Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

बनारस घराण्याची दीपशिखा
vasudeo kulkarni
Friday, October 27, 2017 AT 11:35 AM (IST)
Tags: vi1
ठुमरी, दादरा, कजरी, चैती अशा शास्त्रीय रागांवर हुकमत असलेल्या आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या सोनिया बनारस घराण्याचा वारसा निष्ठेने पुढे नेणार्‍या गिरिजादेवी यांच्या निधनाने या घराण्याची अंतिम दीपशिखा अनंतात विलीन झाली आहे. ‘ठुमरीची राणी’ असा लौकिक असलेल्या गिरिजा देवींनी उपशास्त्रीय संगीतातही प्रभुत्व मिळवले होते. पूरबअंग गायिका असलेल्या गिरिजा देवींनी चौमुखी गायनाचा आदर्श निर्माण केला होता. ख्याल, ख्याल टप्पा, ध्रुपद धमाल, चैती होली या रागांची खुलावट त्या आपल्या दमसासीने करून मैफल रंगवून टाकत. रसिकांना चिंब चिंब भिजवून टाकत.
बनारस घराण्याच्या सरजू प्रसाद मिश्र आणि चंद मिश्र या गायकांच्याकडे त्यांनी या घराण्याची गायकी आत्मसात करायसाठी प्रचंड तपश्‍चर्या केली. त्यांच्या या कठोर सरावानेच त्यांच्यावर प्रसन्न झालेल्या दोन्ही गुरूंनी आपल्या घराण्यातल्या अनवट, दुर्लभ चिजाही त्यांना शिकवल्या. गुल, मैन, नकश, रुबायी, धरू, कौल, कलवाना या चिजा आत्मसात केलेल्या गिरिजा देवी या एकमेव गायिका होत्या. आपल्या घराण्याची शुद्ध रागांची परंपरा जपतानाच त्यांनी शास्त्रीय संगीताला विविध प्रयोगांनी वेगळी दिशा दिली. रागांचे भावमयी दर्शन रसिकांना घडवले. नव्या ढंगात आणि रूपात त्यांनी सादर केलेल्या चिजा हा संगीत निर्मितीचा अनोखा साक्षात्कारच रसिकांना होता. ईश्‍वराची आराधना करावी, अशा निष्ठेनेच त्यांनी संगीताची जीवनभर उपासना केली. वयाच्या सत्तरीनंतरही त्या रोज चार तास शास्त्रीय संगीताचा रियाज नियमितपणे करीत असत. शास्त्रीय संगीत हा आपल्या परंपरेचा वैभवी ठेवा असल्याने, नव्या पिढीनेही तो निष्ठेने जतन करायसाठी कठोरपणे रियाज करायलाच हवा, असे त्या आपल्या शिष्यांना कळवळून सांगत असत. शास्त्रीय संगीताच्या हजारो मैफली त्यांनी देश-विदेशात गाजवल्या. प्रचंड लोकप्रियता आणि धनसंपदाही मिळवली. पण, शास्त्रीय संगीत हीच खरी आपली संपत्ती आहे, असे त्या विनम्रपणे सांगत असत. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या सन्मानांनी विभूषित झालेल्या गिरिजा देवींना संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. देश विदेशातल्या अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मानही झाला होता.
‘गिरिजा : ए जर्नी थ्रू ठुमरी’ या आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकात त्यांनी आपल्या जीवनाच्या शास्त्रीय संगीताच्या यशस्वी वाटचालीचा मागोवा घेतला आहे. ठुमरीशिवाय संगीत म्हणजे पाण्याशिवाय नौका आणि शृंगाराशिवाय सुंदर स्त्री, असे त्यांनी या ग्रंथात लिहून ठेवले आहे. सुनंदा शर्मा, अजित सिंह यासह अनेक शिष्यांना त्यांनी बनारस घराण्याची गायकी दिली. हा वारसा पुढच्या पिढ्यांनी जपावा, यासाठी प्रयत्नही केले. पिलू, कौशिक ध्वनी, पहाडी, जिंजोटी, भैरवी हे राग त्यांच्या विशेष आवडीचे होते. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या परंपरेतला महत्त्वाचा दुवा निखळला आहे.             
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: