Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

परतीच्या पावसाचा धुमाकूळ
ऐक्य समूह
Friday, October 27, 2017 AT 11:34 AM (IST)
Tags: st1
गेल्या तीन वर्षातील मान्सूनचा आढावा घेतला असता राज्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे विविध पिकांचे नुकसान झालेले दिसते., परंतु याबाबत शेतकर्‍यांना सावध करण्याचे प्रयत्न होत नाहीत. शेतीतील खर्च भरमसाट वाढत असताना अशा नैसर्गिक संकटामुळेहातातोंडाशी आलेली पिके जाणे हे गंभीर संकट मानले जात नाही. त्यामुळे केवळ हताश होण्यापलीकडे शेतकर्‍यांच्या हाती काही राहात नाही. या वस्तुस्थितीचा आढावा...
शेतकर्‍यांना सातत्याने कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान शेतकर्‍यांसाठी चिंता वाढवणारे ठरते. या वर्षी काही दिवसांच्या ओढीनंतर पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली. त्यामुळे  शेतकरीवर्ग सुखावला. नंतरच्या हंगामातील पिकांच्या दृष्टीने तसेच पाणीपुरवठा योजनांसाठीही हा पाऊस महत्त्वाचा ठरला. मात्र, परतीच्या पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढले. शिवाय हा पाऊस रेंगाळल्याने आणखी किती नुकसान करणार, याची चिंता वाढीस लागली. या पावसाने शेतातील उभ्या पिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झालं आहे. थोडक्यात, या वर्षी अगोदर पावसाच्या ओढीची चिंता आणि नंतर परतीच्या जोरदार पावसाने पिकांची हानी झाल्याने निर्माण झालेली चिंता अशा समस्यांचा सामना करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. अगोदरच शेतमालाला योग्य भाव नसल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांसाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल.
भयंकर पाऊस
महाराष्ट्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात अतिवृष्टीमुळे विविध पिकांचे नुकसान झालेले दिसून येते. परंतु याबाबत शेतकर्‍यांना सावध करण्याचे किंवा योग्य ती उपाययोजना सुचवण्याचे प्रयत्न शेतीतज्ज्ञ, हवामानतज्ज्ञ तसेच सरकारकडून पुरेशा प्रमाणात केले जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मुख्यत्वे शेतीतील सर्व खर्च भरमसाट वाढत असताना अशा नैसर्गिक संकटामुळेहातातोंडाशी आलेली पिके जाणे हे गंभीर संकट मानायला कोणी तयार नाही. जुने-जाणते लोकही परतीचा असा बेफाम पाऊस कधी झाला नाही, असे सांगतात. यावरून परतीच्या पावसाचे स्वरूप बदलत चालल्याचे स्पष्ट होते. गेल्या वर्षी 16 ते 20 सप्टेंबर या कालावधीत मराठवाड्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या पावसाचे वर्णन ‘भयंकर’ असे करण्यात आले होते. या पावसाच्या धबधब्यासारख्या वाहणार्‍या पाण्याने पाझर तलाव फुटले. पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे मोठमोठे दगड शेतात येऊन पडले. त्याचबरोबर शेतांमधील चार-पाच इंच माती वाहून जाऊन खडक उघडे पडले. अशी परिस्थिती असतानाही देशातील हवामानतज्ज्ञ आणि संशोधन संस्था म्हणतात, की पाऊसमान बदलत असल्याचे पुरावे दिसत नाहीत. असे असेल तर आता परतीच्या पावसाने निर्माण झालेली परिस्थिती काय सांगते?
2012 पासून विदर्भ-मराठवाड्याला लहरी हवामानाने पिडलं आणि झोडपले आहे. या वर्षीचा विचार करायचा तर  ऑगस्ट महिन्यात विदर्भ-मराठवाड्यात सरासरीच्या दीडपट-दुप्पट पाऊस झाला. 24 तासात 300 ते 400 मिलीमीटरची वृष्टी झाली. यापूर्वी 2014 मध्ये 24 फेब्रुवारी ते 14 मार्च असे तब्बल 20 दिवस महाराष्ट्राला तुफान गारपिटीने झोडपून काढले होते. राज्यातील माढा, औसा, परभणी, अकोला, वर्धा या भागात मार्च महिन्यात 200 मिलीमीटर इतका पाऊस झाला. यापूर्वी असा पाऊस कधीच झाला नव्हता. केवळ 30 मिनिटात 40 मिलिमीटर, 100 मिनिटात 123 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आताही याच पद्धतीने राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस झाला आहे. यावरून या परतीच्या पावसाने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असणार, याची कल्पना येते. विशेष म्हणजे पूर्वी फक्त मराठवाड्यात अतिवृष्टी व्हायची परंतु या पावसाने महाराष्ट्रातील सर्वच विभागांना दणका देऊन त्या, त्या विभागातील पिकांचे नुकसान केले.
द्राक्षबागांना तडाखा
देशातील एकूण शेतकर्‍यांपैकी 2.5 एकरापेक्षा कमी क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या 75 टक्के असून त्यांचे दरमहा उत्पन्न 5,347 रुपये आहे. त्यासाठी करावा लागणारा खर्च मात्र 6,223 रुपये इतका आहे, असे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातील आकडेवारीवरून समारे आले आहे. यावरून शेती म्हणजे या शेतकर्‍यांचा हमखास तोटा हे सिध्द होते आणि यातच बदलत्या हवामानामुळे पिकांचे नुकसान झाल्यास संबंधित शेतकर्‍यांसाठी ती चिंतेची मोठी बाब ठरते. परतीच्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे सोयाबीन आणि कापसाच्या लागवडी-खालील सर्वाधिक क्षेत्र विदर्भ, मराठवाड्यात आहे आणि याच भागात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा स्थितीत परतीच्या जोरदार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातील सोयाबीन आणि कापसाची पिके मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली आहेत. या शिवाय कोकणातील काढणीला आलेल्या भाताच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये टोमॅटो आणि इतर भाजीपाला पीक, द्राक्षासारखे अतिमहत्त्वाचे पीक, खरिपाचा आणि रब्बीचा कांदा, रब्बीची ज्वारी, घेवडा, सोयाबीन, हरभरा आणि करडई ही पिकेही नष्ट झाली आहेत. सांगली जिल्ह्यातील उत्तम दर्जाच्या द्राक्षांच्या निर्यातीला मोठा वाव असतो, शिवाय या द्राक्षांना दरही चांगला मिळतो. आता तर नाशिक भागात द्राक्षापासून वाईन तयार करण्याचे अनेक प्रक्रिया उद्योग उभे राहिले आहेत. उसाप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा अधिक उत्पादन मिळवण्याचा पर्याय म्हणून द्राक्षाच्या लागवडीकडे पाहिले जाते. परंतु द्राक्षाचे पीक बरेच नाजूक असते. त्याची वेळच्या वेळी मशागत, फवारण्या याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. मुख्यत्वे या पिकासाठी विशिष्ट तापमान कायम ठेवावे लागते. तापमानातील वाढ वा घट या पिकासाठी हानिकारक ठरते. आता द्राक्षबागेत वेलांना मणी धरू लागले आहेत किंवा मण्यांची वाढ होत आहे. अशा स्थितीत जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी मणी गळून पडले आहेत, त्याचबरोबर द्राक्षवेलीही कोलमडून पडल्या आहेत. लागवडीनंतर द्राक्षाचं लगेच उत्पादन येत नाही. या काळात उत्तम पीक व्यवस्थापन करत रहावे लागते. शिवाय द्राक्षबागेच्या उभारणीचा खर्च मोठा असतो.या सर्व बाबी लक्षात घेता परतीच्या दमदार पावसात द्राक्षबागांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका
बसला आहे.  
अंगणातील अर्थव्यवस्था
एकूणच या वर्षीच्या जोरदार पावसामुळे विविध धरणे प्रकल्प तसेच छोटे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असले तरी  आताच्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे सरकारने कर्जमुक्तीचे आश्‍वासन दिले असतानाही सर्वच शेतकर्‍यांच्या हातामध्ये भरपाई पडलेली नाही. याआधीचा विमा योजने-बाबतचा, तूर खरेदीबाबतचा सावळा गोंधळ सर्वांना माहीत आहे. शेतकर्‍यांनी मैलोनमेैल रांगा लावूनही विम्यासाठी नोंदणी करता आली नव्हती. शिवाय कर्जमुक्तीसाठी पुन्हा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांना बराच काळ थांबावे लागले होते. विमा आणि कर्जमाफीसाठी अर्ज करण्यात शेतकर्‍यांचे कमीत कमी दोन महिने रखडणार होते. त्यातूनही शेतकर्‍यांनी उत्साहाने पिकांची पेरणी केली परंतु
या परतीच्या पावसानं ही पिकेही
हातची गेली आहेत. आता लवकरात
लवकर पंचनामे करून संबंधित शेतकर्‍यांना पुरेशी नुकसानभरपाई मिळणे गरजेचे
आहे.
अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांचा विचार आवश्यक ठरणार आहे. वास्तविक, या संदर्भात चीनचे उदाहरण तपासून पहायला हवे. चीनने अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगळे तंत्रज्ञान अवलंबले आहे. त्या देशात गावामध्ये शेती आणि शेताबाहेर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यावर भर दिला जात आहे.
उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाला चिनी लोक ‘अंगणातील अर्थव्यवस्था’ म्हणतात. हे उपयुक्त तंत्रज्ञान आपल्या शेतकर्‍यांना माहीत नाही. वास्तविक, चीनमधील शेतकर्‍यांनी पारंपरिक आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची सांगड घालत शेतीतील उत्पादन तिप्पट केले आहे. चीनमध्ये दरडोई शेती आपल्यापेक्षा कमी आहे परंतु कोंबडी, वराह, ससा, मधमाशी यांचे उत्पादन मोठे
आहे. याशिवाय चिनी वैद्यकशास्त्रानुसार आयुर्वेदिक वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन दिले आहे. पडीक जमीन, डोंगराळ भागात वनशेती, बांबूचं उत्पादन वाढवून बांबूच्या सुंदर वस्तूंची जगभर निर्यात, शेतकर्‍यांना विविध पूरक व्यवसायासाठी संशोधन, प्रशिक्षण- प्रात्यक्षिक आणि प्रसार यावर भर दिला आहे. असे प्रयत्न आपल्या देशात होणे ही काळाची गरज आहे.
 - प्रा. डॉ. मुकुंद गायकवाड
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: