हर रफिक शिकलगार याने त्यांची कार उजव्या बाजूस घेतली. हा रस्ता पोवई नाका बाजूकडे जाणार असल्याने आणि समोरून वाहने आल्याने त्यांच्या कारचा वेग कमी झाला. त्यावेळी मी माझी कार वेगाने राजवाड्याकडे घेतली. ते सर्व लोक माझा पाठलाग करत होते. मी कमानी हौदाजवळ आल्यावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांना फोन करून खा. उदयनराजे हे माझ्या गाडीचा पाठलाग करून मला व तुम्हाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत, असे सांगितले. मी तसाच पुढे राजवाड्यावरून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुरुची बंगल्यावर 12.30 च्या सुमारास आलो. त्यावेळी माझ्या कारच्या पाठोपाठ उदयनराजे व त्यांचे कार्यकर्ते गाड्या घेऊन आले. मी सुरुची बंगल्याच्या गेटमधून माझी कार आत घातली, तेव्हा खा. उदयनराजे यांनी त्यांची कार रोडवर थांबवली. ते कारमधून खाली उतरले आणि त्यांचे कार्यकर्ते अजिंक्य मोहिते, विवेक जाधव, सनी भोसले, अमर किर्दत, प्रीतम कळसकर व इतर 100 ते 150 लोकांसह सुरूची बंगल्यात येऊ लागले. गेटवर असलेले पोलीस त्यांना थांबवत होते; परंतु उदयनराजे व त्यांचे कार्यकर्ते काही एक न ऐकता पोलिसांना धक्काबुक्की करून आत आले. तेथे खा. उदयनराजेंनी आ. शिवेंद्रसिंराजेंना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. तेवढ्यात आ. शिवेंद्रसिंहराजे गेटवर आले. त्यावेळी गेटवर हजर असलेल्या खा. उदयनराजे, अजिंक्य मोहिते, बंडा पैलवान, सनी भोसले, अमर किर्दत, प्रीतम कळसकर व इतर 100 ते 150 लोक आ. शिवेंद्रसिंहराजे, राजू भोसले, फिरोज पठाण, अक्षय जाधव, ओंकार भंडारी व इतरांना धक्काबुक्की व शिवीगाळ करू लागले. हा गोंधळ सुरू असताना दोन गोळ्या फायर झाल्याचा आवाज आल्याने लोकांची पळापळ सुरू झाली.  उदयनराजे व त्यांच्यासोबत असलेले लोक त्यांच्या गाड्या घेऊन पळून जाऊ लागले. त्यावेळी रस्त्यावर उभा असलेला माझा भाऊ चंद्रसेन पवार, रवी पवार यांना उडवून गाड्या तिथून निघून गेल्या. त्यानंतर आम्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
खा. उदयनराजे यांचे समर्थक अजिंक्य मोहिते यांनीही फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, 5 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर मी माझी गाडी (एमएच-11-बीव्ही-0605) घेऊन नगरसेवक किशोर शिंदे यांच्या वॉर्डात निघालो होतो. माझ्याबरोबर जीवन रामचंद्र निकम, सचिन राज बडेकर, किरण कुर्‍हाडे आणि आमच्याबरोबर सनी भोसले हे एमएच-11-एसी-1 या गाडीतून होते. त्यांच्या गाडीत त्यांचे मित्र होते. आमच्याबरोबर माझ्या मित्राची गाडी एमएच-11-2626 होती. आम्ही सर्व जण रस्त्याने निघालो होतो. सुरुची बंगल्यासमोर आलो असता, आमच्या गाडीसमोर अचानक आ. शिवेंद्रसिंहराजे, राजू भोसले, फिरोज पठाण, विनोद ऊर्फ बाळू खंदारे, विक्रम पवार, हरि साळुंखे, दशरथ कांबळे, चेतन सोलंकी, योगेश चोरगे व इतर लोक आले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी गाडी अडवून कमरेस असलेली बंदूक काढली आणि माझ्यावर रोखून, तुला आता खलास करणार आहे, असे म्हणून माझ्यावर बंदुकीतून फायर केला. मी नेम चुकवला असता हा फायर सनी भोसले याच्या गाडीवर लागला.  त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत असलेले विनोद ऊर्फ बाळू खंदारे व राजू भोसले यांनीही त्यांच्याजवळ असलेल्या बंदूक काढून सनी भोसले यांच्या गाडीवर सहा फायर केले. चार ते पाच गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: