Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
देशाचा आर्थिक विकास खालावणार
ऐक्य समूह
Wednesday, October 11, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: mn1
नोटाबंदी, जीएसटीचा परिणाम; ‘आयएमएफ’चे भाकीत

5वॉशिंग्टन, दि. 10 (वृत्तसंस्था) : नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे 2017 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 6.7 टक्के राहील, असे भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात वर्तविण्यात आले आहे. ‘आयएमएफ’ने एप्रिल आणि जुलै महिन्यात वर्तविलेल्या अंदाजापेक्षा यामध्ये 0.5 टक्क्याची घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2017 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 7.2 टक्के राहील, असा अंदाज एप्रिल आणि जुलैमध्ये वर्तविला होता. मात्र, आता हा विकास दर त्यापेक्षा 0.5 टक्क्यांनी कमी म्हणजे 6.7 टक्के राहील, असे ‘आयएमएफ’च्या मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली हे जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकांना उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेत असतानाच हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यासाठी नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी कारणीभूत असल्याचे ‘आयएमएफ’च्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे मोदी सरकारवर आर्थिक धोरणांच्या मुद्द्यावरून टीका करण्यासाठी विरोधकांना आणखी अस्त्र मिळण्याची शक्यता आहे.
या शिवाय 2018 मध्येही भारताचा आर्थिक विकास दर यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा 0.3 टक्क्यांनी घसरून तो 7.4 टक्क्यांपर्यंत खाली येईल, असे या अहवालात म्हटले आहे. या आधी एप्रिल व जुलैमध्ये ‘आयएमएफ’च्या अंदाजात 2018 मध्ये आर्थिक विकास दर 7.7 टक्के राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. 2016 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 7.1 टक्के होता. ‘आयएमएफ’च्या एप्रिलमधील अहवालातील अंदाजापेक्षा तो 0.3 टक्के जास्त होता. भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. त्यासाठी देशात वर्षाच्या मध्यातच लागू करण्यात आलेल्या वस्तू व सेवा करामुळे झालेली अस्थिरता आणि चलन विनिमय धोरणांचे रेंगाळलेपण कारणीभूत असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक’ या अहवालात म्हटले आहे. 
सरकारकडून विविध योजनांवर मोठ्या प्रमाणावर करण्यात येणारा खर्च आणि माहितीच्या नूतनीकरणामुळे 2016 या वर्षात आर्थिक विकास दर 7.1 टक्के (एप्रिलमध्ये 6.8 टक्के) होता, असेही ‘आयएमएफ’ने या अहवालात नमूद केले आहे. या अहवालात 2017 च्या आर्थिक विकास दरामध्ये चीन हा भारताच्या किंचित पुढे राहील, असे म्हटले आहे. या वर्षात चीनचा आर्थिक विकास दर 6.8 टक्के म्हणजे भारतापेक्षा 0.1 टक्क्याने अधिक राहील, असे ‘आयएमएफ’ने म्हटले आहे. ‘आयएमएफ’ने एप्रिल आणि जुलैमध्ये केलेला भाकितापेक्षा तो किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे. मात्र, 2018 मध्ये जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था ही बिरुदावली भारत पुन्हा मिळवेल, असेही ‘आयएमएफ’ने म्हटले आहे. या वर्षात चीनचा आर्थिक विकास दर 6.5 टक्के राहील तर भारताचा विकास दर आधीच्या अंदाजापेक्षा 0.3 टक्के कमी असला तरी तो चीनपेक्षा अधिक म्हणजे 7.4 टक्के राहील, असे या अहवालात म्हटले आहे. ‘जीएसटी’मुळे भारताची प्रचंड बाजारपेठ एकत्रित होईल. त्याशिवाय अन्य आर्थिक सुधारणांमुळे मध्यम कालावधीसाठी भारताचा आर्थिक विकास दर 8 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असे ‘आयएमएफ’ने म्हटले आहे.
भारताने 1999 ते 2008 या कालावधीत सरासरी 6.9 आर्थिक विकास दर राखला होता. पुढील तीन वर्षांत आर्थिक विकास दर 2009 मध्ये 8.5 टक्के, 2010 मध्ये 10.3 टक्के तर 2011 मध्ये 6.6 टक्के होता. 2012, 13 व 14 मध्ये आर्थिक विकास दर अनुक्रमे 5.5, 6.4 व 7.5 टक्के होता. 2015 मध्ये भारताने 8 टक्के आर्थिक विकास दर गाठला होता. 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 8.2 टक्के राहील, असे भाकीतही ‘आयएमएफ’ने वर्तविले आहे.
      

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: