Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बळीराजाला बोगस म्हणणार्‍या सरकारला सत्तेवरून घालवा
ऐक्य समूह
Friday, October 13, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: re3
राष्ट्रवादीच्या एल्गार मोर्चात श्रीमंत संजीवराजेंचे आवाहन
5फलटण, दि. 12 : बळीराजाला बोगस म्हणणार्‍या बोलघेवड्या सरकारला सत्तेवरून घालवून देण्याची वेळ आल्याचे सांगत शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एल्गार आंदोलन राज्यभर सुरू केले असून त्या माध्यमातून सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा मिळवून देणारा हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात, रब्बी हंगामासाठी पीक कर्ज तातडीने द्यावे, जीवनावश्यक वस्तूंची महागाई कमी करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी केले.
श्रीराम मंदिरापासून अधिकारगृह इमारतीपर्यंत बैलगाडी व पदयात्रेद्वारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अबालवृद्धांनी काढलेल्या या मोर्चात विविध मागण्यांचे फलक घेवून तरुणवर्ग आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 
अधिकारगृहाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर तेथे सभेत रूपांतर करून आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे यांची मोर्चाची भूमिका स्पष्ट करणारी आणि आंदोलनाविषयी माहिती देणारी भाषणे झाली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने गेल्या तीन वर्षात शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत योग्य पावले उचलली नाहीत. राज्यात 15 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्याने सर्वाधिक शेतकरी आत्महत्या केलेले राज्य, अशी बदनामी महाराष्ट्राच्या वाट्याला आल्याचे नमूद करत सुरुवातीला कर्जमाफी न करण्याची भूमिका घेणार्‍या या सरकारला विरोधी पक्षांच्या संघर्षयात्रा व शेतकरी संपाच्या हत्यारानंतर कर्जमाफीची घोषणा करावी लागली. त्यातून ऐतिहासिक व देशातील सर्वात मोठी कर्जमाफी असेल, असे ढोल या सरकारने बडवले; परंतु प्रत्यक्षात एका छदामाचीही कर्जमाफी अद्याप झाली नसल्याने या शासनाचा निषेध करत असल्याचे नमूद करत आता शेतकर्‍यांचे आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल, असा इशारा श्रीमंत संजीवराजे यांनी दिला.
कर्जमाफीसंबंधी शासन उदासीन असले तरी प्रत्यक्षात या कर्जमाफीच्या घोषणेचा उपयोग करून घेत गावागावात शेतकर्‍याची अब्रू काढण्याचा आणि भावाभावात एकप्रकारे भांडणे लावण्याचाच प्रकार शासनकर्त्यांनी चावडी वाचनाच्या प्रयोगाद्वारे केल्याचा आरोप करत वास्तविक यापूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली गेली, त्यावेळी विशिष्ट तारखेपर्यंतचे थकीत कर्ज माफ केल्याची घोषणा केली गेली.
या सरकारने मात्र कर्जमाफी म्हणजे शेतकर्‍यांवर उपकार करत असल्याची भावना ठेवून ऑनलाइन अर्जाद्वारे शेतकर्‍यांकडून अनावश्यक माहिती भरून घेण्याचा आणि त्याद्वारे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकर्‍याला अधिक जाचक अटींद्वारे नेस्तनाबूत करण्याचाच प्रयत्न असल्याचा आरोप श्रीमंत संजीवराजे यांनी केला.
कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी सरकारची नियत साफ नसल्याने या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी कठीण असल्याचे नमूद करत ऑनलाइन प्रक्रियेबाबत अनेकदा तक्रारी होवूनही शासनाने भूमिका बदलली नाही.
89 लाख शेतकर्‍यांपैकी केवळ 50 टक्के शेतकर्‍यांचे अर्ज ऑनलाइन प्रक्रियेतून भरले गेले असले तरी त्यापैकी 10 ते 15 लाख शेतकरी बोगस असल्याचे भाजपचे मंत्री सांगत असल्याबद्दल आ. दीपक चव्हाण यांनी तीव्र नापसंती व्यक्त करत शेतकर्‍याला बोगस संबोधणार्‍या या सरकारला शेती व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची जाण नसल्यानेच हे घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतमालाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना पेट्रोल, डिझेलची दरवाढ, स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ, रॉकेल उपलब्ध नसल्याचे आणि मिळाले तर ते चढ्या दराने, विजेच्या दरात प्रचंड वाढ आणि त्याबरोबर लोडशेडिंग, अशा एक ना अनेक संकटांचा सामना शेतकरी व सर्वसामान्यांना शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे करावा लागत असताना शासन या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने शासनाचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला या मोर्चात कंदील घेवून तर काही महिला अधिकारगृहासमोर चूल मांडून त्यावर भाकरी भाजण्याचे काम करत होत्या. महिलांच्या या अभिनव कृतीबरोबरच शेतकर्‍यांनीही बैलगाड्यांमधून मोर्चात सहभागी होत शासनाचा निषेध नोंदवला.
या मोर्चात माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, मुंबई बाजार समितीचे माजी
चेअरमन बाळासाहेब सोळसकर, श्रीराम कारखाना संचालक, पंचायत समितीच्या सभापती सौ. रेश्मा भोसले, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, नगरसेवक, श्रीमंत सुभद्राराजे नाईक -निंबाळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. राजश्री शिंदे, लतिका अनपट, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: