Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दोन्ही राजांची वाटचाल रक्तरंजित संघर्षाच्या दिशेने
ऐक्य समूह
Saturday, October 07, 2017 AT 11:37 AM (IST)
Tags: lo4
पोलिसांची घटना घडेपर्यंत बघ्याची भूमिका, घटना रोखण्यासाठी उपाययोजनाच नाही
5सातारा, दि. 6 : दोन्ही राजे एकमेकांच्या विरोधातगेल्याने पुन्हा एकदा 1999 चा तणाव सातार्‍यात पहायला मिळाला आहे. 1999 पेक्षा भयानक परिस्थिती सातार्‍यात आहे. कधी काय घडेल आणि कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यातच पोलीस दलाने कर्तृत्ववान पोलिसांची भूमिका बजावण्यापेक्षा संयमाची आणि सावधानतेची भूमिका बजावल्याने सामान्य सातारकर दडपणाखाली गेला आहे. भविष्यात येणार्‍या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आणखी किती डोकी फुटतील आणि हातपाय तुटतील हे सांगता येणार नाही. एकूणच दोन्ही राजांच्या लढाईत सामान्य जनता चिरडली जाणार नाही ना याची काळजी कोणालाच दिसत नाही.
1999 पूर्वीपर्यंत सातारा शहर अतिशय शांत आणि संयमी शहर म्हणून ओळखले जायचे. किरकोळ घटना वगळता शहरात रक्तरंजित राजकीय संघर्ष कधीच पहायला मिळाला नाही. 1999 नंतर सगळे चित्रच बदलले. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला. संपूर्ण सातारा शहरासह परिसराने दहशतीचे वातावरण अनुभवले. त्यानंतर 2006 पर्यंत सातारा शहरात अशाच प्रकारचे संघर्षमय वातावरण होते. 1998 ते 2004 या काळात खा. उदयनराजे विरुध्द स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्यामध्ये मोठा संघर्ष होता. शरद लेवे खून प्रकरणानंतर तो संघर्ष आणखी वाढला. मात्र, अभयसिंहराजे यांच्या निधनानंतर 2006 मध्ये राजघराण्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व श्रीमंत शिवाजीराजे भोसले व श्रीमंत सौ. चंद्रलेखाराजे भोसले यांनी या संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी राजघराण्याचे मनोमीलन घडवले. दहा वर्षांनंतर ते राजघराण्याचे नव्हे तर राजकीय मनोमीलन होते, हे सिध्द झाले. कारण 2006 मध्ये नगरपालिकेत निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीमुळे हे मनोमीलन झाले होते. तिसर्‍याचा टेकू घेवून कारभार करण्यापेक्षा आपले आपण एक झालेले चांगले, असा हेतू या मनोमीलनापाठीमागे राहिला असेल, असे म्हणायला आज वाव आहे. 2016 मध्ये पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुकीत हे मनोमीलन तुटले.  मनोमीलन तुटल्यानंतर सातार्‍यात पुन्हा राजकीय संघर्ष अटळ असल्याचे स्पष्ट झाले होते. मनोमीलन होण्यापूर्वी खा.उदयनराजे हे डॅशिंग आणि आ. शिवेंद्रसिंहराजे हे शांत आणि संयमी नेते म्हणून ओळखले जात होते. दहा वर्षानंतर आता खा. उदयनराजेंसारखेच डॅशिंग वागणे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सुरु केले आहे.   
दोन्ही राजांकडे युवकांची टोळकी गोळा झालेली आहेत. युवकांची शक्ती विधायक कामाऐवजी राड्यासाठी दोन्हीकडून वापरली जावू लागली आहे. 1999 च्या काळात आणि आताच्या काळात खूप मोठा फरक आहे. आताच्या काळात दोन्ही बाजू तोडीस तोड आहेत. त्यामुळे संघर्ष झाल्यानंतर किती जणांची डोकी फुटतील हे आता सांगणे कठीण झाले आहे. 1999 ला एक खून झाला होता. आता काय काय होईल आणि किती जणांचा बळी जाईल हे सांगणे अवघड झाले आहे. रक्तरंजित संघर्षालाच सातार्‍यात सुरुवात झाली आहे, असे म्हणायला पुरेसा वाव आहे. आतापर्यंतच्या संघर्षात कुठेही बंदुकीला वाव नव्हता. आता हवेत गोळ्या झाडल्या गेल्या आहेत. भविष्यात एकमेकांच्या अंगावर गोळ्या झाडायला दोन्ही गट कमी करणार नाहीत. त्यामुळे शांतताप्रिय सातारची वाटचाल बिहारच्या दिशेने सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. टोल नाक्यावरुन झालेला राडा ही तर सुरुवात आहे. पुढे काय होणार आहे हे पाहणे आता सातारकरांचे दुर्भाग्य असणार आहे. दोन्ही राजांनी आपली विधायक शक्ती सातारा शहराच्या विकासाच्या कामाला लावली पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. दोन्ही राजांमधील हा संघर्ष तुटेपर्यंत ताणला गेला आहे नव्हे तर आता एकमेकांची तोडण्यापर्यंत ताणला गेला आहे. या संघर्षाचा शेवट कदाचित एखाद्याचा बळी गेल्यानंतरच होईल, असे वाटायला लागले आहे. त्यातच पोलिसांची बघ्याची भूमिका आणि दोन्ही राजांना हँडल करण्याची पध्दत अतिशय विचित्र आणि वाईट आहे. एखाद्या किरकोळ व्यक्तीने पाच ते दहा जण जमवून काय करायचा प्रयत्न केला तर पोलीस लगेच त्याला हिसका दाखवून गजाआड करतात. इथे मात्र पाचशे पाचशे जण जमवून दोन्ही नेते राडा करत असताना पोलीस संयमाने परिस्थिती हाताळल्याचा दावा करतात हे हास्यास्पद आहे. सातारच्या सामान्य जनतेला पोलीस दलाचे अस्तित्व कोठे जाणवेनाच झाले आहे. कोणतीही घटना घडेपर्यंत पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. घटना घडताना हस्तक्षेप करण्याची नवीनच पध्दत पोलिसांनी सुरु केली आहे. त्यामुळे गुन्हे झाल्यानंतरच अटक करुन आपले कर्तृत्व सिध्द करण्याची पोलिसांची पध्दत सातारकरांसाठी अनाकलनीय आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: