Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पेट्रोल दोन रुपयांनी, डिझेल एक रुपयाने स्वस्त होणार
ऐक्य समूह
Tuesday, October 10, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: mn1
मुनगंटीवार यांची घोषणा; आज औपचारिक निर्णय
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : आधीच महागाईमुळे हैराण असताना इंधन दरवाढीचा भार पडल्याने ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सरकारला मोठ्या टीकेला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारनेही एक पाऊल मागे घेत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल दोन रुपयांनी तर डिझेल एक रुपयाने स्वस्त होणार असल्याची खूशखबर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.
आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड तेलाचे दर कमी असतानाही केंद्र व राज्य सरकारने प्रचंड मोठ्या प्रमाणात कर लादल्याने सर्वसामान्यांना चढ्या दराने इंधन खरेदी करावे लागते. लोकांमधील वाढता रोष लक्षात घेऊन केंद्र सरकारने थोडी करसवलत दिली आहे. राज्य सरकारनेही ‘व्हॅट’मध्ये कपात करून लोकांना दिलासा देण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. पेट्रोलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात 25 टक्के तर राज्यात इतर ठिकाणी 26 टक्के व्हॅट लावते. त्या शिवाय लिटरमागे 11 रुपयांचा अधिभार वसूल करण्यात येतो. डिझेलवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात 21 टक्के तर राज्यात इतर ठिकाणी 22 टक्के व्हॅट आकारला जाती. या शिवाय लिटरमागे दोन रुपयांचा अधिभार घेतला जातो. पेट्रोल व डिझेलवर व्हॅट आणि अधिभार लावल्याने राज्य सरकारला 19 हजार कोटींपेक्षा जास्त महसूल मिळतो.
पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या केंद्राच्या सूचनेमुळे पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी करणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी ट्विटरवरून दिली आहे. उद्या (मंगळवार) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. आता व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतल्यास राज्य सरकारला 2800 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.
देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किमती घसरत आहेत. मोदी सरकार सत्तेत यायच्या आधी 2014 च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांचे दर प्रतिबॅरल 100 डॉलरपेक्षा जास्त होते. त्यावेळी देशात पेट्रोलचे दर 80 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले होते. सध्या कच्च्या तेलांच्या किमती त्या तुलनेत कमी होऊनदेखील देशात पेट्रोल 70 ते 75 रुपयांनी तर महाराष्ट्रात अधिभार लागू असल्याने 80 रुपये प्रतिलिटर या दरानेच मिळत आहे. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी करात मोठी वाढ केल्याने पेट्रोल व डिझेलच्या किमती गगनाला भिडत होत्या.       
 केंद्राबरोबरच राज्य सरकारच्या करांमुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी होत नव्हते. त्यामुळे केंद्र सरकारवर चहुबाजूंनी टीका सुरू होती. विरोधकांनी यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले होते. जनतेच्या या असंतोषाची दखल घेत केंद्र सरकारने गेल्या मंगळवारीच पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर दोन रुपयांनी कमी केला होता. त्यामुळे
पेट्रोल अडीच रुपयांनी तर डिझेल सव्वादोन रुपयांनी स्वस्त
झाले होते. आता राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केल्यास हे दर आणखी कमी होणार आहेत.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: