Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आगाशिवनगर परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळले
ऐक्य समूह
Friday, November 10, 2017 AT 11:11 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 9 : मलकापूर येथील आगाशिवनगरच्या दत्त मंदिर परिसरात डेंग्यूचे चार रुग्ण आढळले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या सूचनेवरून शहराच्या सर्व भागात आरोग्य विभागाने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
कराड तालुक्यातील कोयना वसाहतीत डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर ग्रामपंचायतीने औषध फवारणी करून अन्य उपाययोजना केल्या. त्यानंतर लगेचच आगाशिवनगर भागातील दत्त मंदिर परिसरात डेंग्यूचे चार रुग्ण आढळल्याने परिसरात घबराट पसरली आहे. त्यातील तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर नागरिकांनी नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला. तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनीही आगाशिवनगर भागात सर्वेक्षण सुरू करून डेंग्यूसदृश आजाराने पीडित रुग्णांची तपासणी सुरू केली आहे. नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाने डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे. मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी आरोग्य विभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर कर्मचार्‍यांनी परिसरात औषध फवारणी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: