Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नोटाबंदी ही संघटित लूट
ऐक्य समूह
Wednesday, November 08, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: mn2
मनमोहनसिंग यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5 अहमदाबाद, दि. 7 (वृत्तसंस्था) : नोटाबंदीच्या निर्णयावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवताना हा निर्णय म्हणजे संघटित कायदेशीर लूट असल्याची घणाघाती टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मंगळवारी केली. 8 नोव्हेंबर 2016 हा भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ ठरला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आज माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांना उतरवले. काँग्रेसच्यावतीने गुजरातमधील अह-मदाबाद येथे उद्योजकांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये ते बोलत होते.
नोटाबंदीची उद्या वर्षपूर्ती आहे. देशातील जनतेवर लादलेला हा अनर्थकारी धोरणात्मक निर्णय होता. नोटाबंदी ही केंद्र सरकारची घोडचूक होती. एक वर्ष उलटून गेले तरी या निर्णयामुळे झालेल्या नफा-तोट्याचे नव्याने मूल्यमापन सरकारने केलेले नाही. 8 नोव्हेंबर 2016 हा दिवस अर्थव्यवस्था आणि लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ ठरला आहे, 
असा घणाघात मनमोहनसिंग यांनी केला.
संसदेत यापूर्वी मी केलेल्या वक्तव्याची पुनरावृत्ती आज करत आहे. नोटाबंदी ही संघटित आणि कायदेशीर लूट आहे. या निर्णयाने अर्थव्यवस्थेतील 86 टक्के रोकड एकाच वेळी परत घेण्यात आली. जगातील कोणत्याही देशाने आतापर्यंत असा निर्णय घेतला नाही. रोकडरहीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अत्यंत चुकीचा होता, असा दावाही त्यांनी केला.
नोटाबंदीमुळे लोकांच्या अडचणींमध्ये भर पडली. सरकारने एक प्रकारे ‘करदहशतवाद’ लागू केला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे हादरे बसले आहेत. त्यामुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय लोकांवर लादला. नोटाबंदीच्या निर्णयाच्या घोषणेमुळे मला धक्काच बसला होता. नोटाबंदी व जीएसटीमुळे भारतात चीनमधून होणारी आयात वाढली. या निर्णयांमुळे चीनचा सर्वाधिक फायदा झाला, अशी टीका त्यांनी केली.
नोटाबंदी आणि जीएसटीवर प्रश्‍न उपस्थित करणार्‍यांना देशविरोधी आणि करचुकवेगिरी करणारे, असे म्हणणार का, असा सवालही त्यांनी केला. नोटाबंदी आणि जीएसटीचा परिणाम सकल राष्ट्रीय उत्पन्नावरही दिसला. नोटाबंदी आणि जीएसटी या भारतीय अर्थव्यवस्थेवरील दुहेरी आघातांमुळे छोट्या व्यापार्‍यांचे कंबरडे मोडले, असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. मनमोहनसिंग यांनी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पावरही टीका केली. गेल्या वर्षभरात सर्वाधिक मृत्यू रेल्वे अपघातांमध्ये झाले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींना रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याऐवजी बुलेट ट्रेन आणायची आहे. अतिवेगवान रेल्वेगाड्यांपेक्षा सध्याच्या रेल्वेमार्गांचे अद्ययावतीकरण करण्याच्या पर्यायाचा विचार पंतप्रधान मोदींनी केला का, असा प्रश्‍न त्यांनी केला.
सरकारचे प्राधान्यक्रमच चुकले असून त्यांनी सध्याच्या रेल्वे प्रवास वाहतुकीवर अधिक लक्ष द्यायला हवे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा 6.5 कोटी लोकसंख्या असलेल्या गुजरातला काहीएक उपयोग नाही. मोठा गाजावाजा करून बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. त्यासाठी 88 हजार कोटी रुपयांचे कर्ज जपानकडून कमी व्याजदरात मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा सहज उपलब्ध होणारा पैसा असल्याचे दिसत असले तरी हे कर्ज आपल्याला जपानला परत करावेच लागणार आहे, अशी टीका त्यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: