Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला धुमशान
ऐक्य समूह
Thursday, November 09, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: na1
भाजपकडून समर्थन; विरोधकांनी पाळला ‘काळा दिवस’
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप आणि विरोधकांमध्ये आज जोरदार धुमशान झाले. केंद्र सरकार व भाजपने या निर्णयाचे जोरदार समर्थन केले तर काँग्रेससह विरोधकांनी ठिकठिकाणी या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलने करून ‘काळा दिवस’ पाळला.
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करताना देशातील जनतेला सलाम केला. हा निर्णय ऐतिहासिक होता आणि त्यामुळे अनेक उद्देश साध्य झाले. या निर्णयामुळे जनतेला त्रास सहन करावा लागला. मात्र, 125 कोटी भारतीयांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या विरोधातील ही लढाई लढून त्यात विजय मिळवला. भ्रष्टाचार आणि काळा पैसा निपटून काढण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांना जोरदार पाठिंबा देणार्‍या जनतेला मी वाकून अभिवादन करतो, असे ट्विट मोदी यांनी केले. नोटाबंदीच्या निर्णयाच्या सफलतेबाबत त्यांनी ट्विटरवरून ग्राफिक्सही शेअर केले.
नोटाबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ विरोधकांनी वर्षपूर्तीनिमित्त ‘काळा दिवस’ पाळण्याची घोषणा केली होती तर त्याला प्रत्युत्तर देताना केंद्र सरकार  व भाजपने ‘काळा पैसाविरोधी दिवस’ पाळण्याची घोषणा केली होती. विरोधकांनी देशभरात ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने करून सरकारचा निषेध केला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध नेत्यांनी ट्विटर व अन्य सोशल मीडियाचा आधार घेत सरकारवर टीका केली. अनेक काँग्रेस नेते निदर्शनांमध्येही सहभागी झाले होते. राहुल गांधी यांनी आज एका इंग्रजी वृत्तपत्रात लेख लिहून नोटाबंदीच्या निर्णयाची चिरफाड केली. त्यांनी आज ट्विटरवरूनही मोदी सरकारवर तोफ डागली. मात्र, त्यामध्ये त्यांनी एका माजी सैनिकाचे नोटाबंदीनंतरच्या सुरुवातीच्या दिवसांमधील एक छायाचित्र वापरले. एका इंग्रजी दैनिकाने गेल्या वर्षी बँकेसमोर असलेल्या रांगेतील नंदलाल या वृद्ध माजी सैनिकाचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. तेच छायाचित्र आज राहुल गांधींनी पुन्हा शेअर केले. मात्र, नंदलाल यांनी आज पत्रकारांशी बोलताना आपण नोटाबंदीचे समर्थक असल्याचे सांगितले. मी माजी सैनिक असून सरकारच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध नाही. सरकारचे निर्णय देशाच्या भल्यासाठीच असतात. नोटाबंदीचा निर्णयही तसाच होता. या निर्णयामुळे जनतेचा फायदाच झाला आहे, असे नंदलाल म्हणाले. त्यामुळे राहुल गांधी हे तोंडघशी पडले आहेत.
काँग्रेसह अन्य विरोधकांनीही नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली. बसपच्या नेत्या मायावती, राजदचे नेते लालूप्रसाद यादव, माकपचे नेते सीताराम येच्युरी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनीही नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे अतोनात नुकसान झाल्याचा आरोप केला. भाजपने मात्र नोटाबंदीच्या समर्थनासाठी केंद्रीय मंत्र्यांना मैदानात उतरवले. देशातील विविध राज्यांमध्ये जाऊन केंद्रीय मंत्र्यांनी या निर्णयाच्या समर्थनार्थ आनंदोत्सव साजरा केला. त्याचबरोबर ‘काळा पैसाविरोधी दिन’ही साजरा केला. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काल केलेल्या टीकेला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले. नोटाबंदी हा देशाच्या हितासाठी घेतलेला निर्णय होता. उलट मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात फक्त भ्रष्टाचार झाला. त्यावेळी त्यांची भूमिका ‘तो मी नव्हेच’ अशी होती. मात्र, आता त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर कठोर शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला तितक्याच कठोर शब्दात उत्तर देणे मला शक्य नाही, असे सीतारामन म्हणाल्या. भाजप उपाध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधीच्या ट्विटची खिल्ली उडवली. शेरोशायरी करून खोटारडेपणा लपवता येणार नाही, असे शहा म्हणाले. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नोटाबंदीवर केलेल्या टीकेचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी समाचार घेतला. नोटाबंदी हा घातकी निर्णय नव्हता तर ते एक आश्‍चर्य आहे, असे सिन्हा म्हणाले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: