Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गुन्ह्यातील संशयिताचा ‘थर्ड डिग्री’ वापरून खून
ऐक्य समूह
Thursday, November 09, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: mn1
मृतदेह परस्पर जाळला; सांगली पोलिसांचे अमानुष कृत्य
पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना अटक
5सांगली, दि. 8 (प्रतिनिधी) ः सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील संशयित अनिकेत अशोक कोथळे (वय 26) याला चौकशीच्या नावाखाली उलटे टांगून, थर्ड डिग्रीचा वापर करून आणि त्याचे मुंडके पाण्यात बुडवून पोलिसांनी अमानुषपणे खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह गुपचूप खासगी वाहनातून आंबोली घाटात नेऊन तेथे पेट्रोल आणि डिझेल ओतून दोन वेळा जाळल्याची अमानुष व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, दोन हवालदार, एक कॉन्स्टेबल, वाहनचालक आणि एक झीरो पोलीस, अशा  सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.
सांगली शहरातील एस.टी. स्टँडवरील प्रवाशाची रविवारी पहाटे लूटमार केल्या प्रकरणी शहर पोलिसांनी भारतनगरमध्ये राहणार्‍या अनिकेत अशोक कोथळे (वय 26) आणि अमोल सुनील भंडारे (वय 23) यांना सोमवारी अटक केली होती. या संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर सोमवारी रात्री आठच्या सुमारास त्या दोघांना तपास अधिकारी युवराज कामटे याने कोठडीतून बाहेर काढले. दोघांपैकी अनिकेत कोथळे याला बेदम मारहाण केल्यानंतर त्याला उलटे टांगून त्याचे मुंडके पाण्यात बुडवले होते. पाण्यात श्‍वास गुदमरून धडपडेपर्यंत त्याचे मुंडके पाण्यात ठेवले जायचे. अशा प्रकारच्या थर्ड डिग्रीचा वारंवार वापर केल्याने अनिकेत याचा सव्वानऊच्या सुमारास मृत्यू झाला. हे अमानुष कृत्य पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, हवालदार अरुण टोणे, कॉन्स्टेबल सूरज मुल्ला व झीरो पोलीस झाकीर पट्टेवाला यांनी केले. अनिकेतचा मृत्यू होताच त्या परिसरातील सीसीटीव्ही बंद करून ठाणे अंमलदारासह सर्वांना तोंड उघडायचे नाही, अशी तंबी कामटे याने दिली. अनिकेतचा मृतदेह पोलीस चालक राहुल शिंगटे याच्या ताब्यात असलेल्या पोलीस गाडीत घालून शासकीय रुग्णालयात नेला. तेथील डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यास पोलिसांना नकार दिल्याने अनिकेतचा मृतदेह कृष्णा नदीत टाकण्याच्या प्रयत्न करण्यात आला. ते शक्य न झाल्याने आरोपींनी तो मृतदेह खासगी गाडीतून आंबोली घाटात नेऊन जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यानच्या काळात शहर पोलीस ठाण्यात आलेल्या पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी कोठडीची पाहणी केली. त्यांना पाच पुरुष आणि दोन महिला, असे सात जण यादीवरच्या नोंदीत असताना दोन पुरुष संशयित कोठडीत नसल्याचे आढळले. त्यांनी याबाबत पहारेकर्‍याला जाब विचारल्यानंतर त्याने कामटे यांनी दोघांना नेल्याचे सांगितले. डॉ. काळे यांनी कामटेशी संपर्क साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी कामटे आणि अन्य पोलीस कर्मचारी अनिकेतचा मृतदेह घेऊन कृष्णा नदीच्या काठावर फिरत होते. अनिकेतचा सहकारी अमोल भंडारे याला पोलीस ठाण्यातच दोघांनी पकडून ठेवले होते. डॉ. काळे यांना कामटेच्या वर्तनाचा संशय आल्याने त्यांनी संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही बंद होते तर पोलीस ठाण्यातील कोणीही डॉ. काळे यांना नेमकी माहिती द्यायला तयार नव्हते. संशयित पळून गेल्याचे कामटे सांगत असल्याने डॉ. काळे यांनी तशी नोंद केली. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कामटे हा पोलीस ठाण्यात आला आणि दोन संशयितांनी पलायन केल्याची फिर्याद नोंदवून गायब झाला. या घटनेनंतर कामटेसह सर्वच संशयित पोलिसांचे मोबाईल बंद असल्याने संशय बळावला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा छडा लावण्यास सुरुवात केली. पावणे चार वाजण्याच्या सुमारास कामटेने डॉ. काळे यांच्याशी संपर्क साधून पळून गेलेल्या दोघांपैकी एकाला पकडल्याचे सांगून त्याला घेऊन सांगलीला येत असल्याचे कळविले.
खुनी पोलिसांनी हवालदार लाड याच्या खासगी गाडीतून अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटात नेला. त्यावेळी दुसरा संशयित अमोल भंडारे यालाही बरोबर नेले होते. घाटात पहिल्या वेळी अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसर्‍यांदा पेट्रोल आणि डिझेल आणून तो मृतदेह जाळण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी 302, 201, 303 आणि 34 या कलमांनुसार उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, हवालदार अरुण टोणे, कॉन्स्टेबल सूरज मुल्ला, वाहनचालक पोलीस राहुल शिंगटे, झीरो पोलीस झाकीर पट्टेवाले या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हा गंभीर गुन्हा लपविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आहे, त्या सर्वांवर कडक कारवाई केली जाणार असल्याने आरोपींची संख्या वाढणार असल्याचेही नांगरे-पाटील म्हणाले. यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे उपस्थित होते.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: