Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेसने क्षमता पाहून नेते निवडावेत
ऐक्य समूह
Monday, October 09, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: na1
अरुण जेटलींचा राहुल गांधींवर निशाणा
5वॉशिंग्टन, दि. 8 (वृत्तसंस्था) : अमेरिका दौर्‍यावर जाण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने क्षमतेच्या आणि कार्यशक्तीच्या आधारे नेते निवडावेत. त्याशिवाय काँग्रेसला स्वत:चा विस्तार करता येणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला जेटलींनी राहुल गांधींना लगावला.
गेल्या महिन्यात अमेरिकेतील बर्कले विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींनी भारतातील सर्वच क्षेत्रांमध्ये घराणेशाही असल्याचे म्हटले होते. राहुल गांधींच्या या विधानावरून जेटली यांनी त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी लवकरच निवड होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर जेटली यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले.
अरुण जेटली यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बर्कले-भारत परिषदेत भाषण केलेे. राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात बर्कले विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी राहुल गांधींना राजकारणातील घराणेशाहीबद्दल प्रश्‍न विचारण्यात आला असता, भारतीय राजकारणात घराणेशाही ही एक समस्या होती. मात्र, काँग्रेसमधील बहुतांश नेते घराणेशाहीतून पुढे आलेले नाहीत, असे राहुल यांनी म्हटले होते. त्याचबरोबर भारतातील बहुतांश क्षेत्रात घराणेशाही असून घराणेशाहीशिवाय भारतात काहीच होत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. याबद्दल त्यांनी अखिलेश यादव, अभिषेक बच्चन यांचे उदाहरण दिले होते. राहुल गांधी यांनी ध्रुवीकरणाच्या राजकारणावरूनही मोदी सरकारला लक्ष्य केले होते.  
अरुण जेटली हे मंगळवारपासून आठवडाभराच्या अमेरिका दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यात ते न्यूयॉर्क आणि बोस्टन येथे अमेरिकी उद्योगपतींशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर जागतिक बँक आणि आंतररराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. या दौर्‍यावर जाण्यापूर्वी त्यांनी बर्कले-भारत परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. एका प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, अनेक दशके सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष सध्या वास्तवापासून दूर आहे. भारतीयांच्या महत्त्वाकांक्षा जाणून घेण्यात काँग्रेसला अपयश आले आहे. काँग्रेसपुढील आव्हान दुपदरी आहे.
ऐतिहासिक आणि पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसने भारतात मध्यवर्ती स्थान मिळवले होते. हे स्थान त्यांनी अनेक दशके सातत्याने राखल्याने हा पक्ष स्वाभाविकपणे सरकारी पक्ष होता. मात्र, 2004 पासून ही परिस्थिती बदलली आहे. विशेषत: राष्ट्रीय सल्लागार परिषद नेमल्यापासून त्यास सुरुवात झाली आणि ती पुढेही राहिली. आता काँग्रेस जवळपास प्रत्येक मुद्द्यावर घेत असलेली भूमिका परंपरागत नाही. आत्यंतिक डाव्यांनी वैचारिक कार्यक्रमपत्रिका निश्‍चित केली तर काँग्रेसची अवस्था ‘चीअरलीडर’सारखी झाली. त्याचबरोबर काँग्रेसला अंतर्गत आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. काँग्रेसचे नेतृत्व भारतीयांच्या महत्त्वाकांक्षांशी जुळवूनघेऊ शकले नाही. महत्त्वाकांक्षी असलेला भारत आता आपल्या नेत्यांची कठोर चाचणी घेतो. भारतीय जनता आता आपल्या नेतृत्वासाठी कठोर निकष लावत असून घराणेशाही खपवून घेत नाही.
त्यामुळे जोपर्यंत काँग्रेस आपली रचना बदलत नाही आणि क्षमता व कार्यशक्तीच्या आधारे नेते निवडत नाही आणि पुन्हा आपल्या मूळ भूमिकेकडे वळत नाही, तोपर्यंत काँग्रेसला विस्तारण्यासाठी वाव नाही, असे जेटली यांनी नमूद केले. भारताला भूतकाळात सामाजिक तणावांचा वारसा मिळाला होता. भारतात सामाजिक, धार्मिक तणाव होता. आता भारत यातून बाहेर पडण्याच्या टप्प्यातून जात आहे. अर्थात दुर्दैवाने काही किरकोळ घटना घडतात, त्या निंदनीय आहेत. अशा घटना अमेरिकेतही घडत आहेत. सध्या सामाजिक सलोखा बिघडवणार्‍या घटनांची संख्या अमेरिकेत भारतापेक्षा जास्त आहे. त्याउलट भारत हा अतिशय शांत देश असून उद्योग करण्यासाठी अधिक योग्य आहे, असा विश्‍वास जेटली यांनी व्यक्त केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: