Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
18 वर्षांखालील पत्नीशी शरीरसंबंध हा बलात्कारच
ऐक्य समूह
Thursday, October 12, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: na1
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) :पत्नीचे वय 15 ते 18 वर्षे या दरम्यान असेल तर तिच्याशी ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कारच ठरतील. भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार हा गुन्हा असेल, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. शरीरसंबंधासाठी 18 वर्षांखालील मुलीची संमतीदेखील यास अपवाद ठरणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर सरकार बालविवाहांना कायदेशीर मान्यता देत असल्याबद्दलही न्यायालयाने फटकारले.
एखाद्या व्यक्तीने त्याच्या पत्नीशी शरीरसंबंध ठेवले आणि तिचे वय 15 वर्षांपेक्षा कमी नसेल तर तो बलात्कार मानला जात नाही, अशी तरतूद भारतीय दंडसंहितेच्या कलम 375 (2) मध्ये आहे. या तरतुदीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेवरील सुनावणीमध्ये न्यायालयाने हा निर्णय दिला.
बलात्कारा संदर्भातील कायदेशीर तरतुदींमध्ये 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींचा अपवाद केल्याने त्यांच्या अधिकारांवर गदा येत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. अल्पवयीन मुलींमध्ये विवाहित आणि अविवाहित, असा भेद करणे कृत्रिमपणाचे ठरेल, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. 
अल्पवयीन मुलींशी होत असलेल्या विवाहानंतर मानवी तस्करीकडेही दुर्लक्ष करता येणार नाही, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. देशातील बालविवाहाच्या रूढीबद्दल चिंता व्यक्त करताना सामाजिक न्यायाचे कायदे ज्या हेतूने तयार करण्यात आले आहेत, त्या पद्धतीने त्यांची अंमलबजावणी होत नसल्याची खंत न्यायालयाने व्यक्त केली. अक्षयतृतीयेसारख्या मुहूर्तांवर होणार्‍या सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये हजारो अल्पवयीन मुलींचे विवाह होत असल्याबद्दलही न्यायालयाने चिंता व्यक्त केली. देशभरात बालविवाह रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी प्रभावी पावले उचलावीत, असे निर्देश यावेळी न्यायालयाने दिले.
’इंडिपेंडंट थॉट’ या स्वयंसेवी संस्थेने भादंवि कलम 375 (2) मधील तरतुदींमध्ये बलात्काराबाबत केलेल्या अपवादाला विरोध करणारी  याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. एखादी मुलगी 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर तिची संमती असो वा नसो, तिच्याशी शरीरसंबंध ठेवणे हा बलात्कारच मानला जातो. मात्र, कलम 375 (2) मधील तरतुदींनुसार 15 ते 18 वर्षे या दरम्यान वय असलेल्या पत्नीशी ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरणार नाही, असा अपवाद केला गेला आहे. लग्नासाठी मुलीचे वय 18 वर्षे असले पाहिजे, अशी तरतूद कायद्यात आहे. मात्र, भादंवि कलम  375 (2) मुळे विसंगती निर्माण होत आहे, असा युक्तिवाद या संस्थेने केला. या याचिकेवरील निर्णय न्या. मदन बी. लोकूर यांच्या खंडपीठाने 6 सप्टेंबर रोजी राखून ठेवला होता. हा निर्णय खंडपीठाने आज जाहीर केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: