Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पेट्रोल पंपचालकांचा शुक्रवारचा संप मागे
ऐक्य समूह
Thursday, October 12, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : पेट्रोल पंपांवरील इंधन विक्रीमध्ये शिस्त आणण्याच्या दृष्टीने तेल कंपन्यांनी लागू केलेल्या एकच मार्गदर्शक तत्त्वाच्या निषेधार्थ पेट्रोल पंपचालकांनी प्रस्तावित केलेला एकदिवसीय संप मागे घेण्यात आला आहे. पेट्रोल पंपांवर कडक कारवाई करण्याचा इशारा तेल कंपन्यांनी दिल्यानंतर शुक्रवारी (दि. 13) रोजी होणारा हा संप मागे घेण्याचा निर्णय पेट्रोल पंपचालकांच्या संघटनेने घेतला.
तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना एकच मार्गदर्शक तत्त्व लागू केले आहे. त्यानुसार कमी विक्रीवर दंड, स्वयंचलित पेट्रोल पंपांवर अनधिकृतरीत्या मॅन्युअल पद्धतीने इंधन भरणे, प्रसाधनगृहांची स्वच्छता न राखणे आणि पेट्रोल पंपांवरील कर्मचार्‍यांना किमान वेतन न देणे अशा बाबींसाठी दंड आकारण्याची तरतूद या मार्गदर्शक तत्त्वामध्ये आहे. त्याला विरोध करत देशभरातील पेट्रोल पंपचालकांनी शुक्रवारी (दि. 13) 24 तासांचा संप पुकारला होता. तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना संप न करण्याचे आवाहन बुधवारी केले. त्याचबरोबर या आवाहनास प्रतिसाद न दिल्यास कडक कारवाई करण्यात येईल. प्रसंगी पेट्रोल पंपचालकांबरोबरचे करार रद्द करण्यात येतील, अशी तंबी तेल कंपन्यांनी दिल्याने पेट्रोल पंपचालकांनी आपला नियोजित संप मागे घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: