Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विनाअनुदानित सिलिंडर 93 रुपयांनी महाग
ऐक्य समूह
Thursday, November 02, 2017 AT 11:17 AM (IST)
Tags: na1
अनुदानित सिलिंडरच्या किमतीत साडेचार रुपये वाढ
5नवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 93 रुपयांनी वाढविण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्याचबरोबर अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरातही साडेचार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विनाअनुदानित गॅस सिलिंडर आता राजधानी दिल्लीत 742 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत 1 ऑक्टोबर रोजी 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
दरम्यान, अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत साडेचार रुपयांनी वाढ करण्यात आली असून 14.2 किलोचा हा सिलिंडर दिल्लीत 495.69 रुपयांना मिळणार आहे. केंद्र सरकारने गॅसच्या किमतीत दरमहा वाढ करून अनुदानात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचा निर्णय घेतल्यापासून अनुदानित सिलिंडरच्या दरात जुलै 2016 पासून सलग 19 व्यांदा वाढ झाली आहे. सार्वजनिक तेल कंपन्यांनी मार्च 2018 पर्यंत गॅसवरील अनुदान पूर्णपणे संपुष्टात आणावे, असा आदेश केंद्र सरकारने गेल्या वर्षी दिला होता. तेव्हापासून अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत जुलै 2016 पासून 76 रुपये 51 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. जून 2016 मध्ये अनुदानित गॅस सिलिंडरची दिल्लीतील किंमत 419 रुपये 18 पैसे होती.  
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार ग्राहकांना एका वर्षाला 12 सिलिंडर अनुदानित दराने मिळतात. त्यापुढील प्रत्येक सिलिंडर बाजारभावाने विकत घ्यावा लागतो. सुरुवातीला अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत दरमहा दोन रुपयांनी वाढ करण्यात येत होती. यावर्षी मेमध्ये तीन रुपयांनी वाढ करण्यात आली. ही वाढ दरमहा 4 रुपयांनी करण्याचा आदेश पेट्रोलियम मंत्रालयाने 30 मे रोजी दिला. या आदेशानंतर मे महिन्यापासून अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत सहा वेळा चार रुपये किंवा त्याहून अधिक वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशात 18 कोटी 11 लाख ग्राहक अनुदानित गॅस सिलिंडर घेतात. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गेल्या वर्षभरात तीन कोटी गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन्स देण्यात आली. या महिलांचाही 18 कोटी ग्राहकांमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर विनाअनुदानित गॅस सिलिंडर घेणार्‍या ग्राहकांची संख्या 2 कोटी 66 लाख आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: