Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘आधार’ जोडणीच्या मेसेजने लोकांना घाबरवू नका
ऐक्य समूह
Saturday, November 04, 2017 AT 11:16 AM (IST)
Tags: na1
सर्वोच्च न्यायालयाच्या बँका व मोबाइल कंपन्यांना स्पष्ट सूचना
5नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : आधार क्रमांकाशी जोडणी केली नाही तर बँक खाते व मोबाइल क्रमांक बंद होईल, असे सांगणारे मेसेज पाठवून कंपन्यांनी ग्राहकांमध्ये घबराट पसरवू नये, अशा सूचना करताना सर्वोच्च न्यायालयाने मोबाइल कंपन्यांना फटकारले. मात्र, मोबाइल क्रमांक आणि बँक खाते आधारशी जोडणी करण्यावर अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. या प्रकरणी पाच सदस्यीय घटनापीठ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निर्णय घेईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, बँका व मोबाइल कंपन्यांनी आधार जोडणीची अंतिम मुदत मेसेजद्वारे ग्राहकांना कळवावी, अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने केली.
दरम्यान, ग्राहकांमध्ये अस्वस्थता किंवा घबराट पसरेल, असे कोणतेही मेसेज ग्राहकांना पाठवण्यात येत असल्याचे केंद्र सरकारने स्पष्टपणे नाकारले. मात्र, केंद्र सरकारचे म्हणणे न्या. ए. के. सिक्री यांनी फेटाळले. याबाबत मी अधिक काही सांगू इच्छित नाही. मात्र, मलाही मोबाइलवर असे मेसेज दिवसागणिक येत आहेत, असे न्या. सिक्री म्हणाले. त्याचाच आधार घेत कंपन्यांनी अशा प्रकारे लोकांना घाबरवू नये, अशा स्पष्ट सूचना न्या. सिक्री यांनी दिल्या.  
घटनापीठ आधार कायद्याच्या वैधतेवर निर्णय देत नाही तोपर्यंत बँक खाते आणि मोबाइल क्रमांकाला आधार जोडण्याचा निर्णय स्थगित ठेवावा, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याचिकेद्वारे केली होती. त्याला न्यायालयाने नकार दिला. पाच सदस्यीय घटनापीठ लवकरच आधार कायद्याच्या वैधतेवर सुनावणी घेणार असल्याने अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.
मात्र, बँका व मोबाइल कंपन्यांनी ग्राहकांना मेसेज पाठवून आधार जोडणीच्या अंतिम तारखेचा उल्लेख केला गेला पाहिजे, अशी सूचना कंपन्यांना द्यावी, असेही न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले. दरम्यान, मोबाइल फोनधारकांनी 6 फेब्रुवारीपर्यंत आपला फोन आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने न्यायालयात सादर केले. ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक ‘ई-केवायसी’ पडताळणी अंतर्गत आधारशी जोडणे गरजेचे आहे. नवे बँक खाते उघडण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य असल्याचेही सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: