Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
टोलनाक्यासाठी भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या वारसांनी शेतकर्‍यांसाठी संघर्ष करावा
ऐक्य समूह
Thursday, October 12, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: lo3
डॉ. भारत पाटणकर यांचे दोन्ही राजांना आवाहन
5सातारा, दि. 11 : छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकर्‍यांना बरोबर घेवून त्यांच्या प्रश्‍नांसाठी संघर्ष केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही वारसांनीही शेतकर्‍यांसाठी संघर्ष करावा. टोलनाक्यासाठी भांडण्यापेक्षा टोलनाकेच बंद करण्याची मागणी घेवून भांडावे. या प्रश्‍नावर त्यांना आमची साथ असेल आणि जनताही त्यांना साथ देईल, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
डॉ. पाटणकर म्हणाले,  सातारा जिल्ह्यातील जनतेला छ. शिवराय, छ. संभाजीराजे आणि संभाजीपुत्र शाहू महाराज यांची परंपरा आहे. सातारा ही छत्रपतींची सर्वात जास्त काळ राहिलेली राजधानी आहे. सरंजामदार व जमीनदारांपासून रयतेला मुक्त करण्याचे कार्य करण्याचा हा वारसा आहे. हा वारसा जपण्याची जबाबदारी छत्रपतींच्या वंशजांची आहे.
आज कष्टकरी जनता संकटात आहे. शेतकर्‍यांचे जगणे कठीण झाले आहे. शेतकरी आणि कामगारांना उदध्वस्त करणारी धोरणे राबवली जात आहेत.      
शेतकर्‍यांना भूमिहीन केले जात आहे आणि तेथे भांडवलदारांचे प्रकल्प उभारले जात आहेत. बेरोजगारी वाढली आहे. शासनाच्या घोषणांनी दुष्काळ नाहीसा होणे शक्य नसल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. या पार्श्‍वभूमीवर छत्रपतींचे वंशज असलेले आमदार व खासदारांनी आता पक्षीय भूमिका व टोलनाका कोणाला इकडे लक्ष न देता शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रात फिरावे. महाराष्ट्रातील शिवरायांवर प्रेम करणारी जनता त्यांना नक्कीच  साथ देईल.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत पन्हाळकर व डॉ. चैतन्य दळवी उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: