Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रामदास कदम यांचे फटाकाबंदीवरून घूमजाव
ऐक्य समूह
Thursday, October 12, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: mn2
हिंदू सणांवरच बंदी घाला : उद्धव ठाकरेंची उपरोधिक मागणी
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) :पंचांग फाडून टाका, सण आणि उत्सवांची थोतांडे बंद करा, असेच आदेश येणे आता बाकी आहे. आधीच आपल्या सणांची रया गेली आहे. मात्र, या शांततेचा अतिरेक झाला तर एकेदिवशी असंतोषाचा मोठा स्फोट होईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. हिंदूंच्या सणांच्या आड कोणी येणार असेल तर शिवसेना अजिबात खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, काल दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही फटाक्यांवर बंदी घालण्याचे सूतोवाच करणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सपशेल घूमजाव केले.
पर्यावरणपूरक दिवाळी मोहिमेचा शुभारंभ करताना रामदास कदम यांनी दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानेही काल नागरी वस्त्यांमध्ये फटाके दुकानांना परवानगी दिली जाऊ नये, असे आदेश दिले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवताच शिव-सेनेनेही विरोध   सुरू केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली. हिंदूंच्याच सणांबाबत असे निर्णय होणार असतील तर पंचांगच फाडून टाकण्याचे आदेश एकदा द्या, म्हणजे सणही साजरे
होणार नाहीत आणि फटाकेपण वाजणार नाहीत, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: