Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोलकात्यातील अट्टल ठग पाचगणी पोलिसांच्या जाळ्यात
ऐक्य समूह
Friday, November 10, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: re2
बनावट कागदपत्रांच्या आधारे लोकांना कोट्यवधींचा गंडा
5पाचगणी, दि. 9 : बनावट कागदपत्रे बनवून पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील लोकांना सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा गंडा घालून फरार असलेल्या भावेश हरिहर भट (वय 53, रा. मुंबई, मूळ रा. गुजरात) या अट्टल ठगाला पाचगणी पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. या कामगिरीमुळे पाचगणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे व कर्मचार्‍यांचे कौतुक होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मूळचा गुजरातचा रहिवासी असलेला भावेश हरिहर भट (वय 53) हा उद्योजक असून त्याचा व्यवसाय पश्‍चिम बंगाल, मुंबई व इतरत्र सुरू आहे. तो मुंबई येथे वास्तव्यास असतो तर पाचगणी येथेही त्याचा बंगला आहे. तो अधूनमधून पाचगणीत रहायला येत होता. भावेश भट याने दुर्गापूर (कोलकाता) येथे बर्‍याच लोकांना बनावट कागदपत्रे बनवून गंडा घातला आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेचा अपहार भावेशने केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्याविरोधात बनावट कागदपत्रे बनवणे, फसवणूक, रकमेचा अपहार, असे गुन्हे दुर्गापूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यासाठी कोलकाता पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्याविरुद्ध दुर्गापूर सत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. भावेश भटचा पाचगणीत बंगला असल्याने पाचगणी पोलिसांना या तपासात सहभागी करूनघेण्यात आले होते. 
गेल्या काही दिवसांपासून पाचगणी पोलिसांनी त्याच्या बंगल्यावर पाळत ठेवली होती; परंतु भावेश पोलिसांना चकवा देत होता. तो मुंबईत असल्याची माहिती मिळाल्यावर सपोनि. तृप्ती सोनावणे, कर्मचारी प्रवीण महांगडे, जितेंद्र कांबळे, महिला पोलीस वैशाली फरांदे यांचे पथक मुंबईला रवाना झाले. या पथकाने कांदिवली येथून भावेश भटला ताब्यात घेतले. त्याला महाबळेश्‍वर येथील न्यायालयात हजर केल्यानंतर तपास पूर्ण करून भावेशला दुर्गापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: