Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सावधगिरी
ऐक्य समूह
Thursday, November 09, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: vc1
 एक वृद्ध तपस्वी रानात खोपटं बांधून चिंतन-मननात काळ व्यतीत करत असे. पुढे तरुणपणीच विरक्ती आलेला एक चेला त्याला लाभला. कंदमुळे नि फळे खावी, झर्‍याचे पाणी प्यावे, वृक्षवृल्लींना सोयरी मानून मग्न असावे, असा त्याचा दिनक्रम होता. एकदा गुरुवर्यांनी शिष्याला आज्ञा केली, की समोरच्या झाडावर चढ. शाल्मली वृक्ष होता. सरळसोट साग-शिष्याला वृक्षारोहणाचा सराव नव्हता. तो धीराने, धीमेपणाने चढू लागला. पावलागणिक गुरूस्मरण करत गेला. उंच शेंड्यापर्यंत पोहचला. उगवत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेतले नि उतरू लागला. वृद्धाचार्य मौन धारण करून होते. सावकाशपणे पर्णराजीत लपलेल्या फांद्या पकडत शिष्य पर्णहीन खोडावर पाय ठेवणार एवढ्यात गुरुजींचा मौनभंग झाला. ‘सांभाळ रे बाळा!’ युवकाला विस्मय वाटला. एवढ्या उंचावर चढलो नि खबरदारीने उतरलो तेव्हा चकार शब्द नाही काढला नि आता भुईपाशी ठेपलो तेव्हा सांभाळून उतर म्हणतायत! हा काय अजब प्रकार! शिष्याच्या चेहर्‍यावरील गोंधळ गुरुजींच्या तेव्हाच ध्यानी आला. ते म्हणाले, ‘बेटा, धोका समोर दिसत असतो तेव्हा प्रत्येक सुबुद्ध माणूस सावध असतो. त्याला इशारत लागत नाही. जेव्हा माणूस स्वत:ला सुरक्षित मानू लागतो, धोका संपला आता, असे समजू लागतो तेव्हा खरे तर धोका सुरू होतो. माझे केस पिकले, गात्रे थकली पण आजवर कुणालाही झाडाच्या शेंड्यावरून कोसळलेले पाहिलेले नाही. सारे घसरले खुशालजी, ते जमीन जवळ आली तेव्हा! जेव्हा ते गाफील झाले, सैल सुटले, निर्धास्त बनले तेव्हाच त्यांचे पाय घसरले. हे काही न सुटणारे कोडे नाही, तर कोड्यात टाकणारे जीवन आहे!’
कथा उपदेश : अखंड सावधानता असावी हेच खरे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: