Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दक्षिण काश्मीरमध्ये 115 दहशतवादी सक्रिय
ऐक्य समूह
Saturday, November 04, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: na2
सहा महिन्यांमध्ये 80 दहशतवाद्यांचा खात्मा
5पुलवामा, दि. 3 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ला मोठे यश मिळत असून गेल्या सहा महिन्यांमध्ये 80 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मात्र, दहशतवाद्यांचे प्राबल्य असलेल्या दक्षिण काश्मीरमध्ये अजूनही 115 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या ‘व्हिक्टर फोर्स’चे प्रमुख मेजर जनरल बी. एस. राजू यांनी दिली.
यापैकी 100 दहशतवादी स्थानिक असून 15 दहशतवादी विदेशी असल्याचेही मेजर जनरल राजू यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील संबुरा गावात गुरुवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांचे दोन जवान शहीद झाले तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. ‘जैश-ए-मोहम्मद’चे दहशतवादी एका घरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या 50 राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप व केंद्रीय राखीव पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत परिसराला वेढा घातला. त्यावेळी दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली. या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव बदर असल्याचे राजू यांनी सांगितले.
या शिवाय अनंतनागमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवरही काल रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये पाच जवान जखमी झाले. पुलवामा जिल्ह्यातील कारवाईनंतर ‘व्हिक्टर फोर्स’चे प्रमुख मेजर जनरल बी. एस. राजू यांनी प्रसारमाध्यमांना लष्कराच्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’बद्दल माहिती दिली. भारतीय लष्कराने गेल्या 6 महिन्यांमध्ये 80 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दक्षिण काश्मीरमध्ये अद्याप 115 दहशतवादी सक्रिय असून त्यापैकी 100 दहशतवादी स्थानिक तर फक्त 15 दहशतवादी विदेशी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणात दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट होत आहे. तुलनेने विदेशी दहशतवाद्यांची संख्या कमी आहे, असे मेजर जनरल राजू म्हणाले. स्थानिक तरुणांनी दहशतवादापासून दूर रहावे. जे दहशतवादी आत्मसमर्पण करू इच्छितात, त्यांच्या पुनर्वसनासाठी लष्कराकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आवाहन त्यांनी केले.
सध्या लष्कर दक्षिण काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्ध जोरदार मोहीम आखत आहे. शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांचे प्राबल्य आहे. या भागात दिवसाढवळ्या दहशतवादी कारवाया होत असल्याने या भागात लष्कराने हालचाली सुरू केल्या आहेत. या परिसरात लष्काराने नवा तळ स्थापन केला असून केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडीही तैनात करण्यात आली आहे, असे मेजर जनरल राजू यांनी सांगितले.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: