Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

रस्ते मध्यप्रदेशातले
vasudeo kulkarni
Friday, October 27, 2017 AT 11:36 AM (IST)
Tags: lolak1
लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना, आपल्या राज्यातले रस्ते चित्रपट अभिनेत्री हेमामालिनी हिच्या गालासारखे गुळगुळीत-सुंदर-मुलायम असल्याचा जाहीर दावा केला होता. लालूप्रसाद यांचे बिहारी ढंगाचे बोलणे अतिशयोक्तीचे  आणि बेलगाम असल्याने विरोधकांनी त्यांच्या त्या वक्तव्याची टर उडवतानाच, बिहारमधल्या खड्डेमय रस्त्यांचा पंचनामा केला होता. बिहारची राजधानी पाटणा शहरातल्या रस्त्यांची तेव्हा झालेली दुर्दशा आणि खड्डे कुठे, किती, कसे आहेत, हे ही उपग्रह वृत्तवाहिन्यांनी रोजच खड्ड्यातल्या रस्त्यातून वाहतूक करणार्‍या जनतेला दाखवले होते. आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेही आपल्या राज्यातल्या सुरेख, सुंदर रस्त्यांबाबत अमेरिकेत केलेल्या वक्तव्याने टीका आणि वादळात सापडले आहेत. चौहान हे तसे संयमी आणि तोलून मापून बोलणारे नेते. त्यांचे भान भाषण करताना, विरोधकांवर टीका करतानाही फारसे कधी सुटत नाही. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांचा संयम कायम असतो. पण, यावेळी मात्र अमेरिकेतल्या मूळ भारतीय वंशाच्या उद्योगपतींच्या न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेळाव्यात भाषण करताना, आपण काय बोलतो, याचे भान त्यांना राहिले नाही. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत मध्यप्रदेशाचा चौफेर विकास झाल्याचा दावा करताना त्यांनी कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पर्यटन या क्षेत्रात कशा आणि किती सुविधा उपलब्ध झाल्या, जनतेचे जीवन किती समृद्ध झाले, याची जंत्री देता देता, अमेरिकेपेक्षाही मध्यप्रदेशातले रस्ते सुंदर आणि चांगले असल्याचा दावा करीत, उद्योजकांवर प्रभाव टाकायचा केलेला नसता उद्योग आता त्यांच्यावर उलटला आहे. आपण वॉशिंग्टनच्या विमानतळावर विमानातून उतरलो आणि शहरातल्या रस्त्यावर आलो तेव्हा मध्यप्रदेशातले रस्ते अमेरिकेपेक्षाही उत्तम असल्याचे आपल्या लक्षात आल्याचे त्यांनी सांगून टाकले. त्यांच्या या भाषणाला व्यापक प्रसिद्धी मिळताच, लगेचच मध्यप्रदेशातल्या दुर्दशा झालेल्या आणि हजारो खड्ड्यांनी व्यापलेल्या, पायवाटसुद्धा चांगली असावी, अशा भीषण रस्त्यांच्या छायाचित्रांची मालिकाच प्रसारमाध्यमातून सुरू झाली. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ शहरातल्या व्ही. आय. पी. रस्त्यांशी चौहान यांनी अमेरिकेतल्या रस्त्यांची तुलना केली असावी. भोपाळमधला हा एकमेव रस्ता वगळता याच शहरातल्या अन्य रस्त्यांची अवस्था अत्यंत भीषण तर आहेच, पण राज्यातल्या अन्य शहरांना जोडणार्‍या राजमार्गांची आणि ग्रामीण भागातल्या रस्त्यांची स्थिती कशी दयनीय आहे, याचे दर्शन उपग्रह वृत्तवाहिन्यांनी जनतेला घडवायचा तडाखा लावला आहे.
सामाजिक माध्यमावरही (सोशल मीडिया) मध्यप्रदेशातल्या विविध भागातल्या दैना उडालेल्या रस्त्यांची छायाचित्रे, जनतेच्या टीका टिप्पणीसह प्रसारित व्हायला लागली आहेत. काही लोकांनी तर रस्ता दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशा शिर्षकाखाली आपल्या भागातल्या रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांची आणि रस्त्यातल्या गुडघाभर चिखलाची छायाचित्रे स्मार्ट फोनवर प्रसारित केली आहेत. काही लोकांनी तर शिवराजसिंह चौहान, यांना आपल्या गावी -शहराचा दौरा करायचे निमंत्रणही दिले आहे. त्यांनी मोटरीने तर सोडाच, पण पायी आपल्या गावच्या रस्त्यावरून चालून दाखवावे, अशी आव्हानाची भाषाही काही लोकांनी वापरली आहे. हात दाखवून अवलक्षण म्हणतात ते हेच! परदेशात बोलणे म्हणजे त्याच्या प्रतिक्रिया आपल्या राज्यात उमटणार नाहीत, असे चौहान यांना वाटले असावे. पण, घडले ते उलटेच. अमेरिकेतल्या उद्योजकांवर प्रभाव टाकताना त्यांनी नवे वादळ मात्र अंगावर ओढवून घेतले. मध्यप्रदेशात गेल्यावर्षी झालेल्या रस्त्यांवरच्या अपघातात 9314 लोक ठार आणि 20 हजाराच्या वर लोक जखमी झाल्याची अचूक नोंदही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्याने, चौहान अमेरिकेचा दौरा आटोपून आपल्या राज्यात परततील तेव्हा खड्ड्यांच्या पंचनाम्यांना त्यांना सामोरे जावे लागेल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: