Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांमध्ये जमा झालेल्या मोठ्या रकमांची चौकशी होणार
ऐक्य समूह
Thursday, November 09, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: mn2
नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था सक्षम : नितीन गडकरी
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर आला असून बँकेत जमा केल्यामुळे हा पैसा पांढरा होणार नाही. त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. नोटाबंदीनंतर देशभरात दीड लाख लोकांनी पाच लाख कोटी रुपयांची रक्कम बँकेत जमा केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँकांमध्येही नोटाबंदीनंतर जी रोख रक्कम जमा झाली आहे, त्यातील अनेक खात्यांमध्ये गडबड आहे. या संदिग्ध खात्यांची चौकशी होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशात ‘स्वच्छ अर्थव्यवस्थे’चा शुभारंभ झाल्याचा दावाही त्यांनी केला.
नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त भाजपतर्फे देशभरात ‘काळा पैसाविरोधी दिवस’ साजरा करण्यात आला. देशभरात अनेक ठिकाणी वरिष्ठ नेत्यांनी व मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन नोटाबंदीचा निर्णय फसल्याबद्दल विरोधकांकडून होणारे आरोप खोडून काढण्याचे प्रयत्न केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नोटाबंदीसंदर्भात माहिती दिली. देश आता रोकडरहित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे.   
नोटाबंदीनंतर चलनात असलेल्या 99 टक्के नोटा परत आल्या असल्या तरी त्यामुळे काळा पैसा पांढरा होणार नाही. बँकांमधील 17.73 लाख संदिग्ध व्यवहारांची ओळख पटली आहे. 4.7 लाख रोख व्यवहार संदिग्ध आढळले आहेत. प्राप्तिकर व इतर संबंधित विभाग या सर्वांची चौकशी करणार आहेत. 28 हजार बोगस कंपन्या उघड झाल्या आहेत. एका कंपनीची तर बँकांत 2 हजार 134 खाती होती. या कंपन्यांचीदेखील चौकशी होणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. नोटाबंदीनंतर दहशतवादी व नक्षलवादी कारवाया कमी झाल्या आहेत. हवाला व्यवहार आणि ‘डब्बा ट्रेडिंग‘ तर बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले. नोटाबंदीमुळे काळ्या पैशाविरोधात एका बाजूला कारवाई तर झालीच; पण दुसरीकडे या निर्णयाचा सर्वसामान्यांना फायदाही होत आहे. बँकांच्या व्याजदरात कपात झाल्याने गृहकर्ज, वाहनकर्ज, शिक्षणकर्ज स्वस्त झाले आहे. म्युच्युअल फंडांच्या संपत्तीत 45 टक्क्यांची वाढ झाली आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये गेल्या वर्षभरात 58 टक्क्यांची वाढ झाली आहे. ईपीएफ, ईएसआयसीच्या माध्यमातून 50 लाख सर्वसामान्य कामगारांची नवीन खाती उघडण्यात आली आहेत. 56 लाख लोकांनी पहिल्यांदाच प्राप्तिकर परतावा भरला आहे. देश आता पारदर्शक अर्थव्यवस्थेकडे निघाला असल्याचेही गडकरी म्हणाले.
मूठभर लोकांना दु:ख
राहुल गांधी यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून नोटाबंदीवर टीकास्त्र सोडले आहे. त्याबद्दल विचारले असता, सत्ता गेल्याने राहुल गांधी आता बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे टीका करण्यापेक्षा त्यांच्या हातात काही उरलेले नाही. नोटाबंदी करून आम्ही काळ्या पैशावर प्रहार केला आहे. त्यामुळे ज्यांना दुःख झाले तेच रडत असून टीका करत असल्याचा टोलाही नितीन गडकरी यांना लगावला.        
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: