Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

गुजरातचे रण
vasudeo kulkarni
Friday, October 27, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: ag1
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, तरीही गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर का झाल्या नाहीत असा जाहीर सवाल करत केंद्रीय निवडणूक आयोगावर सुरू झालेली आरोप- प्रत्यारोपांची सरबत्ती करीत सुरू झालेेले राजकारण अखेर या राज्याच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने संपले. गेली 23 वर्षे भारतीय जनता पक्षाचा अभेद्य किल्ला असलेल्या या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह पक्षाची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. 2014 मधल्या लोकसभेच्या निवडणुकांचा प्रचार मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच केला होता. पक्षाने त्यांचेच नाव पंतप्रधानपदासाठी जाहीरही केले होते आणि त्यांनी देशव्यापी प्रचाराच्या तडाख्यात सत्ताधारी काँग्रेसला पराभूत करून पक्षाला सत्ता मिळवून दिली. त्या निवडणुकात मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरात राज्याच्या झालेल्या चौफेर प्रगतीचा गाजावाजा देशभर झाला होता. एक काळ फक्त व्यापारी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या या राज्याने मोदींच्या नेतृत्वाखाली उद्योग, वस्त्रोद्योग, शिक्षण, कृषी, सहकार, शहरी आणि ग्रामीण विकास यासह विविध क्षेत्रात चौफेर प्रगती केल्यानेच, मोदींच्या नेतृत्वाभोवती विकास पुरुषाचे झगझगीत वलय होते. लोकसभेच्या 2014 मधल्या निवडणुकात या राज्यातल्या सर्व 26 जागा आणि 60 टक्के मते मिळवत भाजपने काँग्रेसचे परंपरागत वर्चस्वही संपवले होते. त्या निवडणुकांनंतर राज्यात झालेल्या सत्ताबदलात मुख्यमंत्रिपद आनंदीबाई पटेल यांच्याकडे गेले. पटेल समाजाला 27 टक्के आरक्षण द्यायच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर आनंदीबाई पटेल यांनी स्वेच्छेनेच हे पद सोडले आणि विजय रूपानी मुख्यमंत्री झाले. गुजरात राज्यात पटेल समाजाची मतसंख्या 20 टक्क्यांच्या आसपास असल्याने, भाजपच्या वर्चस्वाला हादरे द्यायचे काँग्रेसचे मनसुबे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकात उधळले गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात काही भागात भाजपची पिछेहाट झाली असली तरी काँग्रेसपेक्षा राज्यात हा पक्ष भक्कम आणि मजबूत असल्याचा दावा या पक्षाचे नेते करतात. त्याला नक्कीच अर्थ आहे. गेल्या महिनाभरात मोदींनी या राज्याचा पाच वेळा दौरा करून विकास योजनांच्या घोषणांचा पाऊसच जनतेवर पाडला. पाचच दिवसांपूर्वी भरूच ते पोरबंदर या सागरी प्रवासी वाहतुकीचा प्रारंभही त्यांच्याच हस्ते झाला, तेव्हा काँग्रेसकडून विकासाला खिळ घातली जात असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला होता. गुजरातची जनता शहाणी-सुज्ञ असल्याने काँग्रेसच्या अपप्रचाराला ती साथ देणार नाही आणि विकासाच्या बाजूनेच विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपलाच कौल देईल, असा विश्‍वास त्यांनी  व्यक्त केला आहे. विधानसभेच्या 182 जागांसाठी 9 आणि 14 डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होईल. 18 डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होतील. निवडणूक आयोगाने  निवडणुकीची प्रक्रिया सुरू केल्याने आचारसंहिताही लागू झाल्याने केंद्र आणि राज्य सरकारला आता मतदारांवर प्रभाव टाकणार्‍या घोषणा करता येणार नाहीत.

काँग्रेस आक्रमक, पण...
काँग्रेसचे कार्याध्यक्ष  राहुल गांधी यांनी गेल्या सहा महिन्यात वारंवार गुजरात राज्याच्या केलेल्या  दौर्‍यात गुजरात आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवत, शेतकर्‍यांची, व्यापार्‍यांची सहानुभूती आपल्या पक्षाला मिळावी, अशी आक्रमक भाषा जाहीर सभातून वापरली आहे. जीएसटीमुळे गुजरात राज्यातल्या हिरे आणि वस्त्रोद्योग व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याने व्यापारात निर्माण झालेल्या असंतोषाचा लाभ उठवायचाही काँग्रेसचा प्रयत्न आहे. पाटीदार आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेल्या पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी जाहीरपणे काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला तर मागासवर्गीय समाजाचे नेते अल्पेश ठाकोर हे जाहीरपणे काँग्रेसला मिळाले आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यात रंगलेल्या कलगीतुर्‍यात पाटीदार (पटेल) आंदोलन समितीचे नेते नरेंद्र पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेशासाठी आपल्या समोर 1 कोटी रुपयांच्या लाचेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आणि त्यापैकी दहा लाख आपल्याला दिल्याचा आरोप जाहीरपणे केल्याने भाजपची पुरती कोंडी झाली. भाजपने पाटीदार समाजाचे आणि काँग्रेसचे नेते फोडायसाठी 500 कोटी रुपये राखून ठेवल्याचा दावा हार्दिक पटेल यांनी केल्याने, भाजपच्या काँग्रेस विरोधी आक्रमक प्रचाराला खिळ बसलेली असली, तरी तो थांबलेला मात्र नाही. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जीएसटी, नोटाबंदीच्या मुद्द्यांचे भांडवल करीत आक्रमक प्रचाराचा धडाका लावला असला तरी राहुल गांधी यांच्याशिवाय गर्दी जमवणारा नेता या पक्षाकडे नाही. सरकारच्या विरोधात भ्रष्टाचार आणि गैर व्यवहाराचे आरोप करण्यासारखे काही राजकीय भांडवलही काँग्रेसकडे नाही. काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसचा त्याग करून उभारलेल्या बंडामुळे या पक्षाच्या शक्तीचे अधिकच खच्चीकरण झाले. वाघेला यांनी पक्ष सोडताना पक्षातल्या गटबाजी, संघर्ष आणि केंद्रीय नेतृत्वावर तिखट टीकाही केली होती. 2012 मधल्या विधानसभा आणि 2014 मधल्या लोकसभा निवडणुकात काँग्रेस पक्ष एकसंध आणि अधिक आक्रमक होता. पण, गेल्या तीन वर्षात मात्र काँग्रेसची वाटचाल पराभूत मानसिकतेच्या दिशेनेच झपाट्याने सुरू आहे आणि ती रोखायसाठी राहुल गांधींनी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. बनासकाठा, साबरकाठा या जिल्ह्यासह काही ग्रामीण भागात काँग्रेसची ताकद अद्यापही टिकून असली, तरी आदिवासी, मुस्लीम आणि पाटीदार पटेलांच्या पाठिंब्यावर राज्याची सत्ता हस्तगत करायची काँग्रेसची स्वप्ने मात्र दिवा- स्वप्नेच ठरतील, अशी निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातली स्थिती आहे. गेले वर्षभर भाजपने या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत शिस्तबद्ध   प्रचाराचा आराखडा अंमलात आणला असल्याने, पहिल्या टप्प्यात काँग्रेसची दमछाक झाली आहे. 1995 मधल्या विधानसभेच्या निवडणुकांपासून भाजपने या राज्यावरची सत्तेची पकड अधिकच मजबूत आणि घट्ट केली. 2012 मधल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या 36 जागा मिळाल्या होत्या. साबरमतीच्या पुलाखालून गेल्या 3 वर्षात खूप पाणी गेले असले, तरी त्याचा लाभ काँग्रेसला मिळेल, अशी शक्यता नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: