Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘सुरुची’ राडा प्रकरणातील जामीन अर्जावर सोमवारी निर्णय
ऐक्य समूह
Friday, November 10, 2017 AT 11:03 AM (IST)
Tags: mn1
सरकारी वकिलाने खाजगी वकिलासारखे वागू नये : वकिलांमध्ये जुंपली
5सातारा, दि. 9 : सरकारी वकिलाने सरकारी वकिलासारखे वागावे, खाजगी वकील असल्यासारखे वागू नये. तुम्ही सरकारी वकील आहात याचे भान ठेवा, अशा शब्दात बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. अरविंद कदम यांनी अ‍ॅड. मिलिंद ओक यांना सुनावले. सुनावणीदरम्यान अ‍ॅड. मिलिंद ओक आणि अ‍ॅड. धीरज घाडगे, अ‍ॅड. श्रीकांत हुडगीकर यांच्यातही जुंपली. अ‍ॅड. ओक यांनीही युक्तिवादादरम्यान तुम्हाला का झोंबतय, अशा शब्दात त्यांना सुनावले. युक्तिवादादरम्यान दोन्ही पक्षाच्या वकिलांनी एकमेकांवर तोंडसुख घेतले. दरम्यान, जामीन अर्जावरील निर्णय सोमवार, दि. 13 रोजी होणार आहे.
जिल्हा न्यायालयात आ.श्रीमंत शिवेंद्रसिंहराजेभोसले यांच्या समर्थकांनी दाखल केलेल्या अटकपूर्व आणि नियमित जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. नितीन मुके आणि अ‍ॅड. मिलिंद ओक यांनी युक्तिवाद केला. सीसीटीव्हीच्या कक्षेबाहेर घटना घडली आहे. अजूनही तपास होणे बाकी आहे. काही संशयितांना अटक केल्यानंतर तपास पुढे जाईल. संशयितांना जामीन दिल्यास तपासावर परिणाम होईल. त्यामुळे जामीन देवू नये, असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. अरविंद कदम, अ‍ॅड.श्रीकांत हुडगीकर, अ‍ॅड. धीरज घाडगे यांनी बाजू मांडली.
बचाव पक्षाने केलेल्या युक्तिवादात म्हटले आहे, की 307 हे लावलेले कलम चुकीचे आहे. मुळात प्रत्येक संशयिताचा गुन्ह्यात नेमका काय हेतू होता हे तपासले पाहिजे. टोल नाक्याच्या वादातून घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने घटना घडलेली नाही. पोलीस निरीक्षक हे स्वत: फिर्यादी आहेत. ते या घटनेतील प्रत्यक्षदर्शी आहेत. ते या घटनेत जखमी झालेले आहेत. त्यांना एका गाडीने तेथून जाताना उडवले आहे. त्यामुळे ते पोलिसांच्या खुनाच्या हेतूने आले होते, असा त्याचा अर्थ होत नाही. टोल नाक्याचे मूळ कारण आहे याचाही विचार केला पाहिजे. जे फायरिंग झाले आहे ते हवेत झाले आहे.
युक्तिवादादरम्यान अ‍ॅड. अरविंद कदम यांनी अ‍ॅड. मिलिंद ओक यांच्या युक्तिवादातील काही वक्तव्यावर आक्षेप घेत तुम्ही सरकारी वकिलासारखे वागा. तुम्ही सरकारी वकील आहात याचे भान ठेवा, खाजगी वकिलासारखे वागू नका, अशा शब्दात त्यांना सुनावले. सरकारी वकिलाने एखाद्याचा बचाव करायचा आणि दुसर्‍याविरुद्ध अग्रेसिव्ह होवून बोलायचे हे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर बचाव पक्षाने सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर केले. त्यावर सरकार पक्षानेही सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान सरकार पक्षाने पोलिसांचा गोपनीय अहवाल न्यायालयात सादर केला. हा अहवाल खुला करू नये, अशी मागणी केली. 
त्याला बचाव पक्षाने आक्षेपघेतला. त्यावर मी काहीही बोललो तर तुम्हाला का झोंबते, अशा शब्दात अ‍ॅड. ओक यांनी अ‍ॅड. घाडगे आणि अ‍ॅड. हुडगीकर यांना सुनावले. त्यावरून या तिघांचीही जुंपली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: