Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
टेरर फंडिंग : 36 कोटींच्या जुन्या नोटा जप्त
ऐक्य समूह
Wednesday, November 08, 2017 AT 11:08 AM (IST)
Tags: na1
नऊ जणांना अटक; एनआयएची कारवाई
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 1 हजार व 500 रुपयांच्या तब्बल 36 कोटी रुपयांच्या नोटा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जप्त केल्या आहेत. या प्रकरणी मंगळवारी 9 जणांना अटक करण्यात आली असून चार आलिशान कारही जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटांचा संबंध दहशतवाद्यांना पुरवल्या जाणार्‍या आर्थिक निधीशी असल्याचा एनआयएचा संशय आहे. या प्रकरणाशी श्रीनगरमधील बँक कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याचा संशय एनआयएच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. अटक केलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.
एनआयएच्या अधिकार्‍यांनी सोमवारी नवी दिल्लीतील कनॉट प्लेस येथे सात जणांना अडवले होते. त्यांच्या चार आलिशान गाड्यांची तपासणी केली असता त्यामध्ये चलनातून बाद झालेल्या 1 हजार व 500 रुपयांच्या नोटांचे तब्बल 28 बॉक्स आढळले. हे बॉक्स आणि बीएमडब्ल्यू एक्स3, ह्युंदाई क्रेटा एसएक्स, फोर्ड इकोस्पोर्टस् व बीएमडब्ल्यू एक्स1 या आलिशान कार जप्त करण्यात आल्याचे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.
या सात जणांना चौकशीसाठी एनआयएच्या मुख्यालयात आणण्यात आले. या संशयितांकडे सापडलेल्या बॉक्समध्ये तब्बल 36.34 कोटी रुपये किमतीच्या नोटा आढळल्या. त्यानंतर एनआयएच्या अधिकार्‍यांनी आणखी तिघांना ताब्यात घेतले.
या सर्वांची चौकशी केल्यानंतर 9 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना उद्या एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. प्रदीप चौहान, भगवानसिंग व विनोद श्रीधर शेट्टी (तिघे रा. दिल्ली), दीपक तोपरानी (मुंबई), एजाजुल हसन (अमरोहा), जसविंदरसिंग (नागपूर) आणि जम्मू-काश्मीर राज्यातील उमर मुश्ताक दार (पुलवामा), शाहनवाझ मीर (श्रीनगर) व माजिद युसूफ सोफी (अनंतनाग), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. काश्मीर खोर्‍यातील दहशतवाद्यांना पुरवल्या जाणार्‍या आर्थिक मदतीच्या प्रकरणाचा तपास एनआयएचे अधिकारी करत आहेत. हा तपास करताना या 9 जणांविषयी माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.
या संशयितांच्या चौकशीत काही बाबी उघडकीस आल्या आहेत. काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांशी संबंधित असलेल्या काही व्यक्ती व संस्थांकडे अद्यापही बाद झालेल्या चलनातील मोठी रक्कम पडून आहे. त्यांना या चलनाचे रूपांतर नव्या चलनांमध्ये करणे शक्य झालेले नाही. आता अशा व्यक्तींवर पाळत ठेवण्यात येत आहे, असे हा प्रवक्ता म्हणाला. या प्रकरणात श्रीनगरमधील काही बँक कर्मचार्‍यांच्या सहभागाचा संशय आहे. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा जप्त करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी डिसेंबर 2016 मध्ये प्राप्तिकर अधिकार्‍यांनी चेन्नईतील खाणसम्राट शेखर रेड्डी याच्याकडून तब्बल 102 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या होत्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: