Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सांगलीच्या नराधम पोलिसांना 13 दिवस पोलीस कोठडी
ऐक्य समूह
Friday, November 10, 2017 AT 11:05 AM (IST)
Tags: mn2
सीआयडीकडे तपास; सेवेतून निलंबनाची कारवाई
5सांगली, दि. 9 (प्रतिनिधी) ः गुन्ह्यातील संशयिताला चौकशीच्या नावाखालीउलटे टांगून, बादलीत डोके बुडवून आणि अमानुष मारहाण करून त्याचा खून करणार्‍या पोलिसांना न्यायालयाने गुरुवारी 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सहापैकी पाच संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. आंबोली घाटात ज्या ठिकाणी अनिकेत कोथळेचा मृतदेह जाळण्यात आला, त्या ठिकाणी हवालदार अनिल लाड याला चौकशीसाठी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. संशयित पोलिसांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
त्यामुळे न्यायालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. वकील मंडळींनीही गर्दी केली होती. दरम्यान, या प्रकरणी संशयित पोलिसांना निलंबित करण्यात आले असून खुनाच्या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला आहे.
लूटमारीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताचा चौकशीच्या नावाखाली अमानुष मारहाण करून खून केल्यानंतर अगदी सराईत गुन्हेगारांप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लावणार्‍या पोलिसांचे कृत्य चव्हाट्यावर आल्यानंतर सर्व स्तरातून संतप्त भावना उमटत आहेत. पोलिसांच्या नावाने सर्वत्र छी : थू सुरू असून गुरुवारी त्या संशयित पोलिसांना न्यायालयात आणले जाणार असल्याने परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. लाठ्या, काठ्या आणि ढालींसह पोलीस सज्ज होते. मागेपुढे अधिकारी, कर्मचार्‍यांच्या गाड्या लावून संशयितांची गाडी न्यायालयाच्या दारात येताच सज्ज पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली. संशयित पोलिसांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिसांच्या नजरा गर्दीवरून भिरभिरत होत्या. काळे बुरखे घातलेल्या अवस्थेत निलंबित उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अरुण टोणे, कॉन्स्टेबल नसरुद्दीन मुल्ला, चालक राहुल शिंगटे, झाकीर नबीलाल पट्टेवाले आदींना पळवतच न्यायालयात नेण्यात आले.
संशयितांना मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांच्यासमोर हजर केले असता त्यांच्यापैकी युवराज कामटे याची बाजू मांडण्यासाठी वकील नव्हता. तुम्हाला सरकारतर्फे वकील हवा असेल तर देण्यात येईल, असे न्यायालयाने सुचवले. त्यावर कामटेने मान डोलविली. अन्य चौघांची बाजू मांडण्यासाठी हजर असलेले वकील गिरीश तपकिरे यांनी कामटेची बाजू मांडण्यास होकार दिला. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील उज्ज्वला आवटे यांनी  युक्तिवाद केला. या संशयितांनी सराईतपणे खून केला आहे. त्या प्रत्येकाचा या गुन्ह्यातील सहभाग निश्‍चित करणे आवश्यक आहे. घटनाक्रम आणि गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांचा शोध घ्यायचा आहे. आंबोली घाटात मृतदेह जाळला असल्याने तेथे जाण्यासाठी कोणत्या वाहनांचा वापर केला? वाटेत त्यांनी वाहने बदलली का? चोरीतील संशयिताला मारहाण करून त्याचा खून करण्यात आणखी कोणी सहकार्य केले आहे का? पोलीस कर्मचार्‍यांबरोबर खासगी व्यक्तींची कोणत्या प्रकारे मदत घेतली गेली आहे का, याचा सखोल तपास करायचा असल्याने सर्व संशयितांना 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती अ‍ॅड. आवटे यांनी केली. सरकारी पक्षाची बाजू समोर येताच न्यायालयाने संशयितांना दि. 21 पर्यंत 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर संशयितांना पुन्हा बुरखे घालून पोलीस गाडीतून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात आले. कोल्हापूर सीआयडीचे अप्पर पोलीस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांचे पथक संशयितांना ताब्यात घेण्यासाठी वाहनांसह जय्यत तयारीने न्यायालयाच्या आवारात दाखल झाले होते.
अनिकेतचा सुपारी घेऊन खून?
दरम्यान, पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली अनिकेत कोथळे याचा सुपारी घेऊन खून केल्याचा गंभीर आरोप त्याच्या नातेवाइकांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. अनिकेत कामाला असलेल्या एका दुकानाच्या वरच्या मजल्यावर अवैध कृत्ये चालायची. तेथे उपनिरीक्षक युवराज कामटेची ये-जा होती. दुकान मालकाने अनिकेतला अचानक कामावरून काढल्याने तो चिडला होता. त्याला दुकानातील कृत्यांची माहिती असल्याने तो काही तरी गडबड करेल, या भीतीने खोट्या गुन्ह्यात त्याला गुंतवून चौकशीच्या नावाखाली त्याचा खून केल्याचा आरोप अनिकेतची पत्नी व नातेवाइकांनी केला आहे.
पोलिसांनी ज्या लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत आणि अमोल भंडारे यांना अटक केलीे, त्या गुन्ह्याची फिर्याद आमच्यासमोर आणावी. तो मुंबईचा अभियंता असेल तर त्याला अनिकेत आणि अमोलची नावे कशी समजली, असा सवाल अनिकेतच्या नातेवाइकांनी केला. या दोघांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास लूटमार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतर ते घरीही आले नाहीत. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी त्यांना अटक केल्याचे आम्हाला फोनवरून कळविले होते तर सोमवारी सकाळपर्यंत त्यांना कुठे ठेवले होते? सोमवारी रात्री दोघेही पळून गेले, असे सांगितले गेले. मात्र, त्याबाबत आम्हाला माहिती का देण्यात आली नाही, असे प्रश्‍न उपस्थित करून नातेवाइकांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेतला आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी आमची दिशाभूल केली. अनिकेतने पलायन केल्याचे कळविले नाही. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर त्यांची भेट घेऊन अनिकेतबाबत चौकशी केली असता त्यांनी अनिकेत सुरक्षित असल्याचे सांगितले होते. त्याला सुखरूप तुमच्या ताब्यात देण्यात येईल. इतर कोणापेक्षा पोलीस काय सांगतात यावर विश्‍वास ठेवा, असे त्यांनी सांगितले होते. अनिकेतचा खून झाल्यानंतर डॉ. काळे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन बरीच माहिती घेतली होती तर त्यांनी आमच्यापासून वस्तुस्थिती का लपवली, असा सवाल करून नातेवाइकांनी काळे यांच्या चौकशीची मागणी केली आ
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: