Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्रज्ञा शोध परीक्षेत ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण
ऐक्य समूह
Wednesday, November 01, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: na3
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा
5नवी दिल्ली, दि. 31 (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) मार्फत घेण्यात येणार्‍या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या (नॅशनल टॅलेंट सर्च) दुसर्‍या टप्प्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटद्वारे केली.
या योजनेचे महत्त्वाचे मुद्दे जावडेकर यांनी ट्विट करून सांगितले आहेत. या परीक्षेत अनुसूचित जाती-जमाती आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाची तरतूद आहे. त्यामध्ये आता ओबीसी विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात येईल. 2018 च्या शैक्षणिक वर्षासाठी ओबीसींच्या जागांवर प्रवेश देणे सुरू झाले आहे. 2019 साठी ओबीसींचा नवा कोटा लागू होणार आहे. सरकारने एनटीएससी शिष्यवृत्तीतही दुप्पट वाढ करण्याचे ठरवले आहे. ही शिष्यवृत्ती एक हजार रुपयांवरून दोन हजार रुपये होणार आहे. पीएच. डी.साठी देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीत विद्यापीठ  अनुदान आयोगाच्या नियमांप्रमाणे बदल होईल, असेही जावडेकर यांनी सांगितले.
देशभरातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांमधील उच्च बुद्धिमापन आणि हुशार मुलांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर चाचणी घेतली जाते. या परीक्षेसाठी दरवर्षी सुमारे एक कोटी विद्यार्थी पात्र ठरतात. त्यापैकी एक हजार यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 1962 मध्ये ‘नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कीम’ अंतर्गत सुरू करण्यात
आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीत पहिल्या वर्षी
दिल्लीतील 11 वीच्या विद्यार्थ्यांपैकी केवळ दहा जणांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: