Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माजी नगरसेवक, नगरपालिका कर्मचार्‍यासह पाच जणांना पाच दिवस पोलीस कोठडी
ऐक्य समूह
Tuesday, October 10, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 9 : सुरुचीसमोर झालेल्या धुमश्‍चक्रीचे अटकसत्र सुरूच असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू केली आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या पाच जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पकडलेल्या पाच जणांमध्ये एक माजी नगरसेवक आणि एका नगरपालिका कर्मचार्‍याचाही समावेश आहे. पोलिसांच्या कॅमेर्‍यांनी केलेले चित्रण आणि सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करून संशयितांना पकडले जात आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये   खा.उदयनराजे गटाच्या माजी नगरसेवक शशांक उर्फ बाळू प्रभाकर ढेकणे (वय 43, रा. करंजे पेठ, सातारा), इम्तियाज बाळासाहेब बागवान (वय 48, रा. बुधवार पेठ, सातारा) आणि आ. शिवेंद्रसिंहराजे गटाच्या निखिल संजय वाडकर (वय 21, रा. करंजे पेठ, सातारा), अनिकेत अशोक तपासे (रा. मल्हार पेठ, सातारा) यांचा समावेश आहे. या चौघांशिवाय उत्तम यशवंत कोळी या नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यालाही अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी मध्यरात्री सुरुचीसमोर झालेल्या राड्यात दोन्ही राजांसह तब्बल तीनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेच्यावेळी स्वत:चा एक कॅमेरा तैनात ठेवला होता. या कॅमेर्‍याने सर्व घटनाक्रम टिपला आहे. या कॅमेर्‍याशिवाय सीसीटीव्ही फूटेजनेही पोलिसांचे काम सोपे केले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या सर्व संशयितांचे चेहरे तपासले जात आहेत. पोलिसांनी तपासलेल्या चेहर्‍यांना पकडून आणले जात असून त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जात आहे. पोलिसांना हे संशयित मी तेथे नव्हतो, असेच सांगत आहेत. मात्र सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर त्यांची अवस्था अतिशय वाईट होत आहे. चित्रीकरणात आपली उपस्थिती घटनास्थळावर दाखवल्यानंतर मात्र ते आपली चूक कबूल करत असून पोलीस त्यांना अटक करत आहेत.
खा.श्री. छ. उदयनराजे भोसले पुण्याला रवाना झाले आहेत.    
त्यामुळे खासदार गटात शांततेचे वातावरण आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे येथेच असून त्यांच्या गोटातही सध्या शांततेचे वातावरण आहे. घटना घडली त्यावेळी तेथे प्रत्यक्ष उपस्थित असलेले मातब्बर कार्यकर्ते मात्र पसार झाले आहेत. मुख्य संशयित सापडत नसल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि कॅमेर्‍यातील चित्रीकरणाच्या आधारे उचलाउचली सुरू केली आहे. त्यामुळे सातार्‍यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस कोणाकोणाला उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घटना घडल्यानंतर घटनास्थळी गेलेल्यांची नावेही संशयित म्हणून चौकशीमध्ये निष्पन्न करण्याचे काम सुरू आहे. जेखरोखरच घटनेमध्ये नव्हते अथवा ज्यांचा यामध्ये सहभाग नाही अशांना अटक करू नये, अशी अपेक्षा आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: