Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फायरिंग झालेल्या दोन बंदुका जप्त करून पुण्यातील गुंडांचा तपास करायचाय
ऐक्य समूह
Thursday, November 09, 2017 AT 11:16 AM (IST)
Tags: lo3
सरकार पक्षाचा जोरदार युक्तिवाद : ‘सुरुची’ राडा प्रकरण
5सातारा, दि. 8 : ‘सुरुची’ राडा प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मिलिंद ओक यांनी जोरदार युक्तिवाद केला. या राड्यामध्ये दोन बंदुकांमधून फायरिंग झाले आहे. फायरींग झालेल्या बंदुका जप्त झालेल्या नाहीत. या घटनेत पुण्यातील गुंडांचा समावेश असल्याचे नुकतेच निष्पन्न झाले असून ते गुंड कोणी आणले याचा तपास बाकी आहे. त्यामुळे संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज मंजूर करू नयेत, अशी बाजू त्यांनी मांडली. सरकार पक्षातर्फे आणखी युक्तिवाद गुरुवारी करण्यात येणार आहे.
सुरुची राडा प्रकरणात सोमवारी व मंगळवारी बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. बुधवारी सरकार पक्षाच्या युक्तिवाद करण्यात आला. अ‍ॅड.मिलिंद ओक  म्हणाले, सुरुची बंगल्याबाहेर गाड्यांची तोडफोड होवून फायरिंगसारखी गंभीर घटना घडली आहे. पोलिसांनी दोन पुंगळ्या जप्त केल्या आहेत. त्या दोन्ही पुंगळ्या वेगवेगळ्या बंदुकीतील असल्याचे स्पष्ट होत आहे. अद्यापपर्यंत त्या बंदुका जप्त झालेल्या नाहीत. मंगळवारी टिपू पठाण याला  पोलिसांनी अटक केली असून तो पुण्यातील नामचीन गुंड असल्याची माहिती समोर आली आहे. 
टिपूवर 14 गंभीर गुन्हे दाखल असल्याने तो सातार्‍यात कोणासाठी आला होता? त्याला कोणी सुपारी दिली होती का? या घटनेत बाहेरील गुंड आल्याचे समोर आले असून यासह विविध कारणांचा तपास करायचा आहे. घटना घडल्यापासून आतापर्यंत 88 जणांची नावे तपासात समोर आली आहेत. दोन्ही गटाने दिलेल्या तक्रारीनुसार 250 ते 300 जणांचा समावेश असल्याने आणखी संशयितांनी अटक करायची आहे. अनेकजण या घटनेत पसार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यामुळे एकूणच पोलिसांचा तपास पूर्ण झाला नसून अटकपूर्व जामीन दिला जावू नये. या घटनेत ज्यांनी अटकपूर्व जामीन मागितला आहे त्यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. त्याचाही विचार करणे गरजेचे आहे.
दाखल झालेल्या तिन्ही तक्रारींचा तपास होणे गरजेचा आहे. तिन्ही  तक्रारीतील घटना वेगवेगळ्या असून त्याची सुरुवात वेगवेगळ्या ठिकाणांहून झालेली आहे. या प्रकरणात जामीन झाल्यास पोलिसांच्या तपासावरच मर्यादा येणार आहेत. जे संशयित आरोपी अटक झाले आहेत त्यांच्याकडून तपासाला सहकार्य झालेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: