Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

कष्टाची बरी भाजी-भाकरी
ऐक्य समूह
Tuesday, October 31, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: vc1
प्राचीन अरबस्थानात हातिम बिन ताई नावाचा धनिक, कनवाळू, दानशूर आणि परम नीतिमंत म्हणून प्रसिद्ध होता. हातिमताई या नावानेच तो ओळखला जातो. एकदा एका मित्राने म्हटले, ‘मला तर अलम दुनियेत तुझ्या तोडीची श्रेष्ठ व्यक्ती दुजी असेल, असं वाटत नाही. तुला तरी असा कुणी भेटला होता का, जो तुला तुझ्याहून श्रेष्ठ वाटला?’
हातिमताईंनी म्हटले, ‘एकदा मी पवित्र पर्वणीच्या दिवशी अन्नछत्र उघडलं. चाळीस उंट दान केले. कुणाही अतिथीला मुक्तद्वार होतं. माझे आप्तेष्ट नगरीत हिंडून हाकारा-डांगोरा पिटत होते. मी स्वतःसुद्धा भुकेलेल्यांच्या शोधासाठी बाहेर पडलो. वेशीबाहेर मला एक लाकूडतोड्या भेटला. ताज्या छाटलेल्या काटक्यांची मोळी त्याच्या माथ्यावर होती. मी त्याला म्हटलं, भाई हातिमताईच्या अन्नछत्रात जाऊन तू यथेच्छ भोजन का करत नाहीस?’
त्यानं उत्तर दिलं, ‘निढळाचा घाम गाळून जो आपली भाकरी कमावू शकतो, त्याला हातिमताईच्या औदार्यानं ओशाळं व्हायची जरुरीच काय? ‘मी यावर निरुत्तर झालो. तो लाकूडतोड्या नक्कीच माझ्याहून वरचढ होता.
कथा उपदेश : आशाळभूत होण्यापेक्षा, लाचारी पत्करण्यापेक्षा स्वश्रमाने मिळालेली भाकरी पंचपक्वान्नांहून स्वादिष्ट असते. मनुजाने स्वत्वावर तिलांजली देऊ नये. पृथ्वीचे राज्य त्याचेच आहे!
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: